10/30/2013

पारंपरिक आकाश कंदिल होममेड आणि हँडमेड :)


 नमस्कार मंडळी !

झाली का दिवाळीची तयारी ?
दिवाळी म्हणजे फ़राळ. . .  तो फ़राळाचा दरवळ, दिवाळी म्हणजे तोरणे रांगोळ्या फुलांच्या सजावटी . . . .  दिवाळी म्हणजे दिव्यांचा लखलखाट, माळा…. पणत्या आणि मुख्य म्हणजे आपला घरादाराची शान वाढवणारा आकाशकंदिल.

मी शक्यतो पारंपरिक पद्धतीचा रंगित कागदाचा बनवलेला आकाशकंदिल प्रेफर करते. आणि तो मला स्वत:ला बनवायला आवडतो. मागच्या वर्षी इथे शेअर करायला उशीर केला म्हणून काही फ्रेंड्स नाराज होते. म्हणून आज दिवाळीच्या आधीच तुमच्याशी हे फोटो शेअर करतेय.

कृती अगदी सोप्पी विनासायास आणि कुठेही सहज मिळणाऱ्या साहित्यात हा आकाश कंदिल बनवता येण्यासारखा आहे. ना कटकट तेही झटपट. आपला आकाशकंदिल चायना मेड पेक्षा होममेड आणि  हँडमेड असेल तर आनंद द्विगुणित नक्कीच होईल हो ना ?

चला तर बघुया कसा बनवलाय आकाश कंदिल.

(फ़ोटोवर टिचकी मारल्यास मोठे फोटो दिसतील )


साहित्य काय काय आहे ? रंगित कागद, कात्री, गम आणि स्टेपलर. झालंच तर न वापरात्या सीडीज आणि एक सोनेरी लेस बास इतकच.

फोटोत  दाखवल्या प्रमाणे कोणत्याही ब्राईट कलरचा एक मोठा थोडासा जाड पेपर.  मी ९ इंच बाय १६ इंच आकाराचा पेपर कापून त्याला  गोल स्टेपल करून सिलेंडर बनवला. हा मुख्य पेपर जर जाड असेल तर त्यावर हवी ती नक्षी कोरून कापून घ्या म्हणजे प्रकाश बाहेर पडल्यावर सुंदर दिसेल.

आपल्या आवडीप्रमाणे रंगितपेपर्स ६ बाय ६ चे चौकोन कापून घेतले. नागमोड्या कात्रीने पेपरच्या किनारींना नक्षी तयार केली. आणि त्रिकोणात दुमडून पिन लाऊन टाकली. मग हे असे बनवलेले त्रिकोण त्या गोलाकार सिलेंडर वर इंद्रधनुशी मिळतेजुळते जवळ जवळ ठेऊन चिकटवून घेतले. तुम्ही तुमच्या आवडती रंगसंगती घ्या.




नंतर सिलेंडर च्या वरच्या आणि खालच्या किनारीला लेस लावली आणी दुसरा एक रंगीत पेपर कापून खाली झिरमिळ्या चिकटवल्या. आकाशकंदिल वर लावण्या पुर्वी त्यात लाईट बल्ब लाऊन सिलेंड्रिकल शेप च्या वरच्या बाजूला झाकणासारखी सीडी लावल्यास सीडी च्या चकचकीत पणा मुळे जास्त प्रकाश परावर्तीत होईल.


झाला इंद्रधनुशी आकाश कंदिल तय्यार. आहे की नाही खरच सोप्पा ?

शुभ दिपावली !

ही दिवाळी तुम्हा सर्वांना आनंदाची, सुखसमृद्धीची उत्तम आरोग्याची आणि भरभराटीची जावो !

संपदा