दिवाळी हा दिव्यांच्या रोषणाईचा, रंगिबेरंगी रांगोळ्यांचा, गोडधोड खाण्याचा, पण दिवाळी आली की खरी रोषणाई होते ती कंदिला मुळेच, बाजारात अनेक रंगाचे ढंगाचे आकाशकंदिल बघायला मिळतात. पण लहानपणी कंदिलांची मज्जाच न्यारी होती. पतंगाच्या काडया, झाडू मध्ये भरीला घातलेल्या काडया, तर कधी बांबू उभा चिरुन त्या वेताच्या काठीने चांदणी बनवायची, त्यावर रंगीत पतंगाचा कगद लावायचा. हा पहील्या टप्प्याचा कंदिल, मग त्या काठ्यांचा विमानाचा आकार.. जहाजाचा आकार, कॉलनी मध्ये टांगायला भला मोठा कंदील. त्या नंतर आले जिलेटीन पेपर, मग र्थर्माकोल ह्या पद्धतीने कंदिल निर्मीतीला आणि कलात्मकतेला खुप वाव दिला.
नंतर नंतर व्याप वाढले... दिवाळीची सुट्टी कमी झाली, आणि घरी बनवल्या जाणार्या कंदिलाची जागा बाजारातील झगमगीत कंदिलाने घेतली. पण कंदिलाचं महत्व आणि मज्जा कधीच कमी झाली नाही. आपला कंदिल काही तरी वेगळा आणि उठवदार असायलाच हवा, हे प्रत्येकाचं स्वप्न. मुलांबरोबर कंदील खरेदीची खरी मजा.. हा नको तो... तो वरचा मोठा.. तो नको... तो छान नाही आहे. मुलांचं लक्ष कंदिलावर आणि आमचं त्याच्या प्राईज टॅगवर. दुतर्फा दुकानांवर टांगलेले कंदील आणि त्यातून चाललेली आमची टुर...
हा नको रे फाटेल, अरे हा दुमडून ठेवता येणार नाही, महाग आहे फार दिवाळी नंतर काय करायचं? येवढा मोठ्ठा कंदील लावायचा कुठे? जेवढे कंदील तेवढे आढेवेढे. छान आहे ठेऊ जपून, ह्याचा नंतर घरी हँगिग लँप करू, माझ्या मित्राने केवढा मोठ्ठा घेतला आहे, मला हाच आवडला... कीती ते कंदिल.. आणि किती त्या मागण्या... पण एकाही कंदिलावर आमचं एकमत होईना.
"ए आई SS हे बघ काय मस्त आहे ! तो बघना .. "
"तुला ना कंदिलाच्या जगात नेऊन सोडायला पाहीजे.. "
"अगं आई असं काय करतेस ? बघना.. ये एकडे लव्व्कर."
"अरे कुठे घेउन चाललास... अरे दुकानं संपली ..."
"नाही..नाही... ते बघ तिथे अजुन कंदील आहेत ते बघ ना... "
"अरे थांब !", म्हणे पर्यंत हा.. हात सोडुन पळाला सुद्धा...
"आई SS SS मी ईथे..."
"अरे कुठे?"
"बघ मी कंदीलाच्या जंगलात आलो आहे."
"अरे काय वेड लागलंय का तुला ?"
आणि पहाते तर काय तो खरंच कंदिलाच्या जंगलात घुसला होता, खुप कंदिल असलेलं जंगल !
नाही... कंदीलांचं खर जंगल.. इथे झाडांना कंदिल नव्हते, झाडंच कंदिल होती..
कंदिलाची पानं, कंदिलाचे खोड, फळं देखील कंदिल... हे काही तरी अजबच घडत होत, स्वप्न तर नाही ना... सांगुन खर वाटेल का कुणाला ?
काय करावं सुचत नव्हतं आणि तेव्हढ्यात हातातला फोन धाऊन आला मदतीला... म्हंटल ह्याचे फोटो घेउ.. स्वप्न असेल तर जंगल आणि कॅमेरा दोन्ही गायब...
आणि नसेल तर.... मायबोलीकरांसाठी वृतांत :)
भरभर फोटो घेतले..
हा जंगलातुन पुढे पळतोय हाका मारातोय...अन मी त्याच्या मागे मागे
अरे बाप रे हे काय? येवढ मोठ्ठ नगर द्वार ते देखील कंदिलाचं ...
ही नगरीच होती आगळी वेगळी कंदिलाची....
चटकदार लाल रंगाचे छत
"अगं आई ... हे बघ पांडे ! "
अग्गो बाई. आला का इथेही ह्याचा दबंग चुलबुल पांडे.
"अगं चुलबुल पांडे नाही गं खरे खुरे पांडे."
बाजुचे देशपांडे असतील.. असं वाटलं...पण नाही....
अरे ओ पांडा ..... कितने पांडे है ? :)
गमतीशीर पांडा परिवार खेळण्यात मग्न होता.
"आईगं हे बघ पर्यांचा महाल...."
"चल रे, काहीतरी काय ? .. उगाच पळु नकोस पुढे पुढे."
पण समोरचे दृष्य बघुन मी आश्चर्यचकीत झाले. कळेना की ह्याची स्वप्ने खरी होताहेत ? की मीच स्वप्नात आहे ?
खरंच एक भव्य दिव्य परिमहल समोर होता.
एव्हढा सुंदर झगमगता चमचमता पर्यांचा महाल, पण तोही होता एक मोठ्ठा कंदिल !
"आई, ये ना गं इकडे. बघ केवढी मोठ्ठी बाग आहे."
असे म्हणत तो मला ओढत असताना आम्ही बागेत पोहोचलो सुद्धा.
किती ते रंगीबिरंगी मश्रूम ! त्यावर सुंदर सुंदर पक्षी .. खारुताई खेळताहेत.
तर कुठे त्यावर ससुल्या बागडतोय.
आणि क्षणात चमचमणार्या इटुकल्या पिटुकल्या फुलपाखरांचे थवे पाहून आपण जणू काही नाभी चा अवतार घेउन निबीरू प्लॅनेटवर असल्याचा भास झाला.
वेणी होती....पण छे मागे शेपूट नव्हतेच ! :)
कसला नाभी अन कसलं काय? आपला रोजचाच अवतार ! :D
तलावात सुंदर कमळं फुलली होती. कमळाच्या मोट्ठाल्या पानांवर बसून कुणी एक शापीत राजपुत्र डरॉव .. डरॉव करत होता.
म्हणजे आता कुठेतरी परी दिसायलाच हवी. माझा तर्क अगदी खरा निघाला.
एक मत्स्यकन्या तिच्या प्रियकराच्या विरहात अश्रू ढाळत होती, तिचे अश्रू शिंपलीत पडून मोती होत होते... तिची समजूत काढायला.. तिला समजवायला.. खोल समुद्रतळाशी तिच्याशी हितगुज करत होते ऑक्टोपस..पाणघोडे आणि चमचमते चित्ताकर्षक मासे.
हा सी हॉर्स
आणि बाकी मित्रमंडळी
ह्या मित्रांच्या गप्पांमध्ये गुंगलो असतानाच एक मोठ्ठी डरकाळी कानावर आली. मागे वळून बघतोय तर काय हा भलामोठा डायनोसोअर !
"आई पळ..पळ !"
मागे डायनोसोर्स चे झुंड धावत येत होते.
एवढा मोठा महाकाय पार्कमधून साखळ्या तोडून धावत होता.
"आई ज्युरासिक पार्क ............ तो ही कंदिलांचा !! " :D
"तुझे कंदिलांचे वेड मलाही वेड लावणार आहे." :)
इतक्यात समोरून टेक्सास मधले लॉन्ग हॉर्न्स चाल करून आले. आता आली का पंचाईत ?
पण ते लाँग हॉर्न आमच्याकडे नव्हे तर डायनोसोअर वर धावुन गेले. मला मात्र त्यातल्या एका गोजिरवाण्या वासराची चिंता ....
एवढ्या मोठ्या डायनओसोर्स समोर ह्या लॉन्ग हॉर्न चा निभाव लागेल का ? असे वाटत असतानाच तिथे हा अतिप्रचंड ड्रॅगन प्रकट झाला.
ह्याला बघून डायनोसोर्स ने जी धूम ठोकली ते काही परत आले नाहीत !
"थॅम्क्यु रे बाबा. हेल्प केलीस !"
हा निळूभाउ ड्रॅगन आमचा दोस्त बनला. मग आम्ही ड्रॅगनच्या पाठीवर बसून स्वर्गलोकीच्या मंदिराकडे निघालो. वाटेत सातासमुद्राची सफर करुन आलेले फ्लेमिंगो दिसले.
रस्त्याच्या दुतर्फा तर्हेतर्हेची आगळीवेगळी फुले बहरली होती.
फुलांच्या गर्दीतून मुंग्यांची लगबग दिसली. कुणी बाळमुंग्या घसरगुंडी खेळत होत्या...
तर कुणी सि-सॉ खेळत होत्या.
तर मोठ्या कुणी वाद्यवृंद जमवुन ऑकेस्ट्रॉ भरवला होता.
कसली बरं लगबग एवढी ?
"ही तर मुंगीची वरात आहे चालली", ड्रॅगन ने माहीती पुरवली.
खरंच की नवरी मुंगी डोलीतून आहे चालली.
अरे ही काही नुसतीच वरात नाही तर फुल्ल बँड बाजा बारात आहे !
मुंग्यांची वरात बघताना स्वर्गलोकीचं मंदीर केव्हा आलं कळलंच नाही आणि आम्ही मंदिराच्या दाराजवळ येउन थबकलो.
मंदिराच्या द्वारावर चार यक्ष ड्रॅगन उभे होते.
आमच्या निळूभाउ ड्रॅगनने त्याना घाबरायची गरज नाही सांगितले आणि आम्ही पुढे चालू लागलो.
आणि समोर भव्यदिव्य मंदिर नजरेस पडले. हेच ते ६०० वर्षांपूर्वी बांधलेले टेम्पल ऑफ हेवन !!
मंदिराच्या प्रांगणात मोरांची जोडी होती.
तिथेच शेजारी मॅगपिज् जोडपं चहकत होतं. ह्यालाच म्हणतात " द चार्म ऑफ मॅगपिज् !"
ये अजब कंदिल नगरी तो फुल्ल फिल्मी हय...
अबब !!! हा रामलिलेतला रावण इथे कसा आला ? आणि त्याला एक .. दोन .. चार सात.. पंचवी.................स तोंडे. हा हा हा हा...
"आई हा बघ...स्टॅच्यु ऑफ लिबर्टी चा कंदिल"
"अरे केव्हढे कंदिल बघितले तरी अजुन तुझे कंदिल पुराण संपेनाच ?"
आणि कंदिलांच्या राज्यातून मी लेकासोबत बाहेर पडले, कंदिल तर घेतलाच नाही !!
असो. खूप पकवलं ना तुम्हाला ? :D
घटकाभर तुम्हा माबोकरांचं स्वप्नरंजन केलं. गोष्ट जरी स्वप्न पडल्यासारखी असली तरीही फोटो मात्र खरेच आहेत हो.
ह्या कंदिलांच्या राज्यात तुम्ही सुद्धा जाउ शकता. हे कंदिलांचं विश्व तुम्ही सुद्धा पाहू शकता. ही स्वप्नवत नगरी प्रत्यक्षात उतरली आहे डॅलस टेक्सास इथे स्टेट फेअर पार्क च्या प्रांगणात.
हि सगळी प्रकाशचित्रे चायनिज लॅन्टर्न फेस्टिव्हल २०१२ ची आहेत.
चायनीज दिपोत्सव (Chinese Lantern Festival 2012)
मुख्य प्रवेशद्वार
हे सुंदर, मोठ्ठे, रंगिबेरंगी आकाशकंदिल फक्त तारा आणि सॅटिन च्या कापडाच्या सहाय्याने बनवलेले आहेत. काही कलाकृती हेलीकॉप्टरच्या मदतीने तळ्याच्या मधोमध उतरवून तर्हेतर्हेचे देखावे उभे केले आहेत. देखाव्यातले बरेच प्राणी, पक्षी, फुलपाखरे,मोरांची जोडी, सगळे पांडा, आणि निळा ड्रॅगन ही चलतचित्रे आहेत. सोबतीला असणार्या साउंड इफेक्ट्स मुळे ह्या अनोख्या कंदिलांच्या नगरीची सफर रमणीय होते.
वर उल्लेख केलेला निळूभाऊ ड्रॅगन पोर्सेलिन च्या डिश, प्लेट्स, सूप बोल्स आणी स्पून्स वापरून बनवलेला आहे.
हा आगळा वेगळा लँटर्न फेस्टिव्हल अनुभव खूप खूप अविस्मरणिय होता.
रंगांची उधळण आणि दिव्यांच्या रोषणाईने आसमंत भरून गेला !
स्वप्नातले रंग नवे....
आकाशातले असंख्य दिवे !!
तुम्हा सर्वांना दिवाळीच्या खूप खूप शुभेच्छा !
:) शुभ दिपावली :)
No comments:
Post a Comment