12/13/2012

बुटीज्


माझं क्रोशा चं फॅड
एका पिल्लूसाठी बनवलेले बुटीज्




बटन्स सुंदर दिसताहेत ना ?






आणि ही भूभू ची टोपी

12/08/2012

झटपट आणि सोप्पा केक

Similar recipe of Instant Dark Chocolate cake 

कधी कधी असं होतं की केक तर बनवायचाय पण घरात सगळं साहित्य नाहीये हाताशी अश्यावेळी ही झटपट आणि सोप्पी रेसिपी उपयोगी पडते.

साहित्य अगदी सहज उपलब्ध असणारे आहे.

बघुया काय काय घेतलंय …

ओरिओ बिस्किट्स २ पॅकेट्स
पार्ले जी बिस्किट्स १ पॅकेट्
१ कप दुध
१ टेबलस्पून बटर
१/२ टीस्पून बेकिंग सोडा आणी १/२ टीस्पून बेकिंग पावडर

सोप्प्या केकची कृती खरंच खूपच सोप्पी आहे .

सर्वप्रथम ओरिओ बिस्किट्स थोड्यावेळाकरीता फ़्रिजमध्ये ठेउन द्या. असे केल्याने त्यावरील क्रीम काढणे सोप्पे जाते. मग बिस्किट्स बाहेर काढून चमच्याने त्यावरील सगळे क्रीम काढून घ्या. हे क्रीम १ कपभर दुधात मिक्स करून बाजूला ठेवून द्या.

आता ओरीओ आणि पार्ले बिस्किट्स चा मिक्सरमध्ये चुरा करून पावडर करून घ्यायची मग त्यात बेकिंग पावडर आणि बेकिंग सोडा प्रत्येकी १/२ (अर्धा ) टीस्पून घालून बिस्किट्स चा सुरा चाळणीने चालून घ्या.

मग त्यात क्रीम मिसळलेले गोड दुध (१ कप) मिसळा. बेटर ची कन्सिस्टसी पळी वाढी असायला हवी.

ओव्हन 350 F ला प्रीहीट  करून घ्या. केक च्या भांड्याला ग्रिसिंग करून त्यात मिश्रण घालून २० ते २५ मिनिटे बेक करा.

टूथपिक टोचून बघा जर काडीला काही लागले नसेल तर केक चांगला बेक झाला आहे. 

अर्ध्या तासात मस्त केक होतो. जरा गार झाल्यावर हव्या त्या आकारात कापून त्यावर चोकलेट सिरप किंवा व्हिप क्रीम टाकून थोडीशी सजावट करून सर्व्ह करा.  बच्चेकंपनी एकदम खूष.

वाफ़ाळत्या चहासोबत नुसता केक खूप मस्त लागतो.



 

Instant Dark Chocolate cake

Here is the most simplest recipe of instant cake.

Ingredients are Orio biscuits, Parle G biscuits (Marie or any other light biscuits can be replaced with this), a cup of milk, baking soda and baking powder 1/2 Teaspoon each.

2 orio biscuit packets + 1 Parle G pack. ...
keep Orio biscuits in refrigerator for sometime. Then remove the cream, mix the cream with cup of milk. Keep it aside.

Crush and make powder of both the biscuits in mixer. Add 1/2 T spoon baking soda and 1/2 T spoon Baking powder and sieve the mixture. Then add a cup of milk mixed with cream. Mix well. Check the batter consistency, if its too thick then add a table spoon of milk. 


Preheat the oven for 350 degree F. Then pour the cake batter into the lightly greased cake pan. Bake it for 20 to 25 mins. Check by inserting a toothpick or knife. If its come out clean then the cake is nicely baked. Let it cool for a while and then cut into desired shape. Decorate it with chocolate syrup and serve.


 

11/15/2012

माहीम चा हलवा



लागणारा वेळ:
३० मिनिटे
लागणारे जिन्नस:
बारीक रवा किंवा मैदा १/२ वाटी
साजुक तुप १/२ वाटी
साखर १ वाटी
थंड दूध १ वाटी
बदाम पिस्त्याचे काप आणि वेलची दाणे ऐच्छीक
वेगळे स्वाद आणि रंग यासाठी खाण्याचे रंग, मँगो पल्प, चॉकलेट सिरप आवडी प्रमाणे
क्रमवार पाककृती:

एका जाड बुडाच्या पॅन मध्ये तुप, मैदा, (किंवा बारिक रवा जे घेतले असेल ते) साखर आणी दूध घालून ढवळून, गुठळ्या मोडून चांगले एकत्र करावे.

मग स्टोव्ह मिडियम हाय वर उकळायला ठेवावे. उकळी येताच लगेच आच कमी करून मिश्रण शिजवावे. एकसारखे ढवळावे लागते नाहीतर खाली मिश्रण लागु शकते. साधारण पंधरा विस मिनिटे लागतात.

एकीकडे अ‍ॅल्युमिनियन फॉइल ला तुपाचा हात फिरवून प्लॅटफॉर्म वर पसरवून ठेवावी.

जरा मिश्रण बाजूने सुटून जवळ येउ लागले की त्यात अर्धा चमचा तुप टाकावे. तुम्हाला जर रंगीत हलवा हवा असेल तर ह्या स्टेज ला मिश्रणात रंग अथवा इसेन्स घालावा. मी बदाम पावडर घातली.

मिश्रणाचा गोळा व्ह्यायला लागला की.. म्हणजेच.. ज्या चमच्याने तुम्ही मिश्रण धवळत आहात, त्या भोवती गोळा जमून आला कि स्टोव्ह वरुन पॅन उतरावे.
लगेच तुप लावलेल्या फॉईल वर पसरून. वरुन प्लॅस्टीक शीट टाकून भराभर पापडासारखे लाटून पसरावे.


मध्ये एकदा प्लॅस्टीक शीट उचलून हलव्यावर वेलची दाणे, काजू बदामाचे काप पसरवुन टाकावे. पुन्हा पॅस्टिक टाकून निट लाटून हलवा एकसारखा पातळ करावा.

प्लॅस्टिक काढून थोडा थंड करावा. मग हव्या त्या आकाराचे काप कापून. मध्ये मध्ये बटर पेपर टाकून ठेवावा.



वाढणी/प्रमाण:
५" बाय ५" चे ८ भाग (वाटीच्या आकाराप्रमाणे कमी जास्त)

अधिक टिपा:
लाटायचे काम भराभर आणि पापडासारखे ताकद लाउन करावे लागते.
असा मस्त हलवा खायला थोडी एक्सरसाईझ हवीच ना ? ;)

सुरवातीला जरा नरम वाटला तरी थंड झाल्यावर एकदम खुटखुटित मस्त होतो अगदी माहीम सारखा.

वर लिहिल्या प्रमाणे दोन तीन बॅच केल्या तर मॅन्गो, चॉकलेट, किंवा रंगीबेरंगी माहीमचा हलवा बनवता येईल.

11/12/2012

कंदिलांचे आकाश

दिवाळी हा दिव्यांच्या रोषणाईचा, रंगिबेरंगी रांगोळ्यांचा, गोडधोड खाण्याचा, पण दिवाळी आली की खरी रोषणाई होते ती कंदिला मुळेच, बाजारात अनेक रंगाचे ढंगाचे आकाशकंदिल बघायला मिळतात. पण लहानपणी कंदिलांची मज्जाच न्यारी होती. पतंगाच्या काडया, झाडू मध्ये भरीला घातलेल्या काडया, तर कधी बांबू उभा चिरुन त्या वेताच्या काठीने चांदणी बनवायची, त्यावर रंगीत पतंगाचा कगद लावायचा. हा पहील्या टप्प्याचा कंदिल, मग त्या काठ्यांचा विमानाचा आकार.. जहाजाचा आकार, कॉलनी मध्ये टांगायला भला मोठा कंदील. त्या नंतर आले जिलेटीन पेपर, मग र्थर्माकोल ह्या पद्धतीने कंदिल निर्मीतीला आणि कलात्मकतेला खुप वाव दिला.

नंतर नंतर व्याप वाढले... दिवाळीची सुट्टी कमी झाली, आणि घरी बनवल्या जाणार्‍या कंदिलाची जागा बाजारातील झगमगीत कंदिलाने घेतली. पण कंदिलाचं महत्व आणि मज्जा कधीच कमी झाली नाही. आपला कंदिल काही तरी वेगळा आणि उठवदार असायलाच हवा, हे प्रत्येकाचं स्वप्न. मुलांबरोबर कंदील खरेदीची खरी मजा.. हा नको तो... तो वरचा मोठा.. तो नको... तो छान नाही आहे. मुलांचं लक्ष कंदिलावर आणि आमचं त्याच्या प्राईज टॅगवर. दुतर्फा दुकानांवर टांगलेले कंदील आणि त्यातून चाललेली आमची टुर...

हा नको रे फाटेल, अरे हा दुमडून ठेवता येणार नाही, महाग आहे फार दिवाळी नंतर काय करायचं? येवढा मोठ्ठा कंदील लावायचा कुठे? जेवढे कंदील तेवढे आढेवेढे. छान आहे ठेऊ जपून, ह्याचा नंतर घरी हँगिग लँप करू, माझ्या मित्राने केवढा मोठ्ठा घेतला आहे, मला हाच आवडला... कीती ते कंदिल.. आणि किती त्या मागण्या... पण एकाही कंदिलावर आमचं एकमत होईना.

"ए आई SS हे बघ काय मस्त आहे ! तो बघना .. "

"तुला ना कंदिलाच्या जगात नेऊन सोडायला पाहीजे.. "

"अगं आई असं काय करतेस ? बघना.. ये एकडे लव्व्कर."

"अरे कुठे घेउन चाललास... अरे दुकानं संपली ..."

"नाही..नाही... ते बघ तिथे अजुन कंदील आहेत ते बघ ना... "

"अरे थांब !", म्हणे पर्यंत हा.. हात सोडुन पळाला सुद्धा...

"आई SS SS मी ईथे..."

"अरे कुठे?"

"बघ मी कंदीलाच्या जंगलात आलो आहे."

"अरे काय वेड लागलंय का तुला ?"

आणि पहाते तर काय तो खरंच कंदिलाच्या जंगलात घुसला होता, खुप कंदिल असलेलं जंगल !

नाही... कंदीलांचं खर जंगल.. इथे झाडांना कंदिल नव्हते, झाडंच कंदिल होती..
कंदिलाची पानं, कंदिलाचे खोड, फळं देखील कंदिल... हे काही तरी अजबच घडत होत, स्वप्न तर नाही ना... सांगुन खर वाटेल का कुणाला ?

काय करावं सुचत नव्हतं आणि तेव्हढ्यात हातातला फोन धाऊन आला मदतीला... म्हंटल ह्याचे फोटो घेउ.. स्वप्न असेल तर जंगल आणि कॅमेरा दोन्ही गायब...

आणि नसेल तर.... मायबोलीकरांसाठी वृतांत :)

भरभर फोटो घेतले..



हा जंगलातुन पुढे पळतोय हाका मारातोय...अन मी त्याच्या मागे मागे

अरे बाप रे हे काय? येवढ मोठ्ठ नगर द्वार ते देखील कंदिलाचं ...



ही नगरीच होती आगळी वेगळी कंदिलाची....



चटकदार लाल रंगाचे छत




"अगं आई ... हे बघ पांडे ! "

अग्गो बाई. आला का इथेही ह्याचा दबंग चुलबुल पांडे.

"अगं चुलबुल पांडे नाही गं खरे खुरे पांडे."
बाजुचे देशपांडे असतील.. असं वाटलं...पण नाही....

अरे ओ पांडा ..... कितने पांडे है ? :)




गमतीशीर पांडा परिवार खेळण्यात मग्न होता.

"आईगं हे बघ पर्‍यांचा महाल...."

"चल रे, काहीतरी काय ? .. उगाच पळु नकोस पुढे पुढे."

पण समोरचे दृष्य बघुन मी आश्चर्यचकीत झाले. कळेना की ह्याची स्वप्ने खरी होताहेत ? की मीच स्वप्नात आहे ?

खरंच एक भव्य दिव्य परिमहल समोर होता.
एव्हढा सुंदर झगमगता चमचमता पर्‍यांचा महाल, पण तोही होता एक मोठ्ठा कंदिल !



"आई, ये ना गं इकडे. बघ केवढी मोठ्ठी बाग आहे."

असे म्हणत तो मला ओढत असताना आम्ही बागेत पोहोचलो सुद्धा.

किती ते रंगीबिरंगी मश्रूम ! त्यावर सुंदर सुंदर पक्षी .. खारुताई खेळताहेत.



तर कुठे त्यावर ससुल्या बागडतोय.



आणि क्षणात चमचमणार्‍या इटुकल्या पिटुकल्या फुलपाखरांचे थवे पाहून आपण जणू काही नाभी चा अवतार घेउन निबीरू प्लॅनेटवर असल्याचा भास झाला.

वेणी होती....पण छे मागे शेपूट नव्हतेच ! :)
कसला नाभी अन कसलं काय? आपला रोजचाच अवतार ! :D



तलावात सुंदर कमळं फुलली होती. कमळाच्या मोट्ठाल्या पानांवर बसून कुणी एक शापीत राजपुत्र डरॉव .. डरॉव करत होता.



म्हणजे आता कुठेतरी परी दिसायलाच हवी. माझा तर्क अगदी खरा निघाला.

एक मत्स्यकन्या तिच्या प्रियकराच्या विरहात अश्रू ढाळत होती, तिचे अश्रू शिंपलीत पडून मोती होत होते... तिची समजूत काढायला.. तिला समजवायला.. खोल समुद्रतळाशी तिच्याशी हितगुज करत होते ऑक्टोपस..पाणघोडे आणि चमचमते चित्ताकर्षक मासे.



हा सी हॉर्स



आणि बाकी मित्रमंडळी



ह्या मित्रांच्या गप्पांमध्ये गुंगलो असतानाच एक मोठ्ठी डरकाळी कानावर आली. मागे वळून बघतोय तर काय हा भलामोठा डायनोसोअर !



"आई पळ..पळ !"
मागे डायनोसोर्स चे झुंड धावत येत होते.



एवढा मोठा महाकाय पार्कमधून साखळ्या तोडून धावत होता.



"आई ज्युरासिक पार्क ............ तो ही कंदिलांचा !! " :D

"तुझे कंदिलांचे वेड मलाही वेड लावणार आहे." :)

इतक्यात समोरून टेक्सास मधले लॉन्ग हॉर्न्स चाल करून आले. आता आली का पंचाईत ?



पण ते लाँग हॉर्न आमच्याकडे नव्हे तर डायनोसोअर वर धावुन गेले. मला मात्र त्यातल्या एका गोजिरवाण्या वासराची चिंता ....



एवढ्या मोठ्या डायनओसोर्स समोर ह्या लॉन्ग हॉर्न चा निभाव लागेल का ? असे वाटत असतानाच तिथे हा अतिप्रचंड ड्रॅगन प्रकट झाला.



ह्याला बघून डायनोसोर्स ने जी धूम ठोकली ते काही परत आले नाहीत !

"थॅम्क्यु रे बाबा. हेल्प केलीस !"
हा निळूभाउ ड्रॅगन आमचा दोस्त बनला. मग आम्ही ड्रॅगनच्या पाठीवर बसून स्वर्गलोकीच्या मंदिराकडे निघालो. वाटेत सातासमुद्राची सफर करुन आलेले फ्लेमिंगो दिसले.



रस्त्याच्या दुतर्फा तर्‍हेतर्‍हेची आगळीवेगळी फुले बहरली होती.



फुलांच्या गर्दीतून मुंग्यांची लगबग दिसली. कुणी बाळमुंग्या घसरगुंडी खेळत होत्या...
तर कुणी सि-सॉ खेळत होत्या.



तर मोठ्या कुणी वाद्यवृंद जमवुन ऑकेस्ट्रॉ भरवला होता.



कसली बरं लगबग एवढी ?

"ही तर मुंगीची वरात आहे चालली", ड्रॅगन ने माहीती पुरवली.

खरंच की नवरी मुंगी डोलीतून आहे चालली.



अरे ही काही नुसतीच वरात नाही तर फुल्ल बँड बाजा बारात आहे !




मुंग्यांची वरात बघताना स्वर्गलोकीचं मंदीर केव्हा आलं कळलंच नाही आणि आम्ही मंदिराच्या दाराजवळ येउन थबकलो.

मंदिराच्या द्वारावर चार यक्ष ड्रॅगन उभे होते.



आमच्या निळूभाउ ड्रॅगनने त्याना घाबरायची गरज नाही सांगितले आणि आम्ही पुढे चालू लागलो.

आणि समोर भव्यदिव्य मंदिर नजरेस पडले. हेच ते ६०० वर्षांपूर्वी बांधलेले टेम्पल ऑफ हेवन !!



मंदिराच्या प्रांगणात मोरांची जोडी होती.



तिथेच शेजारी मॅगपिज् जोडपं चहकत होतं. ह्यालाच म्हणतात " द चार्म ऑफ मॅगपिज् !"



ये अजब कंदिल नगरी तो फुल्ल फिल्मी हय...

अबब !!! हा रामलिलेतला रावण इथे कसा आला ? आणि त्याला एक .. दोन .. चार सात.. पंचवी.................स तोंडे. हा हा हा हा...



"आई हा बघ...स्टॅच्यु ऑफ लिबर्टी चा कंदिल"



"अरे केव्हढे कंदिल बघितले तरी अजुन तुझे कंदिल पुराण संपेनाच ?"




आणि कंदिलांच्या राज्यातून मी लेकासोबत बाहेर पडले, कंदिल तर घेतलाच नाही !!

असो. खूप पकवलं ना तुम्हाला ? :D

घटकाभर तुम्हा माबोकरांचं स्वप्नरंजन केलं. गोष्ट जरी स्वप्न पडल्यासारखी असली तरीही फोटो मात्र खरेच आहेत हो.

ह्या कंदिलांच्या राज्यात तुम्ही सुद्धा जाउ शकता. हे कंदिलांचं विश्व तुम्ही सुद्धा पाहू शकता. ही स्वप्नवत नगरी प्रत्यक्षात उतरली आहे डॅलस टेक्सास इथे स्टेट फेअर पार्क च्या प्रांगणात.

हि सगळी प्रकाशचित्रे चायनिज लॅन्टर्न फेस्टिव्हल २०१२ ची आहेत.

चायनीज दिपोत्सव (Chinese Lantern Festival 2012)

मुख्य प्रवेशद्वार



हे सुंदर, मोठ्ठे, रंगिबेरंगी आकाशकंदिल फक्त तारा आणि सॅटिन च्या कापडाच्या सहाय्याने बनवलेले आहेत. काही कलाकृती हेलीकॉप्टरच्या मदतीने तळ्याच्या मधोमध उतरवून तर्‍हेतर्‍हेचे देखावे उभे केले आहेत. देखाव्यातले बरेच प्राणी, पक्षी, फुलपाखरे,मोरांची जोडी, सगळे पांडा, आणि निळा ड्रॅगन ही चलतचित्रे आहेत. सोबतीला असणार्‍या साउंड इफेक्ट्स मुळे ह्या अनोख्या कंदिलांच्या नगरीची सफर रमणीय होते.

वर उल्लेख केलेला निळूभाऊ ड्रॅगन पोर्सेलिन च्या डिश, प्लेट्स, सूप बोल्स आणी स्पून्स वापरून बनवलेला आहे.



हा आगळा वेगळा लँटर्न फेस्टिव्हल अनुभव खूप खूप अविस्मरणिय होता.



रंगांची उधळण आणि दिव्यांच्या रोषणाईने आसमंत भरून गेला !

स्वप्नातले रंग नवे....
आकाशातले असंख्य दिवे !!

तुम्हा सर्वांना दिवाळीच्या खूप खूप शुभेच्छा !

:) शुभ दिपावली :)

11/05/2012

झटपट आकाशकंदिल

दिवाळीपूर्वी कंदिलांचे आकाश शोधून देखील आम्हाला घरी लावता येईल असा आकाशकंदिल नाही मिळाला.
मग आम्ही हा झटपट आकाशकंदिल बनवला.

पेपर चा कंदिल बनवुन त्यावर ग्लिटर गम ने बॉर्डर काढली आणि खाली लाल रंगाच्या झिरमिळ्या लावल्या.

आतल्या पेपर वर पणती आणि मोराचे नक्षीकाम केलेय. स्मित

ही झटपट आकाशकंदिलाची कृती



तीन सारख्या रूंदीचे पेपर. पैकी A ची उंची सर्वात कमी आहे. B ची उंची त्यापेक्षा २-३ इंच जास्त C ची उंची आणि रुंदी सारखी आहे. चौरस आहे.

चित्रात दाखवल्या प्रमाणे A च्या कडा चिकटवुन सिलेंडर बनवायचा आहे. चित्रात A1. त्यापूर्वी त्यावर हाताने किंवा स्टेन्सिल ने डिझाईन काढून कटर ने कटींग करुन घ्यावे.

आता पेपर B ला चित्रात दोन रेषा दाखवल्या आहेत त्याप्रमाणे वरून खालून साधारण एक इंच अंतर सोडून कट मारून घ्यावेत. मग A1 आणि B एकमेकांवर चिकटवावे. B ची उंची जास्त असल्याने कंदिल मध्यभागी गोलाकार फुगीर दिसेल. तेच जर B ला मध्यभागी (अर्धी उंची) घडी केली तर अजुन वेगळ्या आकाराचा कंदिल बनु शकतो.

(B च्या वरच्या खालच्या किनार्‍यांवर डिझाईन काढायचे असेल तर चिकटवण्या आधी काढलेले चांगले. मी ते आकाशकंदिल बनवुन झाल्यावर त्याची सजावट केल्याने मला फार अवघड पडले. कंदिलाचा फुगिर भाग.. मधल्या नाजुन पट्ट्या तुटू न देता सांभाळत नक्षी काढावी लागली. )

आता चित्रात दाखवल्या प्रमाणे C ला वर एक इंच जागा सोडून सारख्या अंतरावर कटर ने कट्स मारून झिरमिळ्या तयार करुन C चा वरचा भाग A1 आणि B च्या खालच्या भागाला आतुन चिकटवुन घ्यावा.
इथे रिबन वगैरे लाउ शकता. पण एकसारख्या अंतरावर लावणे वेळखाउ काम होईल. म्हणून एकाच कागदाच्या झिरमिळ्या. स्मित

ही अगदी सोप्प्या आकाशकंदिलाचि कृती आहे. ह्यावर हवे तसे आपण सोनेरी लेस वगैरे लाउन सजावट करु शकतो. A1 च्या सिलेंडर वर कटवर्क करून आतल्या बाजूने रंगित जिलेटिन लावल्यास अजून छान रंगीत प्रकाश पडेल.

10/10/2012

सखो कचोरी

मायबोली गणेशोत्सवाच्या निमित्ताने पाककृती स्पर्धा आयोजित केल्या होत्या. स्पर्धेचं नाव होतं मिसळम पाकम गट्टम गट्टम… आहे की नाही गमतीशीर ? स्पर्धेचे नियमही वेगळे आणि मजेशीर होते. मजेशीर म्हणण्यापेक्षा जरा हटके. नियमावली मध्ये सांगितलेले जिन्नस वापरून मिसळम करून पाकम करायचे होते. आणि तोच बाप्पा ला नैवेद्य :) मी बनवलेली नवीनच पाककृती इथे तुमच्या सर्वांसोबत शेअर करतेय. आणि हो मला माझ्या ह्या पाककृती साठी स्पर्धेत पहिला क्रमांक मिळालाय बरंका !
तर सादर आहे मिसळम पाकम गट्टम गट्टम… सफरचंद खोबरे कचोरी म्हणून सखो कचोरी

लागणारा वेळ:  १ तास
लागणारे जिन्नस: 


सफरचंद १
उकडलेले बटाटे मध्यम आकाराचे २-३
तांदळाचे पिठ १ वाटी
खोबरे १ वाटी
खजुर ८-१०
मिर्च्या ४-५
लाल मिर्ची पावडर १ चमचा
जिरे १ टेबल्स्पून
कढिपत्ता ६-७ पाने
मुठभर कोथिंबीर बारीक चिरुन
मीठ आणि साखर चवीप्रमाणे
तळण्यासाठी तेल
क्रमवार पाककृती: 

प्रकाशचित्र डाविकडून उजवीकडे क्रमवार

१. सफर चंद किसून घेतले.
२. एका पॅन मध्ये चमचाभर तेल तापवुन त्यात जिरे बारिक चिरलेल्या मिर्च्या आणि कढिपत्ता टाकुन चुरचुरीत फोडणी केली. त्यात अर्ध्या सफरचंदाचा किस टाकुन जरा सोनेरी रंग येई पर्यंत परतुन घेतले. मग त्यात खवलेले खोबरे घालुन त्यावर चविप्रमाणे मीठ साखर घालुन परतले. मुठभर बारिक चिरलेली कोथिंबीर टाकुन गॅस बंद केला. हे कचोरीचे सारण गार होई पर्यंत पुढे पारी बनवण्याची तयारी केली.
३. उकडलेले बटाटे किसुन त्यात वाटीभरुन तांदळाचे पिठ चमचाभर तेलाचे मोहन, चवीप्रमाणे मीठ आणि लागल्यास थोडेसे पाणी लाउन घट्ट गोळा मळून घेतला.
४. एका बोल मध्ये खजुर घेउन त्यात अर्धी वाटी पाणी टाकून १ मिनिटे हाय वर मायक्रोवेव्ह केले. मग त्यात उरलेल्या अर्ध्या सफरचंदाचा किस, थोडे भाजलेले जिरे आणि चवीप्रमाणे लाल तिखट व मिठ घालून चटणी मिक्सरवर वाटून घेतली. चटणीला एक उकळी काढली.
५. चटणी थंड होई पर्यंत. तेल तापायला ठेउन, पारीसाठी बनवलेल्या गोळ्यातले थोडे पिठ घेउन त्याची हाताने वाटी करुन त्यात एक मोठ्ठा चमचा सारण भरुन गोळे बंद केले. सोनेरी रंगावर सर्व कचोर्‍या तळून काढल्या.
वाढणी/प्रमाण: 
खाल तेवढ्या.. :) वर दिलेल्या साहित्याच्या प्रमाणात ११ मोठ्या कचोर्‍या होतात.
अधिक टिपा: 
ह्या कचोर्‍या तिखट आंबट गोड मस्त चवीच्या होतात.
सफरचंदाची मस्त चव येते.
सारणामध्ये थोडेसे मनुके आणि काजु तुकडे टाकता येतील.
बटाटे उकडण्यापूर्वी त्यावर सुरीने मध्यभागी चिर देउन उकडले (वर फोटो पहा) तर सोलताना एका झटक्यात साल निघुन येते. स्मित
तांदळाचे पिठ आणि बटाटा वापरल्याने पारी मस्त खुट्खुटीत होते. (क्रिस्पी + सॉफ्ट पण कडक नव्हे )

आणी हे माझं बक्षिस :)