Showing posts with label फोटूगिरी. Show all posts
Showing posts with label फोटूगिरी. Show all posts

3/30/2014

लोलक



चम्हालातु चंमतग चंगुसा ?  आर्ट फ़ेस्ट मध्ये भटकता भटकता सहज एक स्टॉल आला समोर. एक मुलगी आपल्या बापा सोबत निरनिराळ्या आकाराचे ट्प्पोरे क्लियर क्रिस्टल्स वापरून विंड चाइम्स आणि  सनकॅचर बनवत होती. तिचे वडील गेली २३ वर्षे हे काम करत आहेत आणि ती आता आता शिकतेय वगैरे वगैरे माहिती सांगू लागली…  पण तेवढ्यात माझं लक्ष गेलं त्या मोठ्या टपोऱ्या  षटकोनी लोलका वर. आणि मग न कळतच मी त्याच्या अंतरीच्या गूढ गर्भी  स्वत:ला शोधायला लागले.….  आणि अडकले त्या इंद्रधनुष्यी नोस्टेल्जियात.

लहान पणी हरवलेला माझा लोलक आठवला. कोणे एके काळी किचेन्स जमा करायचा छंद जडला होता. एक एक करत चांगल्या २७ किचेन्स जमवल्या होत्या. त्यात सर्वात महागाचं होतं ते काचेरी लोलक. मला अजुनही आठवतंय. मिण्टी बॅंके मध्ये  एशियाड च्या शिक्क्यंची रुपयाची नाणी साठवून चांगले तीस रुपयाला घेतली होती ती किचेन. आई साहेबांचा ओरडाही खाल्ला होता. सर्वात आवडतं म्हणून मग सायकलची किल्ली अडकवली त्यात. सुंदर चकचकीत होता तो लोलक. उन्हात एका विशिष्ठ कोनात धरल्यावर काय सुरेख सप्तरंगी कवडसे पडायचे मग त्याचे…. एका ना दोन तर पूर्ण भिंतीभर खूप सारे अगणीत. मग बरेच दिवस मला खेळच जडला होता त्याचा. कधी माझ्या लाडक्या कुत्र्याला जॉनी ला ते कवडसे पकडायला लावायची तर कधी स्वता:च्या डोळ्यासमोर धरून डोळा आरश्यात पहायचा. निरनिराळ्या  रंगाच्या…  आकाराच्या वस्तू त्यातून निरखत बसायचं. गुंजा फार सुंदर दिसायच्या त्या लोलकातून. टपोर्या बटाट्या एव्हढ्या डोळ्यांसारख्या.

एकेदिवशी आईनं एक फॉर्म द्यायला बँकेत पाठवलं. गेले सायकल घेउन. आणि निघताना चावी पडली हातातून तस्सं  किचेन मधून तुटून टूण्णकन तो लोलक गेला काउंटरच्या फ़टीत जाउन असा अडकला … काही केल्या निघेना…. निराश होऊन घरी आले… हरवलाच तो लोलक कायमचा….

वारुळातून मुंग्या एका मागोमाग बाहेर याव्या तस्सच असतं अगदी आठवणींचं… मी हरवलेच होते नोस्टेल्जियात…. त्या वाऱ्यावर हलणाऱ्या सन कॅचर मधल्या लोलकाचे फोटो काढले आणि मुलांना तो क्रिस्टल आणि त्याची सप्तरंगी मजा दाखवली….


शांता बाईंच्या  कवितेतली मुलगी लहानपणीची मीच होते जणुकाही…

तुला माहिती आहे ?
गवत नसतं नुसतं हिरवं
आणि आभाळ नसतं  नुसतं निळं
आणि माणसं असतात इंद्रधनुष्याची  बनलेली

 


 

 

2/20/2014

का चिंता करिसी ? (ग्वाटेमालन वरी डॉल्स)



परवा मुलांच्या शाळेत मल्टी कल्चरल डे  झाला त्यात एक नवाच देश समजला. ग्वाटेमाला. म्हणजे मला ह्या आधी तरी कधी अश्या कुठल्या देशाचे नाव ऐकिवात नव्ह्ते. मेक्सिको आणि सेन्ट्रल अमेरिकेच्या मधे असलेला अगदी छोटुस्सा देश. देश जरी अगदी छोटासा पण फार फार इण्टरेस्टींग माहिती मिळाली ह्या देशाबद्दल. इथली स्पॅनिश संस्कृती, लोक, त्यांचे पेहराव वगैरे सगळेच खूप रंगबिरंगी दिसायला सुंदर. सगळी मोहक कलाकुसर बघुन कुणालाही ह्याबद्दल अजून माहीती घ्याविशी वाटेल. माहिती सांगणार्‍या स्वयंसेविकेने खूप छान ओळख करुन दिली आपल्या देशाची. ह्या देशाची खासियत असलेल्या कुकीज आणि सरबत सुद्धा दिलं.

माहिती ऐकत असतानाच समोर ठेवलेल्या सुंदर लाकडी डब्या आणि अगदी इंचभर पण नसतील इतक्या छोट्याश्या बाहुल्यांवर नजर गेली.

"धिस इस फॉर यु मॅम" असे म्हणत तिने दोन बॉक्स माझ्या हातात दिले. म्हणाली "यु हॅव टू लव्ली किड्स, डॉल्स विल प्रोटेक्ट देम फ्रॉम फियर !"

माझ्या चेहर्‍यावरच्या आश्चर्याचे भाव बघून ती म्हणाली "आवर स्पेश्यल ग्वाटेमालन वरी डॉल्स "


ह्याच त्या ग्वाटेमालन वरी डॉल्स चिंता नाहीश्या करणाऱ्या बाहुल्या.

ह्या बाहुल्या साधारणतः १ इंच (२.५४ से.मी) इतक्या आकाराच्या असतात. एका सुंदर डबित किंवा छोट्याश्या बटव्यात ५ किंवा ६ बाहुल्यांचा एक सेट ठेवलेला असतो. लहानश्या काड्यांच्या तुकड्यांना रंगिबेरंगी कापडाच्या चिन्ध्या किंवा तर्‍हे तर्‍हेचे दोरे गुंडाळून वापरून बनवतात. नाजूकश्या असल्या तरी फार महाग नसतात. सर्व सामान्यांना घेता आणि वापरता याव्या म्हणून अगदी मामुली दरात विकत मिळतात.

ह्या बाहुल्यांची कहाणी फारच रंजक वाटली मला. ह्या पिटुकल्या बाहुल्या म्हणे रात्री झोपताना लहान मुलांच्या उशाला ठेवायच्या म्हणजे मुलांना कशाची भिती वाटत नाही कोणतीच वाईट स्वप्ने पडत नाहीत, मुले चिंतामुक्त होउन शांत आरामशीर झोपी जातात.

मायन संस्कृती पासून ह्या वरी डॉल्स वापरात आहेत म्हणे. ग्वाटेमालन लोकांची अशी समजूत आहे की रोज रात्री मुले झोपण्या पूर्वी आपली भिती, चिंता किंवा ज्या काय तक्रारी असतील त्या ह्या डबितल्या एकेका बाहुलीला एक चिंता सांगतात. आणि बाहुल्या उशीखाली ठेउन झोपी जातात. ग्वाटेमालन पालक मुलांना समजवण्यासाठी मग रात्रीतून एक एक बाहुली उशीखालून काढुन टाकतात. मुले चिंतामुक्त होण्यासाठी ! सगळ्या चिंता बाहुल्यांना देउन मुले बिनघोर झोपी जातात. सकाळी उठल्यावर सर्व चिंता भिती बिती सबकुछ गायब.

रियल लाईफ मध्ये अश्या वरी डॉल्स असत्या तर किती बरं झालं असतं नै ? कल्पनेतच सुख असतं !! आपल्याला काय ?

हकुना मटाटा…. डोण्ट वरी बी हैप्पी :)

4/15/2013

एका तळ्यात होती बदके पिले सुरेख……

माझ्या घराजवळच्या लायब्ररी मागे एक सुंदर तळं आहे. सूर्यास्ता पुर्वी संध्याकाळी तिथे रेंगाळत तळ्यातल्या बदकांचे खेळ बघत टाईमपास करायचा मला हल्ली छंदच  लागलाय. ह्या एकाच तळ्यातल्या बदकांचे आणि त्यांच्या सुरेख पिल्लांचे वेगवेगळ्या वेळी घेतलेले हे फोटोज… फोटोवर टिचकी मारली की मोठे फोटो दिसतील :)


 हेच ते सुंदर तळं… खरच आहे की नाही छान ?





 हम दो … और हमारे….  बाराह !!!



पिल्लांची आई भोवती लगबग

आई मी काय खाऊ गं  ? ए आई ही बघ आमचे फोटो काढतेय… आई चल आपण तिकडे जाऊ या…
ए मला पण आई जवळ जायचय… अरे बाबा कुठेय ?




पुन्हा एकदा सहपरिवार

तो सर्वात मागे दिसतोय ना तो वेडा बदक्या का कुणास ठाउक ह्या परिवाराला त्रास देत होता.
ह्या पिल्लांच्या बाबा बदकाला फड्फड उडून क्वॅक क्वॅक करून टोचायचा.. की लगेच बदकी आणि एखादं धिटूकलं बाळंही उलट प्रतिकारात्मक प्रहार केल्यासारखे त्याच्या अंगावर धावायचे. मग पुन्हा आपले लगबगीने सहपरीवार दुसर्‍या किनार्‍याकडे.. इकडे तिकडे...कारंजाभोवती.... फिरत होते... टूबूडुबू.. क्वॅक क्वॅक... तासभर तेच नाटक चालले होते.




संधिप्रकाशात अजून जे सोने  ?



अंधारून आलं … चला बाळांनो पटकन घरी परतायला हवं !



 

3/18/2013

खार बाई खार... नाजूक नार !



खारुताई....मला आठवतंय मी बघितलेली पहिली खार म्हणजे माझी लहानपणीची मिन्टी मनी बँक. म्हणजे काय तर प्लॅस्टीकची मिन्टी पैसे साठवायची. आपल्या पोस्ट खात्याने दिलेली तिही गाजरी गुलाबी रंगाची. त्यावरून खरी खार कशी असते कशी दिसते ह्याची कल्पना येणार तरी कशी ? आता त्या चिमुकल्या वयात खार कुठे खर्ररी खुर्ररी बघितलेली ? आजीला विचारलं तर आजी म्हणायची मी दाखवेन तुला एकदा कधीतरी. माळावर दिसतात कधी कधी खारुट्या आंब्याचा मोहोर खाताना. तो पर्यंत अश्याच एका छोट्या खारुटीची गोष्ट ऐक.. खारीचा वाटा... मग आजी मला रामाची गोष्ट सांगायची. रामाने वानरांच्या सहाय्याने कसा समुद्रसेतू बांधला.…  प्रत्येक दगडावर श्रीराम' 'श्रीराम' असे लिहिल्याने सगळे दगड कसे पाण्यावर तरंगले... आणि मग ते दगड एकमेकांना घट्ट चिकटवण्याच्या कामात एका धिटूकल्या पिटूकल्या खारीने आपल्या चिमुकल्या मदतीने चिखल भरायचे काम केले. तोच खारीचा महत्वाचा वाटा. आजीच्या ह्या अश्या गोड गोष्टी ऐकत रात्री कधी झोप लागायची ते समजायचंच नाही. पण  मग तरीही खारींबद्दलचे कुतुहल काही संपत नव्ह्ते.

पुढे केव्हातरी मला नदीकाठच्या विष्णूमंदीरी खारूताई दिसलीही. पण चपळच फार निट निरखता पारखता यायाचेच नाही. नंतरही ती खारूताई मला भेटतच राहिली कधी बालगितांमधून तर कधी कुठल्या सुंदर  चित्रांमधून. आताशा तर मुलांच्या व्हिडिओज मध्ये काय सुंदर अ‍ॅनिमेशन असते. एकदम गोंडस खारुताई.  आपल्याकडे भारतात आजवर पाहिलेल्या सगळ्या खारी अगदी पिटूकल्या. उंदराएव्हढ्या छोट्याश्या.  बंगळूरला असताना बरेचदा सकाळी मी चहा घेत घेत बालकनीतून ह्या चिमुरड्या खारींचे खेळ बघत बसायची. आंब्याला मोहोर आला की ह्यांची पळापळ सुरू. कधीकधी उगाच कुठ्ल्या कार च्या खालून सुर्रकन पळायच्या आणि मग तो गाड्यांचा सेक्यूरिटी आलार्म सुईईईईईईईंग्ग्ग्ग्ग्ग्ग्ग्ग्ग्ग्ग्ग्ग्ग् कन वाजायला लागायचा आणि मग घाबरलेल्या त्या सगळ्या खारींचा सामुदाईक टिवटीवाट चालायचा. एकेकदा तर अर्धा अर्धा तास आवाज करून जीव नकोसा करून सोडायच्या. थंडी वाढायच्या आधी लगबग घरटे निट करायची घाई. कुठून कुठून मऊशार बुरकुले, पिसं, पालापाचोळा झाडाच्या डोलीत गोळा करून घर उबदार करायाला लुटुपुटु घाई. तर कधी हिवाळ्याची तरतूद  खाऊ लपवून ठेवायची तयारी. सतत कसलीतरी लगबग नाहीतर भिती. एकदाही फ़ोटोत सापडायच्या नाहीत.

ही तस्शीच एक भित्री भागुबाई. फोटो काढे पर्यंत पळाली सुद्धा.


इथे टेक्सास ला आल्यापासून मला  खारी आणि ससेही खूप दिसतात. रस्त्यावरून जाता येता आणि पार्कमध्ये बेंचवर बसून राहिल्यावरही  मला त्यांचे खेळ निरखत बसायला खूप आवडतं.  खारींना वातावरणात घडणारे चढउतार फार चटकन आणि आधीच समजतात आणि त्यादृष्टीने तसे वातावरण बदलायच्या आधीच ह्या चिमुरड्यांची  तयारी सुरु होते. टेक्सास मध्ये चांगल्या मोठ्या खारी आहेत. त्यांना फॉक्स स्क़्विरल्स म्हणतात. त्यांच्या अंगावर कोल्ह्यांसारखी पिवळसर झाक असते. आणि शेपटीही खूप मोठे गोंडेदार. "पडेल थंडी तेव्हा माझ्या शेपटीची मल्लाच बंडी" हे अगदी खरे वाटावी अश्शी सुंदर झुपकेदार.  इथे खूप ओक वृक्ष आहेत . त्या ओक वृक्षांची फळं  म्हणजेच  एकॉर्न्स खारींना खूप आवडतात.

ही एक खारुटी तिचा एकॉर्न खात बसलिये.

गंमत म्हणजे ह्या लबाड खारी हुशारही तितक्याच आहेत. हिवाळा आला की ह्यांचे विंटर हायबरनेशन जोरात सुरु असते. मिळतील तसे एकॉर्न्स दोन हातात धरून फ़ोडून खातात. कधी पूर्ण तर कधी नुसतेच कुरतडून कुठेतरी नेउन मातीमध्ये पाचोळ्याच्या खाली पुरून लपवून ठेवतात. हा त्यांचा खाऊ खायला पक्के वाटेकरी म्हणजे इथले पक्षी करडी कबुतरे आणि निळे जे (ब्लू जे). जसे जसे वातावरण थंड होत जाते तसे ह्या दिसेनाश्या होतात. पण जात मात्र कुठेच नाहीत. लपून राहातात आपल्या बागेतल्या बिळांमध्ये नाहीतर झाडावरच्या घरट्यांत. जरा हवा उबदार झाली थोडंस्सं उन आलं की आल्या ह्या माती उकरायला आणि लपवलेले एकॉर्न्स खायला. 


काय अद्भूत आहे देव आणि त्याची ही सृष्टीही. ह्या खारीनी पुरलेले पेरलेले आणि बरेचदा पुन्हा उकरून वर न काढलेले असे बरेच एकॉर्न्स पुन्हा खोल मातीत रुजतात, अंकुरतात आणि त्यांचे नव्याने मोठे उंच ओक वृक्ष बनतात.  अशा प्रकारे हे चिमुकले जीव वातावरणाचा समतोल राखण्यासाठी खऱ्या अर्थाने आपला खारीचा वाटा उचलतात.

राम आणि लंकेचा रामसेतू खरा की खोटा ते देव जाणे. पण मी मात्र माझ्या दोन छोट्या चिपमंक्स ना ह्या खर्याखुर्या खारीच्या वाट्याची गोष्ट सांगते आणि खारुताई  दिसली की  मुलांसोबत गाणंही  गाते……

खार बाई खार
नाजूक नार
शेपूट तिचे
किती झुपकेदार….

खार बाई खार
चपळ फार
क्षणात होते
नजरे पार ….


11/12/2012

कंदिलांचे आकाश

दिवाळी हा दिव्यांच्या रोषणाईचा, रंगिबेरंगी रांगोळ्यांचा, गोडधोड खाण्याचा, पण दिवाळी आली की खरी रोषणाई होते ती कंदिला मुळेच, बाजारात अनेक रंगाचे ढंगाचे आकाशकंदिल बघायला मिळतात. पण लहानपणी कंदिलांची मज्जाच न्यारी होती. पतंगाच्या काडया, झाडू मध्ये भरीला घातलेल्या काडया, तर कधी बांबू उभा चिरुन त्या वेताच्या काठीने चांदणी बनवायची, त्यावर रंगीत पतंगाचा कगद लावायचा. हा पहील्या टप्प्याचा कंदिल, मग त्या काठ्यांचा विमानाचा आकार.. जहाजाचा आकार, कॉलनी मध्ये टांगायला भला मोठा कंदील. त्या नंतर आले जिलेटीन पेपर, मग र्थर्माकोल ह्या पद्धतीने कंदिल निर्मीतीला आणि कलात्मकतेला खुप वाव दिला.

नंतर नंतर व्याप वाढले... दिवाळीची सुट्टी कमी झाली, आणि घरी बनवल्या जाणार्‍या कंदिलाची जागा बाजारातील झगमगीत कंदिलाने घेतली. पण कंदिलाचं महत्व आणि मज्जा कधीच कमी झाली नाही. आपला कंदिल काही तरी वेगळा आणि उठवदार असायलाच हवा, हे प्रत्येकाचं स्वप्न. मुलांबरोबर कंदील खरेदीची खरी मजा.. हा नको तो... तो वरचा मोठा.. तो नको... तो छान नाही आहे. मुलांचं लक्ष कंदिलावर आणि आमचं त्याच्या प्राईज टॅगवर. दुतर्फा दुकानांवर टांगलेले कंदील आणि त्यातून चाललेली आमची टुर...

हा नको रे फाटेल, अरे हा दुमडून ठेवता येणार नाही, महाग आहे फार दिवाळी नंतर काय करायचं? येवढा मोठ्ठा कंदील लावायचा कुठे? जेवढे कंदील तेवढे आढेवेढे. छान आहे ठेऊ जपून, ह्याचा नंतर घरी हँगिग लँप करू, माझ्या मित्राने केवढा मोठ्ठा घेतला आहे, मला हाच आवडला... कीती ते कंदिल.. आणि किती त्या मागण्या... पण एकाही कंदिलावर आमचं एकमत होईना.

"ए आई SS हे बघ काय मस्त आहे ! तो बघना .. "

"तुला ना कंदिलाच्या जगात नेऊन सोडायला पाहीजे.. "

"अगं आई असं काय करतेस ? बघना.. ये एकडे लव्व्कर."

"अरे कुठे घेउन चाललास... अरे दुकानं संपली ..."

"नाही..नाही... ते बघ तिथे अजुन कंदील आहेत ते बघ ना... "

"अरे थांब !", म्हणे पर्यंत हा.. हात सोडुन पळाला सुद्धा...

"आई SS SS मी ईथे..."

"अरे कुठे?"

"बघ मी कंदीलाच्या जंगलात आलो आहे."

"अरे काय वेड लागलंय का तुला ?"

आणि पहाते तर काय तो खरंच कंदिलाच्या जंगलात घुसला होता, खुप कंदिल असलेलं जंगल !

नाही... कंदीलांचं खर जंगल.. इथे झाडांना कंदिल नव्हते, झाडंच कंदिल होती..
कंदिलाची पानं, कंदिलाचे खोड, फळं देखील कंदिल... हे काही तरी अजबच घडत होत, स्वप्न तर नाही ना... सांगुन खर वाटेल का कुणाला ?

काय करावं सुचत नव्हतं आणि तेव्हढ्यात हातातला फोन धाऊन आला मदतीला... म्हंटल ह्याचे फोटो घेउ.. स्वप्न असेल तर जंगल आणि कॅमेरा दोन्ही गायब...

आणि नसेल तर.... मायबोलीकरांसाठी वृतांत :)

भरभर फोटो घेतले..



हा जंगलातुन पुढे पळतोय हाका मारातोय...अन मी त्याच्या मागे मागे

अरे बाप रे हे काय? येवढ मोठ्ठ नगर द्वार ते देखील कंदिलाचं ...



ही नगरीच होती आगळी वेगळी कंदिलाची....



चटकदार लाल रंगाचे छत




"अगं आई ... हे बघ पांडे ! "

अग्गो बाई. आला का इथेही ह्याचा दबंग चुलबुल पांडे.

"अगं चुलबुल पांडे नाही गं खरे खुरे पांडे."
बाजुचे देशपांडे असतील.. असं वाटलं...पण नाही....

अरे ओ पांडा ..... कितने पांडे है ? :)




गमतीशीर पांडा परिवार खेळण्यात मग्न होता.

"आईगं हे बघ पर्‍यांचा महाल...."

"चल रे, काहीतरी काय ? .. उगाच पळु नकोस पुढे पुढे."

पण समोरचे दृष्य बघुन मी आश्चर्यचकीत झाले. कळेना की ह्याची स्वप्ने खरी होताहेत ? की मीच स्वप्नात आहे ?

खरंच एक भव्य दिव्य परिमहल समोर होता.
एव्हढा सुंदर झगमगता चमचमता पर्‍यांचा महाल, पण तोही होता एक मोठ्ठा कंदिल !



"आई, ये ना गं इकडे. बघ केवढी मोठ्ठी बाग आहे."

असे म्हणत तो मला ओढत असताना आम्ही बागेत पोहोचलो सुद्धा.

किती ते रंगीबिरंगी मश्रूम ! त्यावर सुंदर सुंदर पक्षी .. खारुताई खेळताहेत.



तर कुठे त्यावर ससुल्या बागडतोय.



आणि क्षणात चमचमणार्‍या इटुकल्या पिटुकल्या फुलपाखरांचे थवे पाहून आपण जणू काही नाभी चा अवतार घेउन निबीरू प्लॅनेटवर असल्याचा भास झाला.

वेणी होती....पण छे मागे शेपूट नव्हतेच ! :)
कसला नाभी अन कसलं काय? आपला रोजचाच अवतार ! :D



तलावात सुंदर कमळं फुलली होती. कमळाच्या मोट्ठाल्या पानांवर बसून कुणी एक शापीत राजपुत्र डरॉव .. डरॉव करत होता.



म्हणजे आता कुठेतरी परी दिसायलाच हवी. माझा तर्क अगदी खरा निघाला.

एक मत्स्यकन्या तिच्या प्रियकराच्या विरहात अश्रू ढाळत होती, तिचे अश्रू शिंपलीत पडून मोती होत होते... तिची समजूत काढायला.. तिला समजवायला.. खोल समुद्रतळाशी तिच्याशी हितगुज करत होते ऑक्टोपस..पाणघोडे आणि चमचमते चित्ताकर्षक मासे.



हा सी हॉर्स



आणि बाकी मित्रमंडळी



ह्या मित्रांच्या गप्पांमध्ये गुंगलो असतानाच एक मोठ्ठी डरकाळी कानावर आली. मागे वळून बघतोय तर काय हा भलामोठा डायनोसोअर !



"आई पळ..पळ !"
मागे डायनोसोर्स चे झुंड धावत येत होते.



एवढा मोठा महाकाय पार्कमधून साखळ्या तोडून धावत होता.



"आई ज्युरासिक पार्क ............ तो ही कंदिलांचा !! " :D

"तुझे कंदिलांचे वेड मलाही वेड लावणार आहे." :)

इतक्यात समोरून टेक्सास मधले लॉन्ग हॉर्न्स चाल करून आले. आता आली का पंचाईत ?



पण ते लाँग हॉर्न आमच्याकडे नव्हे तर डायनोसोअर वर धावुन गेले. मला मात्र त्यातल्या एका गोजिरवाण्या वासराची चिंता ....



एवढ्या मोठ्या डायनओसोर्स समोर ह्या लॉन्ग हॉर्न चा निभाव लागेल का ? असे वाटत असतानाच तिथे हा अतिप्रचंड ड्रॅगन प्रकट झाला.



ह्याला बघून डायनोसोर्स ने जी धूम ठोकली ते काही परत आले नाहीत !

"थॅम्क्यु रे बाबा. हेल्प केलीस !"
हा निळूभाउ ड्रॅगन आमचा दोस्त बनला. मग आम्ही ड्रॅगनच्या पाठीवर बसून स्वर्गलोकीच्या मंदिराकडे निघालो. वाटेत सातासमुद्राची सफर करुन आलेले फ्लेमिंगो दिसले.



रस्त्याच्या दुतर्फा तर्‍हेतर्‍हेची आगळीवेगळी फुले बहरली होती.



फुलांच्या गर्दीतून मुंग्यांची लगबग दिसली. कुणी बाळमुंग्या घसरगुंडी खेळत होत्या...
तर कुणी सि-सॉ खेळत होत्या.



तर मोठ्या कुणी वाद्यवृंद जमवुन ऑकेस्ट्रॉ भरवला होता.



कसली बरं लगबग एवढी ?

"ही तर मुंगीची वरात आहे चालली", ड्रॅगन ने माहीती पुरवली.

खरंच की नवरी मुंगी डोलीतून आहे चालली.



अरे ही काही नुसतीच वरात नाही तर फुल्ल बँड बाजा बारात आहे !




मुंग्यांची वरात बघताना स्वर्गलोकीचं मंदीर केव्हा आलं कळलंच नाही आणि आम्ही मंदिराच्या दाराजवळ येउन थबकलो.

मंदिराच्या द्वारावर चार यक्ष ड्रॅगन उभे होते.



आमच्या निळूभाउ ड्रॅगनने त्याना घाबरायची गरज नाही सांगितले आणि आम्ही पुढे चालू लागलो.

आणि समोर भव्यदिव्य मंदिर नजरेस पडले. हेच ते ६०० वर्षांपूर्वी बांधलेले टेम्पल ऑफ हेवन !!



मंदिराच्या प्रांगणात मोरांची जोडी होती.



तिथेच शेजारी मॅगपिज् जोडपं चहकत होतं. ह्यालाच म्हणतात " द चार्म ऑफ मॅगपिज् !"



ये अजब कंदिल नगरी तो फुल्ल फिल्मी हय...

अबब !!! हा रामलिलेतला रावण इथे कसा आला ? आणि त्याला एक .. दोन .. चार सात.. पंचवी.................स तोंडे. हा हा हा हा...



"आई हा बघ...स्टॅच्यु ऑफ लिबर्टी चा कंदिल"



"अरे केव्हढे कंदिल बघितले तरी अजुन तुझे कंदिल पुराण संपेनाच ?"




आणि कंदिलांच्या राज्यातून मी लेकासोबत बाहेर पडले, कंदिल तर घेतलाच नाही !!

असो. खूप पकवलं ना तुम्हाला ? :D

घटकाभर तुम्हा माबोकरांचं स्वप्नरंजन केलं. गोष्ट जरी स्वप्न पडल्यासारखी असली तरीही फोटो मात्र खरेच आहेत हो.

ह्या कंदिलांच्या राज्यात तुम्ही सुद्धा जाउ शकता. हे कंदिलांचं विश्व तुम्ही सुद्धा पाहू शकता. ही स्वप्नवत नगरी प्रत्यक्षात उतरली आहे डॅलस टेक्सास इथे स्टेट फेअर पार्क च्या प्रांगणात.

हि सगळी प्रकाशचित्रे चायनिज लॅन्टर्न फेस्टिव्हल २०१२ ची आहेत.

चायनीज दिपोत्सव (Chinese Lantern Festival 2012)

मुख्य प्रवेशद्वार



हे सुंदर, मोठ्ठे, रंगिबेरंगी आकाशकंदिल फक्त तारा आणि सॅटिन च्या कापडाच्या सहाय्याने बनवलेले आहेत. काही कलाकृती हेलीकॉप्टरच्या मदतीने तळ्याच्या मधोमध उतरवून तर्‍हेतर्‍हेचे देखावे उभे केले आहेत. देखाव्यातले बरेच प्राणी, पक्षी, फुलपाखरे,मोरांची जोडी, सगळे पांडा, आणि निळा ड्रॅगन ही चलतचित्रे आहेत. सोबतीला असणार्‍या साउंड इफेक्ट्स मुळे ह्या अनोख्या कंदिलांच्या नगरीची सफर रमणीय होते.

वर उल्लेख केलेला निळूभाऊ ड्रॅगन पोर्सेलिन च्या डिश, प्लेट्स, सूप बोल्स आणी स्पून्स वापरून बनवलेला आहे.



हा आगळा वेगळा लँटर्न फेस्टिव्हल अनुभव खूप खूप अविस्मरणिय होता.



रंगांची उधळण आणि दिव्यांच्या रोषणाईने आसमंत भरून गेला !

स्वप्नातले रंग नवे....
आकाशातले असंख्य दिवे !!

तुम्हा सर्वांना दिवाळीच्या खूप खूप शुभेच्छा !

:) शुभ दिपावली :)