3/30/2014

लोलकचम्हालातु चंमतग चंगुसा ?  आर्ट फ़ेस्ट मध्ये भटकता भटकता सहज एक स्टॉल आला समोर. एक मुलगी आपल्या बापा सोबत निरनिराळ्या आकाराचे ट्प्पोरे क्लियर क्रिस्टल्स वापरून विंड चाइम्स आणि  सनकॅचर बनवत होती. तिचे वडील गेली २३ वर्षे हे काम करत आहेत आणि ती आता आता शिकतेय वगैरे वगैरे माहिती सांगू लागली…  पण तेवढ्यात माझं लक्ष गेलं त्या मोठ्या टपोऱ्या  षटकोनी लोलका वर. आणि मग न कळतच मी त्याच्या अंतरीच्या गूढ गर्भी  स्वत:ला शोधायला लागले.….  आणि अडकले त्या इंद्रधनुष्यी नोस्टेल्जियात.

लहान पणी हरवलेला माझा लोलक आठवला. कोणे एके काळी किचेन्स जमा करायचा छंद जडला होता. एक एक करत चांगल्या २७ किचेन्स जमवल्या होत्या. त्यात सर्वात महागाचं होतं ते काचेरी लोलक. मला अजुनही आठवतंय. मिण्टी बॅंके मध्ये  एशियाड च्या शिक्क्यंची रुपयाची नाणी साठवून चांगले तीस रुपयाला घेतली होती ती किचेन. आई साहेबांचा ओरडाही खाल्ला होता. सर्वात आवडतं म्हणून मग सायकलची किल्ली अडकवली त्यात. सुंदर चकचकीत होता तो लोलक. उन्हात एका विशिष्ठ कोनात धरल्यावर काय सुरेख सप्तरंगी कवडसे पडायचे मग त्याचे…. एका ना दोन तर पूर्ण भिंतीभर खूप सारे अगणीत. मग बरेच दिवस मला खेळच जडला होता त्याचा. कधी माझ्या लाडक्या कुत्र्याला जॉनी ला ते कवडसे पकडायला लावायची तर कधी स्वता:च्या डोळ्यासमोर धरून डोळा आरश्यात पहायचा. निरनिराळ्या  रंगाच्या…  आकाराच्या वस्तू त्यातून निरखत बसायचं. गुंजा फार सुंदर दिसायच्या त्या लोलकातून. टपोर्या बटाट्या एव्हढ्या डोळ्यांसारख्या.

एकेदिवशी आईनं एक फॉर्म द्यायला बँकेत पाठवलं. गेले सायकल घेउन. आणि निघताना चावी पडली हातातून तस्सं  किचेन मधून तुटून टूण्णकन तो लोलक गेला काउंटरच्या फ़टीत जाउन असा अडकला … काही केल्या निघेना…. निराश होऊन घरी आले… हरवलाच तो लोलक कायमचा….

वारुळातून मुंग्या एका मागोमाग बाहेर याव्या तस्सच असतं अगदी आठवणींचं… मी हरवलेच होते नोस्टेल्जियात…. त्या वाऱ्यावर हलणाऱ्या सन कॅचर मधल्या लोलकाचे फोटो काढले आणि मुलांना तो क्रिस्टल आणि त्याची सप्तरंगी मजा दाखवली….


शांता बाईंच्या  कवितेतली मुलगी लहानपणीची मीच होते जणुकाही…

तुला माहिती आहे ?
गवत नसतं नुसतं हिरवं
आणि आभाळ नसतं  नुसतं निळं
आणि माणसं असतात इंद्रधनुष्याची  बनलेली

 


 

 

3/12/2014

बनाना मफिन्स

बनाना मफिन्स


साहित्य :
१ स्टिक अन्सोल्टेड बटर
१ कप ब्राउन शुगर किंवा बाऊन शुगर नसेल तर आपली साधी रोजची साखर सुद्धा  चालेल.
१अंडं
३ मध्यम आकाराची पण खूप पिकलेली केळी मॅश करून.
३ टेबलस्पून दही (प्लेन योगर्ट)
१ टीस्पून प्युअर वॅनिला इसेन्स
१ १/२ कप कणीक किंवा मैदा किंवा ऑल पर्पज फ्लार ह्या पैकी काहीही एक चालेल.
१ टीस्पून बेकिंग सोडा
१ टीस्पून वेलची किंवा दालचिनी पूड (आपल्या आवडीनुसार)
१/४ टीस्पून मिठ

थोडेसे मनुके आणि ड्राय्फ़्रुट्स चे काप (पेकंस बदाम अक्रोड पिस्ते यापैकी काहीही )

कृती

ओवन ३५० डिग्री Farenhit वर प्रीहिट करून ठेवा.

कणीक/ मैदा किंवा ऑल पर्पज फ्लार जे वापरणार असाल ते बेकींग सोडा मिक्स करून चाळून घ्या.

एका काचेच्या बोल मध्ये बटर आणि  साखर मिक्स करून अगदी क्रीम सारखे हलके होई पर्यंत फेटून घ्यायचे.

मग त्यात एक अंडे घालून फ़ेटायचे. नंतर त्यात मॅश केलेली केळी, दही आणी वॅनिला इसेन्स असे सगळे क्रमवार घालून मिश्रण चांगले ढवळायचे.

नंतर  हळूहळू कणीक/ मैदा किंवा ऑल पर्पज फ्लार मिक्स करून घ्या व अलगद हाताने मिश्रण ढवळा. आता त्यात मनुके, ड्रायफ्रूट  चे काप वगैरे टाका.

केक किंवा मफिन्स ट्रे मध्ये पेपर कपस घालून त्यात मिश्रण घालून मग ओवन मध्ये ३५ मिनीटे बेक करा. सुइ किंवा टूथपिक टोचून बघा जर काडीला काही लागले नसेल तर केक चांगला बेक झाला आहे. थोडावेळ थांबून मग सगळे मफिन्स वायर रॅक वर गार होण्यासाठी ठेवा. 

वर दिलेल्या साहित्यात १२ ते १६ मफिन्स किंवा साधारण ४० एक मिनी मफिन्स बनतात.
हे बनाना मफिन्स छोट्या  मुलांना शाळेत डब्यात द्यायला एकदम मस्त आहेत. भरपूर आणि पोटभर तेही पौष्टिक. मोठ्यांनाही एक कप चहा किंवा कॉफी सोबत ब्रेकफ़ास्ट ऑन द गो म्हणून मस्तच !
 

1/18/2014

मरमेड केक

लेकीचा बर्थ डे होता. एका आठवड्यात चार पाच वेगवेगळे ऑप्शन्स सांगून झाले कधी आई मला बटर्फ्लाय चा केक तर कधी मिनी माउस चा... शेवटी गाडी आली मला मरमेड चा केक हवा आहे. आणि अनायसे समोर एक नवी कोरी मरमेड बार्बी मिळाली.  मग मी ह्या वेळी घरी केक करायचे ठरवले.

साधारण डोक्यात आयडीयाची  कल्पना मांडली. साहीत्याची जमवाजमव केली. वेगवेगळ्या आकाराचे बेसीक केक बेक करून घेतले. मरमेड आयलंड आणी पाणी असे काहीसे करायचे होते.

म्हणून चॉकलेट आणि वॅनिला आयसिंग सोबत निळे आयसिंग. मरमेड सोबत मोती चांगले दिसतील म्हणून पर्ल कॅन्डी आणि केक वर किंवा इतर पाण्यात टाकायला फिश  च्या आकाराच्या छोट्या स्प्रिंकलर कॅन्डी. पाणी कसे दाखवायचे ? मग जेली ची आयडीया सुचली..  एका भांड्यात जेली सेट करून घेतली.

केक ला बेस म्हणून एक मोठ्ठा चौरस आकाराचा  ट्रे घेऊन त्याला अल्युमिनियम  फॉइल लावली. मग दोन्ही मोठे केक मधोमध कापून त्याला व्हिप क्रीम लाऊन एकावर एक ठेवले. खालच्या गोल केक ला निळे आयसिंग केले वरच्या केक चा ला मरमेड ला बसवण्यासाठी त्रिकोणी खाच करून जागा करून घेतली. त्याचा रॉक दिसेल असा चोकलेटी आयसिंग करून आकार निट  केला.

 
मग हिरव्या  रंगाच्या आयसिंग ने पाण वनस्पती वेली  वगैरे काढले. निळ्या केक वर थोड्या थोड्या अंतरावर मोती लावले. ट्रे  मध्ये रिकाम्या जागेत फिश च्या आकाराची स्प्रिम्कल्र्स टाकून त्यावर जेली सेट केली. आणि तरीही थोडी जागा उरली मग त्यात उरलेल्या केक चा चुरा करून समुद्राची वाळू असल्याचा भास निर्माण केला. नंतर ऐनवेळी सुचले की  अरे आपल्याकडे शंखाच्या चॉकलेट मोल्ड आहेत मग ते चॉकलेट  बनवून त्या वाळूवर ठेवले. फायनली सगळे आयसिंग करून झाल्यावर पाण्यात पाय सोडलेली मरमेड त्यावर बसवली  हे सगळं प्रकरण केक कापे पर्यंत फ्रीज मध्ये ठेवले.

हि बघा छान  दिसतेय ना ?पार्टी आधी दोन तास आयसिंग करायला सुरु केले होते. केक करताना खूप धाकधूक होती . वेळेत नाही झाला तर….  चांगला नाही दिसला तर…  खूप गोड होईल का ? निट  दिसेल का ? ३०-३५ जणांच्या पार्टीला पुरेल का ?वगैरे वगैरे… पण केक एकदम मस्त झाला होता त्याचा अगदी फन्ना उडवला बच्चे कंपनी एकदम खुश ! लेक ज्याला त्याला दाखवून सांगत होती …  माझ्या मम्माने बनवला आहे केक. भरून पावले !

11/06/2013

चेहरे

मायबोली दिवाळी अंकात एका कवितेसाठी काढलेले हे माझे पेंटिंग. माध्याम अक्रेलिक ऑन कॅनवास. 
(मोठे चित्र पहाण्यासाठी चित्रावर टिचकी मारा) 
10/30/2013

पारंपरिक आकाश कंदिल होममेड आणि हँडमेड :)


 नमस्कार मंडळी !

झाली का दिवाळीची तयारी ?
दिवाळी म्हणजे फ़राळ. . .  तो फ़राळाचा दरवळ, दिवाळी म्हणजे तोरणे रांगोळ्या फुलांच्या सजावटी . . . .  दिवाळी म्हणजे दिव्यांचा लखलखाट, माळा…. पणत्या आणि मुख्य म्हणजे आपला घरादाराची शान वाढवणारा आकाशकंदिल.

मी शक्यतो पारंपरिक पद्धतीचा रंगित कागदाचा बनवलेला आकाशकंदिल प्रेफर करते. आणि तो मला स्वत:ला बनवायला आवडतो. मागच्या वर्षी इथे शेअर करायला उशीर केला म्हणून काही फ्रेंड्स नाराज होते. म्हणून आज दिवाळीच्या आधीच तुमच्याशी हे फोटो शेअर करतेय.

कृती अगदी सोप्पी विनासायास आणि कुठेही सहज मिळणाऱ्या साहित्यात हा आकाश कंदिल बनवता येण्यासारखा आहे. ना कटकट तेही झटपट. आपला आकाशकंदिल चायना मेड पेक्षा होममेड आणि  हँडमेड असेल तर आनंद द्विगुणित नक्कीच होईल हो ना ?

चला तर बघुया कसा बनवलाय आकाश कंदिल.

(फ़ोटोवर टिचकी मारल्यास मोठे फोटो दिसतील )


साहित्य काय काय आहे ? रंगित कागद, कात्री, गम आणि स्टेपलर. झालंच तर न वापरात्या सीडीज आणि एक सोनेरी लेस बास इतकच.

फोटोत  दाखवल्या प्रमाणे कोणत्याही ब्राईट कलरचा एक मोठा थोडासा जाड पेपर.  मी ९ इंच बाय १६ इंच आकाराचा पेपर कापून त्याला  गोल स्टेपल करून सिलेंडर बनवला. हा मुख्य पेपर जर जाड असेल तर त्यावर हवी ती नक्षी कोरून कापून घ्या म्हणजे प्रकाश बाहेर पडल्यावर सुंदर दिसेल.

आपल्या आवडीप्रमाणे रंगितपेपर्स ६ बाय ६ चे चौकोन कापून घेतले. नागमोड्या कात्रीने पेपरच्या किनारींना नक्षी तयार केली. आणि त्रिकोणात दुमडून पिन लाऊन टाकली. मग हे असे बनवलेले त्रिकोण त्या गोलाकार सिलेंडर वर इंद्रधनुशी मिळतेजुळते जवळ जवळ ठेऊन चिकटवून घेतले. तुम्ही तुमच्या आवडती रंगसंगती घ्या.
नंतर सिलेंडर च्या वरच्या आणि खालच्या किनारीला लेस लावली आणी दुसरा एक रंगीत पेपर कापून खाली झिरमिळ्या चिकटवल्या. आकाशकंदिल वर लावण्या पुर्वी त्यात लाईट बल्ब लाऊन सिलेंड्रिकल शेप च्या वरच्या बाजूला झाकणासारखी सीडी लावल्यास सीडी च्या चकचकीत पणा मुळे जास्त प्रकाश परावर्तीत होईल.


झाला इंद्रधनुशी आकाश कंदिल तय्यार. आहे की नाही खरच सोप्पा ?

शुभ दिपावली !

ही दिवाळी तुम्हा सर्वांना आनंदाची, सुखसमृद्धीची उत्तम आरोग्याची आणि भरभराटीची जावो !

संपदा