Showing posts with label चारोळ्या. Show all posts
Showing posts with label चारोळ्या. Show all posts

9/24/2014

अशी रंगली मेहंदी

अशी रंगली मेहंदी
रेषा गेल्या पुसून
प्राक्तनात रुसलेले
सुख आले खुलून




10/10/2012

सोबत


आपली स्वतःची सावली देखील
आपल्या सोबत चालत नसते
कुणा एका सूर्याच्या इशार्‍यानुसार
आगे मागे धावत असते . . .













10/20/2011

ध्यास . . .


मन झालंय हलकं पीस
गळ्यातच दाटला श्वास
क्षणो क्षणी श्वासा संगे
तिला आता त्याचा ध्यास !! 

1/13/2009

प्राक्तन . . .

तुझं माझं अस्तित्व

आकाशात शोधताना

प्राक्तनच रूसून बसलं

रेषा रेषा जुळवताना . . .

स्पंदन . . .

नात्यांना नसावीत नावे

असावा फ़क्त अर्थ

मनातल्या स्पंदनाशिवाय

नात्यांचं अस्तित्वच व्यर्थ . . .

रानफूल . . .

वार्‍याच्या त्या स्पर्षानं

रानफूल वेडं उमललं

त्याच्या सोबत डोलताना

फुलायचं कसं विसरलं ?

स्वप्नओंजळ . . .

पहाटे उगवत्या क्षितिजावर

दवांत भिजूनी रात्र सरते

हताश माझ्या स्वप्न ओंजळी

नुसतेच दाट धुके उरते . . .

आंदण . . .

शब्द मी जपून ठेवले
आजच्या आपल्या भेटी साठी
तूच त्यांना दिलंस आंदण
कुणा एका अबोली साठी . . .

निवडुंग . . .

काट्याचं टोचणं
तसं नित्य होतं
निवडुंगाचं फ़ुलणं
मला नवं होतं . . .

ब्रह्मसंबंध . . .

नियतिच्या काळोखात
माझ्या स्वप्नांचा गाव
प्राक्तनाचा उसनाच
ब्रह्मसंबंधाचा आव !

आस . . .

विखूरलेली सारी स्वप्नं
अन उसवलेला माझा श्वास
रितंच सारं आयुष्य
तरीही जगण्याची खुळी आस . . .

1/12/2009

गोठणं

जडावलेल्या पापणीत

आसवांचं गोठणं

तुला शोधत तुझ्यासवे

माझी मी हरवणं . . .

विरस

तुझ्या आठवांची
अंतरी पुसट खूण
क्षितिजाशी रेंगाळणारं
विरस बावरं उन . . .

एक रात्र

एक रात्र मनातली
स्वप्नं दवांत भिजलेली
चांदण्या मुठीत घेउन
आकाश पांघरून निजलेली

एक रात्र अशीच
आकाश पांघरून निजलेली
गात्र-न-गात्र चेतवून
तुझ्या मिठीत विझलेली . . .

मोती

चांद खुणवी नभातून
चांदण्या देह जाळती
जडावल्या पापण्यांतून
निसटून जाई मोती

अंगोपांगी

सूर्यास्ताला एक क्षण

तुझ्या मिठीत मिटला

तरसण्याचा अनुभव देऊन

माझ्या अंगोपांगी भिनला . . .

देहभान

आकंठ श्वास

उन्माद बेभान

तुझेच आभास

हरपतं देहभान . . .

प्रीत पावरी

अर्णवाची जशी
लाट मुकी बावरी
माझ्या ओठी सखया
तुझीच प्रीत पावरी. . .

अनावर

कुंतलात रात गुंतली
तुझ्या अधरांची धुंदी
अनावर पहाटेची
सूर्योदयाला बंदी. . .

मदालस

मदालस स्पर्ष तुझा

बावर्‍या तनूवर

विसावतो रोम- रोम चेतवून

श्वास माझा उसवतो. . .