12/23/2010

तूर वांगं


लागणारा वेळ:
३० मिनिटे

लागणारे जिन्नस:
मध्यम आकाराची वांगी ६,
तूरीचे दाणे १ मोठ्ठी वाटीभरून (तूरीच्या हिरव्यागार टपोरे दाणे असलेल्या शेंगांचे दाणे भरपूर निघतात आणि चविष्ठही असतात.
कांदे २,
एक छोटास्सा टोमॅटो,
सुके खोबरे (पाव वाटीचा तुकडा किंवा अंदाजे पसाभर आकाराचा तुकडा)
तिळ २ चमचे,
धणेपूड, जिरेपूड प्रत्येकी एक छोटा चमचा,
१ चमचा कांदा लसूण मसाला,
१ चमचा गोडा(काळा) मसाला,
(मी कोल्हापूरातून येताना अभिरुचीचे आणले आहेत हे मसाले.. एकदम मस्त आहेत)
अर्धा चमचा लाल मिर्ची पावडर(किंवा कमी जास्त आवडीप्रमाणे)
आलं लसूण पेस्ट १ छोटा चमचा,
चविप्रमाणे मिठ,
हळद चिमुट्भर, फोडणीचे साहित्य -जिरं, मोहरी, हिंग

क्रमवार पाककृती:

सुकं खोबरं आणि तिळ खमंग भाजून घ्यावेत.
कांदा, टोमॅटो बारिक चिरून घ्यावेत.
वांगी स्वच्छ धुउन, देठ कापून देठाच्या बाजुने चिरा(प्लस साईन) देउन चिमुट्भर मिठ घातलेल्या पाण्यात ठेवावित.
वाटण : भाजलेले तिळ, खोबरे, बारिक चिरलेला थोडा कांदा आणि टोमॅटो एकत्र वाटून घ्यावेत. वाटताना वेगळे पाणि घालायचि गरज पडत नाही. कांदा आणि टोमॅटोमुळे.

कढईत तेल तापवून जिरं, मोहरी हिंग घालून खमंग फोडणी करावी.
मग त्यात बारिक चिरलेला कांदा टकून चिमुट्भर हळद घालून कांदा गुलाबीसर परतून घ्यावा.
मग त्यात आलंलसूण पेस्ट आणि तुरीचे दाणे टाकून दोन मिनिटे परतावे एक वाफ काढावी.
आता सगळे मसाले तिखट, कांदा लसुण मसाला, गोडा मसाला वगैरे घालून नंतर वाटण घालून दाणे साधारण शिजू लागले आणि वाटणाला किंवा ग्रेव्हीला तेल सुटू लागले की वांगी घालावी. मग थोडे परतून जेवढे पातळ हवे त्याप्रमाणे पाणि आणि चविप्रमाणे मिठ घालून भाजी शिजु द्यावी.
भाजी तयार झाल्यावर थोडीशी बारिक चिरलेली कोथींबिर वरून भुरभुरावी. आणि गरमागरम फुलके, भाकरी सोबत किंवा नुसत्या भातासोबतही छान लागते.


वाढणी/प्रमाण:
३-४ जणांसाठी

अधिक टिपा:

कांदा-टोमटो वाटणात वाटल्याने ग्रेव्हीला दाटसर पणा चांगला येतो आणि रंगही छान येतो.
शक्यतो कोथिंबिर वाटणात घालू नये. त्यामुळे काळसर रंग येतो.
गोडा मसाला काळा असतो.. म्हणून मी त्याच्या बरोबरीने कांदा लसूण मसाला वापरते.
गोडा मसाला नसेल तर गरम मसाला घालुनही चव चांगली झणझणित होते.
सुक्या खोबर्‍या ऐवजी ओले खोबरेही वापरु शकता.

10/20/2010

ज्ञानदेव म्हणे !!

अवचित परिमळू झुळकला अळूमाळू, मी म्हणे गोपाळू आला गे माये
चांचरती चांचरती बाहेरी निघाले, ठकचि मी ठेले काय करू

तो सावळा सुंदरू कासे पितांबरू, लावण्य मनोहरू देखियेला
भरलिया दृष्टी जंव डोळा न्याहाळी, तव कोठे वनमाळी गेला गे माये


बाप रखुमादेवीवरू विठ्ठल सुखाचा, तेणे काया-मन-वाचा-वेधियेले
अवचित परिमळू झुळकला अळूमाळू, मी म्हणे गोपाळू आला गे माये

संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर माउली...किती आणि काय बोलावं त्यांच्याविषयी ?
मंगेशकर भावंडांची सुश्राव्य ध्वनीफित ऐकताना मलाही ज्ञानदेवांच्या ह्या गुढ ओव्यांचा अर्थ शोधावासा वाटला. ज्ञानेश्वरांच्या एकेका ओळीवर डॉक्टरेट करणारी माणसे आहेत. ज्ञानाच्या इश्वराविषयी लिहायचे म्हणजे स्वतःच इश्वर व्हावे लागते. तिथे मी कोण पामर ?
भारतात अनेक संत महंत होउन गेले, पण स्वतःला इश्वर दर्शन कसे झाले ह्याविषयीचे लिखित काव्य फारसे कुणी लिहिले नाहिये. ज्ञानदेव इथे तेच तर सांगत नाहियेत ना ?

परमेश्वर कसा भेटला? कुठे भेटला ? तो कोणत्या रुपात होता ? हे सांगताना ज्ञानदेव म्हणतात, "अवचित परिमळू" अवचित म्हणजे अकल्पित मंद असा परिमळू म्हणजे सुगंध झळकला. साधनेत असा सुगंध आला म्हणजे परमेश्वर जवळच आला आहे अशी दिव्य अनुभूती साधकाला येते. म्हणूनच माउली म्हणतात, "माझा गोपाळ आला की काय असे मला वाटते आहे" . 'गो' म्हणजे इंद्रिय आणि 'पाल' म्हणजे इंद्रियांचे पालन करणारा आत्मा, जीवात्मा !! संपूर्ण शरण्यतेशिवाय, आत्मसमर्पणाशिवाय भगवंताचे दर्शन होउच शकत नाही.

म्हणून संत नेहमी स्वतःचा स्त्री संबधीत उल्लेख करतात. कबीर पण स्वतःला "करले सिंगार चतूर अलबेली" असं म्हणतात. इथे माउली सुद्धा स्वतःला 'आला गे माये' अशी भाषा वापरतात. चांचरती चांचरती बाहेरी निघाले, ठकची मी ठेले काय करू ? मी घाबरत देहभानावर आले पण तो गोपाळ मला माझ्यातच दिसला. मग मी कुणाला पाहू ? काय करू ? असा प्रश्न माउलींना पडतो..

'तो सावळा सुंदरू कासे पितांबरू लावण्य मनोहरू देखियेला' तो परमात्मा श्यामल शीत वर्णाचा असून अतिशय सुंदर आहे. पितांबर नेसलेला आहे आणि लावण्याची खाण आहे. राम कृष्ण विष्णू सगळे निलश्यामल रंगाचे असतात... पण असा कुणी माणूस आपण प्रत्यक्ष कधी पाहिला आहे का ? रक्त संचीत झालं ... साकळंलं की माणूस काळा निळा पडतो.. असं झालं की तो जगू शकत नाही. तरीही हे देव असे का.. ??

कदाचित उत्तर असेल 'कर्षती सा कृष्णा' सगळ्या जगाचा अंतीम कर्षण स्थान म्हणाजे कृष्ण विवर Black Hole. जगाचे मूळ म्हणजे कृष्णविवर अस्तित्वाचे विकीरण म्हणजे निलश्यामल रंग. म्हणून परमेश्वर अवस्था त्या रंगाची असावी. सर्व खरे भक्त योगी शरीराने सुंदर असतात. जणू शरीर हे कार्य उपकरण आहे. ते जेवढे सुंदर निर्मळ परिपूर्ण तेवढे कार्य उच्च.. म्हणून आकाश तत्वातील विष्णू राम कृष्ण त्रिभुवनसुंदर आहेत. त्या काळात पित वस्त्र नेसण्याची विशिष्ठ पद्धत होती म्हणून माउलींना तो मानाचे हरण करणारा लावण्य मनोहरू म्हणजे लावण्याचा मनोहर पुतळा दिसला असावा.

भरलिया दृष्टी जंव डोळा न्याहाळी, तव कोठे वनमाळी गेला गे माये
आता माझी दृष्टी परिपूर्ण झाली आहे त्या भरल्या दृष्टीने मी ज्यावेळेस सर्वत्र पाहू लागले त्यावेळी तोच मनोहर कान्हा दिसला.. मी आणि परमेश्वर जणू एकच झालो. पाहण्यासाठी दुसर्‍याची आवश्यकता असते. पहाणारा आणि पहाणे दोन्ही झाले आता मी काय पाहू ?

बोधोनी ठेले मन तंव झाले आन, सोकोनी घेतले माझे प्राण गे माये
मी आणि परमेश्वर एकच आहोत हा बोध जेव्हा मला झाला तेव्हा एक भयंकर अनुभव मला आला. माझा प्राण म्हणजे माझे सर्व अस्तित कर्षंण केले आहे असा भास मला झाला. ह्या कालपुरुष अवस्थेला माउली म्हणतात सोकोनी घेतले माझे प्राण गे माये.

मग भक्ताचे अस्तित्व नष्ट होउन भक्त भगवान झालेला अस्तो. म्हणून माउली म्हणतात..
बाप रखुमादेवीवरू विठ्ठल सुखाचा, तेणे काया-मन-वाचा-वेधियेले

माझे सारे अस्तित्व काया, मन, वाचा, बुद्धी आणि अहंकार ह्या विठ्ठलाने वेधून घेतले आहे. योग्याची संपूर्ण शरण्यतेची अवस्था आली म्हणजे शरीर सुस्त पडते, श्वास निरुद्ध होतो, रक्त स्तंभीत होते, त्यामुळे अन्न त्याग करून योगी देह ठेवतो. कार्य आटोपले की योगी आपला देह पंचतत्वात विलीन करतात. आद्य शंकराचार्य, संत तुकाराम, संत कबिर ह्यांनी असाच देहविलय केलाय. महान पुरुष कार्य संपल्यावर जास्त काळ थांबत नाहीत. म्हणूनच माउलींनी कार्य संपल्यावर आपल्या देहाला त्रास न देता समाधीत शरीर ठेउन इतरांना त्याचा लय दिसू दिला नाही. चौदा वर्षांचे असताना अद्भूत ज्ञानेश्वरी आणि अम्रुतानुभव लिहीले व एकविसाव्या वर्षी निरोप घेतला.

9/28/2010

चॉकलेटचं जंगल

असावा सुंदर चॉकलेट्चा बंगला....
असं आपल्यातल्या प्रत्येकाला लहानपणी एकदा तरी वाटलंच असेल.
पण त्याही पलिकडे जाउन असं चॉकलेटचं मोठ्ठ जंगल बघायला मिळालं तर ?
हे चॉकलेटचं जंगल प्रत्यक्षात उतरवलं होतं बेंगलोर शॉपिंग फेस्टिवल पॅलेस ग्राउंड येथे जस्ट बेक ह्या बेकर्स नी.