10/20/2009

संवाद अजय्-अतुल यांच्याशी

मायबोली दिवाळी अंकाचे यंदाचे दहावे वर्ष. दिवाळी संवाद निमित्त्याने अजय-अतुलशी झालेली ही बातचित इथे देत आहे.

-----------------------------

बस नाम ही काफी है ! असं आपण म्हणतो ना, काही नावं अशी असतात कि त्यांनी आपल्या क्षेत्रात स्वतःची एक वेगळी ओळख निर्माण केलेली असते. स्वतःचं एक स्थान निर्माण केलेलं असतं. अश्याच एका तरूण जोडीने मराठी मनात आपलं एक अढळ स्थान निर्माण केलेलं आहे. आणि ती जोडी म्हणाजे अजय अतुल.

आज मराठी माणसाला अजय अतुल ची ओळख करून देण्याची खरंच गरज नाही. ह्या दोघा भावांनी आपल्या अफाट प्रतिभेने व अथक परिश्रमाने संगीत क्षेत्रात आपलं एकमेवद्वितीय असं स्थान निर्माण केलं आहे. गेल्या काही वर्षांत ह्या जोडीने संगीत क्षेत्रात जणू काही क्रांतीच घडवून आणली आहे. मराठी चित्रपटगीतांना तर नवा श्वासच दिला. दर्जेदार, प्रयोगशील आणि तितक्याच यशस्वी रित्या गाणी संगीतबद्ध करण्यात त्यांचा हातखंडा आहे. दर्जेदार संगीत देण्याकरीता त्यांनी नुसताच वाद्यांचा मेळ घातला नाही, तर त्यांचा गाण्यांमध्ये लय-ताल-सूरांचे असे काही जादूई मिश्रण आहे की सान थोरांच्या मनाचा केव्हा ठाव घेतात ते कळतही नाही.

लोकांना वेगळं पण चांगलं काय देता येईल ह्याची उत्कृष्ठ जाण ह्या दोघा बंधूंना आहे. प्रत्येक गाण्यात काहीतरी नवीन प्रयोग करण्याचा प्रयत्न केला. गेल्या काही वर्षात दिलेल्या संगीतात मराठी लोकसंगीतापासून भावगीत, रॅप, हिप-हॉप, रॉक अशा सगळ्याच प्रकारांचा अत्यंत उत्कृष्टरीत्या वापर केला आहे.

ह्या जोडीच्या कामाची सुरुवात प्रारंभी विनती करत बाप्पाच्या गाण्यांनीच झाली. विश्वविनायक ह्या जगप्रसिद्ध अल्बम मध्ये अगदी पारंपारीक आरती, स्तोत्रंही वेगळ्या रूपात जगापुढे ठेवली. आणि ह्या वेगळेपणामुळे हा अल्बम जगात सगळीकडे आपलासा झाला.

संगीतकाराबरोबरच एक चांगले गायक म्हणूनही त्यांची ओळख आहे. अनेक कॉम्बो म्युझिकल गाणी आणि लोकगीतं त्यांनी स्वत:च गायली आहेत. त्या गाण्याला त्यांचा आवाज चपखल आणि साजेसा वाटतो. त्यांनी संगितबद्ध केलेल्या ‘सावरखेड एक गाव’ या चित्रपटातलं ‘वार्‍यावरती गंध पसरला’ हे गाणं असो किंवा ‘अगंबाई अरेच्चा’ मधलं अतिशय मधुर चालीचं ‘मन उधाण वा-याचे’ हे गाणं असो किंवा 'जत्रा' मधली कोंबडी, दे धक्का, साडे माडे तीन, उलाढाल, जोगवा, बेधुंद, एक डाव धोबी पछाड, सही रे सही किंवा लोच्या झाला रे सारखी मराठी नाटकं, सिरियल्स ची टायटल सॉन्ग्स, अनेक हिंदी चित्रपट, झी मराठी चे गौरवगीत..अगदी हिंदी, मराठी च्या पलिकडेही जाउन तेलगु चित्रपट गीतांनाही त्यांनी संगीत दिलं आहे. ही यादी खरंच न संपणारी आहे .....

मराठी संगीताला ते पाश्चिमात्य नजरेतून पाहतात हे त्यांचे वैशिष्ट्य आहे. मराठी संगीत आंतरराष्ट्रीय दर्जाचे का असू शकत नाही ? या संगीताला आंतरराष्ट्रीय दर्जा मिळवून देण्याचे स्वप्न त्यांनी बाळगले आहे. त्यासाठी हिंदी गाण्यांच्या तोडीची गाणी त्यांनी मराठीत निर्माण केली. इतकेच नाही, तर एस. पी. बालसुब्रमण्यम, हरिहरन, शंकर महादेवन, कुणाल गांजावाला, सुखविंदर, शान, चित्रा, सुनिधी चौहान, श्रेया, रिचा शर्मा, सुजाता अश्या अनेक अमराठी गायकांकडून मराठी गाणी गाउन घेतली आहेत.

अनेकोनेक पुरस्कारांनी त्यांना सन्मानित केलेले आहे. अश्या ह्या हरहुन्नरी सर्वस्पर्शी संगितकार द्वयींशी गप्पा मारण्याची संधी मिळाली. त्यांच्याशी केलेल्या ह्या अनौपचारीक गप्पांतून त्यांच्या कारकीर्दीचा आणि व्यक्तीमत्वाचा आढावा घेण्याचा हा एक प्रयत्न.

संपदा : विश्वविनायक हा तुमचा पहिला अल्बम, या बद्द्ल आम्हाला थोडं सांगाल का ? या मागची प्रेरणा काय होती ?

विश्वविनायक केला त्याला दोन कारणं आहेत एक म्हणजे म्हणजे प्रचंड राग होता...

अतुल : सुरुवात अशी झाली होती की तो काळ असा होता गायत्री मंत्र केला ..म्हणजे अगदी गायत्री मंत्र नाही, १०८ वेळा गायत्री मंत्राची किंवा कुठल्याही नामस्मरणाची कॅसेट, अश्या कॅसेट लाउन आवाज बारिक करून तुझ्या मनात नामस्मरण होणार आहे का ? स्वतः केलं तर त्याचा लाभ होतो. दुसरी गोष्ट पिक्चर च्या गाण्यांचा चालीवर गणपती बाप्पाची गाणी यायची आणी ती विकायचा प्रयत्न करायचे लोक. अगदी जुम्मा चुम्मा देदे आणि चोली के पिछे च्या चालीवरही गणपतीची गाणी निघाली होती.

तेव्हा आम्ही विचार केला...आचार्य अत्र्यांचं एक वाक्य आहे,"भारतातल्या इतर प्रांताना नुसताच भूगोल आहे.. पण आपल्या महाराष्ट्राला प्राचिन इतिहासही आहे !". आणि साहित्याबद्दलही तेच आहे शेकडो वर्षांपूर्वी, संत ज्ञानेश्वरांनी वयाच्या सतराव्या वर्षी ज्ञानेश्वरी लिहीली, ओम नमो जी आद्या सारखी काव्य लिहिली असे आपले प्रगल्भ साहित्य असतानाही आपण ह्या अश्या उथळ गोष्टी करायच्या का?
आपल्याला एवढी समृद्ध संस्कृती लाभलेली असतानाही आपण मात्र ही अशी चित्रपट गीतांवर आधारलेल्या गाण्यांतून देवाला स्मरतो आहे. आणि बनवणारे पण कोण ? ज्याना आम्ही फॉलो करतो तेच संगीतकार. खूप वाईट वाटलं.

देवांचा आदिदेव गणपती त्यासाठी काहीतरी करायची एक आंतरीक इच्छा होती. आपला देव केवळ आपला न रहाता तो सर्वांचा व्हावा असा त्या मागचा दृष्टिकोन होता. १४ विद्या ६४ कलेची देवता गणपती. प्रत्येक मूर्तिकाराला एकदा तरी त्याची मूर्ती घडवावी वाटते. चित्रकाराला सुंदर गणेशाचं चित्र काढावसं वाटतं. तसंच आम्हालाही आमच्या संगीतातून गणेशाला सादर करावसं वाटलं. मग जवळ जवळ दोन वर्ष गणपतीच्या पुराण कथा, स्तोत्र, आरती ह्याचा आम्ही अभ्यास केला. मग आपला हा लाडका देव फक्त मराठी हिंदी भाषिकांपुरता किंवा भारतापुरता मर्यादित न रहता तो त्याहीपलिकडे सातासमुद्रापार जाउन सर्वश्रुत व्हावा.. सगळ्यांचा लाडका व्हावा ह्या अपेक्षने विश्व विनायकची निर्मीती झाली. त्यासाठी प्रेरणा बाप्पानेच दिली. कर्ता करविता तोच !

संपदा : विश्वविनायक पहिलाच अल्बम हिट झाला, प्रसिध्दी मिळाली तेव्हा कसं वाटलं ?

नाही तो लगेच हिट नाही झाला. अल्बम रिलिज झाला तो अनंत चतुर्दशीला. गणपती विसर्जन झाले, सहा महिने, वर्ष लोट्लं तरी काही नाही. आमचं स्ट्र्गल चालू होतं. काही काम नव्हतं. आम्हाला वाटलं होतं आमची तेजाबची माधूरी दिक्षीत होईल, एका रात्रीत स्टार ! आम्हाला वाट्लं होतं तसं झालं नाही.

पण बाप्पचा अशिर्वाद होता. दोन वर्षात आम्ही केलेल्या कामाची माउथ टू माउथ पब्लिसिटी झाली. कुणी गणपतीत १०० सिडीज वाटल्या, कुणी कुणाला गिफ्ट दिल्या, एकाला आवडलं दुसर्‍याला सांगितलं. आणि यश कणाकणानं दबक्या पावलांनी आलं. आमच्या यशाचं श्रेय विश्वविनायकलाच. विश्वविनायकनेच आमची खरी ओळख निर्माण केली.


संपदा : शंकर महादेवन, एस. पी. बालसुब्रमण्यम ह्या सारख्या दिग्गजांबरोबर काम करतानाचा अनुभव कसा होता ? पहिलाच अम्बम असल्यानं काही दडपण होतं का ?

दडपण तर होतं. ही दोन्हीही माणसं प्रचंड अभ्यासू आहेत. दोन्ही दिग्गजांनी आमची मेहनत बघितली. आमची कामविषयीची कळकळ पाहिली आणि त्यांनीही स्वत:ला झोकून दिलं. एकुणच अनुभव फार छान होता. आम्ही चांगले मित्र बनलो. शंकर स्वतः एक संगीतकार असून देखिल आमचे ट्युनिंग उत्तम जमते.

संपदा : संगीत क्षेत्रातच काम किंवा संगीतातच करियर करावं असं कधी वाटलं ?

अगदी लहानपणापासून ! शाळेत असल्यापासून आम्ही स्वतःकडे संगीतकार म्हणून पाहतोय. म्हणजे करियर करायचं होतं असं नाही पण आपण संगीत द्यायचं हे लहानपणीच ठरलं होतं.

अजय : अगदी दोघांनी नाव कसं ठेवायचं हे सुद्दा ठरलं होतं.

अतुल : माझ्या शाळेच्या वहीची मागची कित्येक पानं ऑटोग्राफ कसा द्यायचा त्याच्या प्रॅक्टीस ने भरलेली. अजूनही ती वही आहे माझ्याकडे.

संपदा : तुम्ही जेव्हा संगीतात करियर करायचं, असं घरी सांगितलं तेव्हा घरच्यांची प्रतिक्रिया काय होती ? की हे सहज होत गेलं ?

आई बाबांची प्रतिक्रिया चांगली होती. वडीलांचं आधिपासूनच मत होतं, जे काही कराल ते मनापासून करा. पैसा कमावण्यासाठी करू नका. नाहीच जमलं तर दोन सुखाचे घास खाण्याइतकी आपली परिस्थीती नक्कीच आहे. ह्या क्षेत्राबद्दल त्यांना काही माहित नसतानाही त्यांनी आम्हाला कधी विरोध केला नाही. त्यांचा आधार होताच.

आधी सांगितल्याप्रमाणे संगीतकार व्ह्यायचं हे लहानपणापसूनचं ध्येय. पण मग शाळा कॉलेज संपल्यावर इतर लोकांसारखं नोकरी शोधा कंप्युटर शिका असे उद्योग करत करत आम्ही पुण्याच्या काही लोकल गृप्स सोबत गाण्याच्या व लोककलेच्या कार्यक्रमात वादक, गायक, नर्तक म्हणून भाग घेत असू. काही ना काही अ‍ॅक्टीव्हीटीज सुरू होत्या. पण बोलणारे बोलतही होते.. काय तुमची मुलं काय करणार आहेत पुढे वगैरे...पण आपले रक्त आहे ते कधीच वाया जाणार नाही ह्याची आई बाबाना खात्रीच होती.

नंतर पुण्यात काही छोटे मोठे कार्यक्रम, अ‍ॅडव्हरटाइज ची जिंगल्स, मग धार्मिक अल्बम्स असं करत करत कामाला सुरवात झाली.

संपदा : संगीताचं शास्त्रीय शिक्षण घेतलंय का ? तुमचे गुरु कोण ?

नाही शिक्षण असं काही घेतलेलं नाहिये. प्रत्येक गोष्ट स्वतःहून शिकत गेलो. खास गुरू असं कोणीही नाही.

संपदा : शास्त्रीय रागदारीवर आधारित अशीही गाणी बसवलीत का?

आम्ही काही शास्त्रिय शिक्षण घेतले नसल्याने रागावर आधारीत तशी गाणी बसवली नाही. खरं सांगायचं तर गाणं आमच्या मनामध्ये वाजतं. त्या गाण्याच्या वातावरणाशी जे भिडतं तसं ते गाणं बनतं. आता आता तरी आमच्या स्वतःच्या अभ्यासाने आम्हाला थोडं फार समजतंय. पण विश्वविनायकच्या वेळी तर लोकांनी सांगितलं की अरे हे तुम्ही तिन रागांचं मिश्रण केलं आहे. मग चालत नाही का तसं ? चालतं ना. जे श्रवणीय वाटलं, हृदयाला भिडलं ते केलं. त्यामुळे झालं असं की एका सुरावटीतून दुसर्‍या सुरावटीत असा त्या गाण्याचा प्रवास झाला. आणि एक समजलं, काहीच माहिती नसण्यामुळे आम्ही आज हे वेगळे प्रयोग करू शकलो. नाहितर आम्ही थिरोटीकली कुठेतरी बांधले गेलो असतो. अरे हे असं चालत नाही ह्यात कसा कोमल सूर लावायचा ? पण जे कानाला चांगलं वाटतं ते संगीत. जे काळजाला भिडतं आणी आत्म्याला अंतरमूख करतं तेच खरं संगीत.

संपदा : एखादी चाल डोक्यात घुमत असेल आणि पूर्णत्वास जात नसेल, तर त्रास होतो का?

हो असं होतं ना. होतं असं कधी कधी. प्रसव वेदनाच त्या. त्यांचा त्रास हा होणारच. पण त्या नंतरच्या आनंदाची अनुभूती दिव्य असते ना ? तसंच आहे ते.

संपदा : नविन रचना कशी सुचते ? प्रत्येक वेळी दोघे एकत्रच काम करता की वेगवेगळे सुचलेले असते ?

गाणं हृदयातून येतं... दोघे एकत्रच काम करतो. आम्ही दोघांनी नुसतं एकमेकांकडे बघितलं तरी समजतं की मला काय म्हणायचंय किंवा अजय ला काय म्हणायचंय. कधीतरी वेगळं सुचतंही. पण मग त्यात इगो नसतो. दोघांपैकी जे चांगलं ते आम्ही ठरवतो आणि घेतो.

संपदा : मोठा भाउ म्हणून कधी तु अजय वर दादागिरी करतोस का ?
किंवा अजय लहान भाउ आहे म्हणून तो कधी तुझ्याकडे हट्ट करतो का ?


अतुल : हो असं होतं ना कधी कधी. मी मोठा बनून आलोय आणि मला लहानपणापासून त्याची सवय झालिये. त्यामुळे कुणाला शब्द देताना बोलताना मी त्याला सांगतो की नाही हे असं नाही बोलायचं. आई बाबा नसताना... मी मोठा असल्याने मीच जबाबदार असतो. मग मला तसं वागावं लागतं.

पण म्युझीक बाबतित लहानमोठा असं काही नाही. तिथे आम्ही मिळून काम करतो. मग अजय ने हट्ट केला तरी तो लहान भावाचा हट्ट नसतो तर तो एका क्रिएटर चा हट्ट असतो.

संपदा : अतुल च्या दृष्टीकोनातून अजय ? अजय च्या दृष्टीकोनातून अतुल ? अजय अतुल म्हणजे काय ?

आम्हा दोघांना वेगळं काढता येणारच नाही. बेसिकली लहानपणापासून आम्ही एकत्र वाढलोय. नेहमीच सगळ्या गोष्टी एकत्र केल्या आहेत. मला जे येतं ते मी करतो. आणि त्याला जे येतं ते तो करतो. म्हणून आम्ही दोघे मिळून पूर्णत्वास जातो.


संपदा : तुमच्या संगीतातून लोकसंगीताचा प्रभाव जाणवतो तो कशामुळे ?

लोकसंगीत म्हणजे तिथल्या मातीची ओळख असते. लोकसंगीतच आपल्याला समजतं आणि मनाला भिडतं ! त्यामुळे तो बाज आहे. लोकसंगीताचा प्रभाव जाणवतो कारण ते आपल्या रक्तातच खेळलं आहे. हे लोकसंगीत, ही आपली ओळख आम्हाला जगाच्या कानाकोपर्‍यात न्यायची आहे.


संपदा : संगीताचा वारसा तुम्हाला कुणाकडून लाभला आहे ?

नाही. संगीताचा किंवा गाण्याचा तसा काही वारसा लाभला नाही. पण आमच्या आईला गाणी ऐकायला आवडायची आणि वडिलांना बुलबुल सारखी वाद्ये वाजवायला आवडत. त्यापलिकडे काहीच नाही.


संपदा : आयुष्यातला सर्वात संस्मरणीय परफॉर्मन्स कोणता होता ?

झी-मराठीसाठी केलेलं अजय-अतुल लाईव्ह. फार स्वप्न होतं आमचं की आमची अशी एक लाईव्ह कॉन्सर्ट व्हावी. ती ज्याप्रकारे झाली तशीच होण्यासाठी आम्ही बरीच वाट पाहिली होती.


संपदा : तुमच्या यशाचं श्रेय कुणाला द्याल ?

सारं श्रेय गणपती बाप्पाला. आणि हो देवानंतर अर्थातच आमच्या आई-बाबांना. त्यांचा आमच्यावर अतोनात विश्वास होता आणि आहे.

संपदा : आम्हाला तुमच्या बालपणाबद्दल सांगाल का? शालेय शिक्षण् कुठे झालं?

वडीलांची सरकारी नोकरी असल्याकरणाने गावोगावी बदली होत असे. लहानपणी आम्ही शिरूर ला होतो, मग नववी दहावीच्या वर्षी राजगुरूनगरला(खेड) होतो. मग पुण्यात आलो.


संपदा : तुमच्या आवडीनिवडींबद्दल ... संगीता व्यतिरिक्त इतर छंद कोणते आहेत ? त्यासाठी वेळ मिळतो का ?

अतुल : पुस्तकं वाचायला आवडतात, प्रवासात मला पुस्तकांची उत्तम साथ असते. जुने चित्रपट पहायलाही खूप आवडते. मला लहानपणापासून विमानांचं खूप आकर्षण आहे. हे आकर्षण मी कंप्युटर च्या माध्यमातून जपलं आहे. फ्लाईट सिमिलेटर सारखे गेम्स खेळायला मला खूप आवडतात.

अजय : मला म्युझीक शिवाय तसं फारसं विशेष काही आवडत नाही. गाडी चालवता येत नाही त्यामुळे मी तसा बांधलेलाच आहे. वेळ मिळेल तसं वाचन करतो. वॉरीयर्स चे गेम्स खेळतो कधी कधी. मला खाण्याची विशेष आवड आहे. वेगवेगळ्या ठिकाणचं चटक मटक ट्राय करायला खूप आवडतं.

संपदा : तुमचे आवडते संगीतकार ?

इलाई राजा, लक्ष्मीकांत प्यारेलाल, मदन मोहन, शंकर जयकिशन, सलील चौधरी, पंचम दा, बप्पी लाहिरी, राम कदम, विश्वनाथ मोरे, राम लक्ष्मण, श्रीनिवास खळे, दत्ता डावजेकर आणि ईंग्लिश मध्ये सॅम्युअल बार्बर, जॉन विल्यम्स, बिथॉन, मोझार्ट, जेरी गोल्ड्स्मिथ.

संपदा : ज्यांच्या सोबत काम करावेसे वाटते पण राहून गेले ते गायक गायिका ?

किशोर कुमार सोबत काम करायचे होते. पण आम्हाला फारच उशिर झाला.
लता दिदींसोबत एक संधी आली होती. पण समहाउ नाही जमून आलं ते.

संपदा : तुमच्या कुटूंबाविषयी थोडं सांगा ?

आम्ही सारे जणू एका धाग्याने बांधले गेलो आहोत. दिसताना जरी अजय अतुल असे दिसत असले तरी आमच्या प्रत्येक कामात घरातल्या सगळ्यांचा सहभाग असतो अगदी आमच्या छोट्या पिल्लांचाही.

संपदा : न आवडलेली.. एखादी गोष्ट अजून चांगली देउ शकलो असतो असं कधी वाटलंय का ?

अतुल : शक्यतो कधी असं झालं नाहिये. त्याचं कारण म्हणजे दोघांचाही स्वतःवर पूर्ण विश्वास आहे. आपण जे सर्वोत्कृष्ठ तेच लोकांना देउ. अन्लेस् अ‍ॅन्ड अन्टील वी आर सॅटीस्फाईड,

अजय : हं ..कालांतराने असं वाटेलही कदाचीत..अरे आपण हे तेव्हा असं केलं असतं तर अजून छान झालं असतं. पण आता असं काही कधी वाटलं नाही. ओव्हर अ पिरीयड ऑफ टाईम मे बी असं होइल कदाचित की अमूक एका इन्स्ट्रउमेंट पेक्षा वेगळं काही उपलब्ध असेल आणि त्या पेक्षा ते जास्त सरस ठरेल.

संपदा : संगीतकार झाला नसता तर ? पुढल्या जन्मी कोण व्हायला आवडेल ?

अतुल : संगीतकारच झालो असतो. पुढच्या जन्मीचा मी विचार नाही केला.

अजय : ह्या जन्मी मी जो आहे तोच झालो असतो. म्युझीक शिवाय दुसरा काही विचारच मी कधी केला नाही. पण पुढच्या जन्मीचे म्हणाशिल तर एक रितसर संगीतकलेचे धडे घेतलेला संगीतकार बनायला मला जास्त आवडेल.

संपदा : तुमची काम करण्याची काही खास वेळ आहे का ? काही जणांना रात्री किंवा पहाटे काम करायला आवडतं ..

आम्हा दोघांचीही अशी काही वेळ नक्की नाहिये. संगीत सततच आमच्या बरोबर असतं. कधी एखादं गाणं गाडी चालवतानाही सुचतं. उर्मीच ती केव्हाही येते.

संपदा : इतर भाषांमध्ये काम करतानाचे काही अनुभव सांगाल का ? गाणं बांधलं जातं चाल बसते.. पण त्या शब्दांत भाव खरंच उतरले आहेत हे कसं समजतं?

एखादं गाणं करायचं म्हणजे त्या गाण्याची सिच्युएशन कोणती आहे त्याला साजेश्या भावना आमच्या संगीतातून उतरवायचा प्रयत्न आम्ही करतो. बेसिकली संगिताला भाषा अशी नसतेच. ते ऐकून काळजाला हात घातला जातोच जातो मग ती कुठलीही भाषा असूदे तमिळ तेलुगु हिंदी मराठी नाहीतर इंग्लिश.

संपदा : तेलुगु गाणं करताना काही प्रॉब्लेम होते का ?

अजय : तेलुगु मध्ये काम करताना तशी काही अडचण आली नाही. राजा सरांचे थोडेफार संस्कार होते आमच्यावर. आणि साउथ च्या लोकांची साधारण आवड पक्की माहित होती. त्यामुळे कदाचीत राम गोपाल वर्मांना आम्ही ते करावं असं वाटलं.

लिरिकली म्हणशिल ९५ टक्के कंपोसिशन आम्ही आधी केलेली होती. जेव्हा ती चाल म्हणून एकदा आमच्याकडून अप्रूव्ह झाली मगच त्यावर शब्द लिहून घेतले गेले. त्यांनी आम्हाला तो फ्रीडम दिला होता. नाहीतर आधी लिरिक्स लिहून साउथ चं प्रोजेक्ट शक्य नव्हतं.

संपदा : इलाईराजाबद्दल काय सांगाल ?

अजय : इलाईराजा म्हणजे आमच्यासाठी द्रोणाचार्य आहेत. एस. पी. बालसुब्रमण्यम मुळे त्यांची भेट घडली. आपल्या दैवता समोर बसून त्यांच्याशी आपल्याला बोलता यावं याहून अधिक काय ना? तो आयुष्यातला एक अविस्मरणीय क्षण आहे. कधीही न विसरता येण्यासारखा.

इलाईराजा ही व्यक्ती म्हणजे एक चमत्कार आहे. संगीत म्हणजे फक्त नृत्य करायला लावणारं असं नाही तर ती अशी एक दैवी देणगी आहे की ती आपल्या मनाला डोलवायला लावते. हे समजलं ते इलाईराजा मुळे. संगीताकडे बघण्याचा अंतर्बाह्य दृष्टीकोन बदलला तो त्यांच्याचमुळे.

संपदा : शाळा/ कॉलेजमधले काही गमतीशीर किस्से सर्वांसोबत शेअर कराल ?

अतुल : मी स्वत:च्या अभ्यासाबद्द्ल कधीच विचार केला नाही. मला नेहमी वाटायचे भूगोलात खारे वारे मतलई वारे शिकून काय करायचय ? तसंच गणित म्हणजे माझा त्याचा छत्तिसाचा आकडा. मग काय दहावीच्या प्रिलीम ला गणिताच्या पेपरमध्ये चित्र काढली होती. जाम ओरडा खाल्ला होता आईचा.

अजय : मी शाळेच्या घोष पथकात ड्रम वाजवत असे. एकदा स्पर्धा होत्या मी काहीतरी वेगळं करण्याच्या विचारात भलतीच काहीतरी मनाची रचना वाजवली. परिक्षकांना माझी ती रचना आणि माझा आत्मविश्वास खूप आवडला असावा. कारण मला पहिलं बक्षिस मिळालं होतं.

अजून एक किस्सा सांगतो.

मी राजगुरुनगर ला शाळेत असताना आम्ही चार पाच जण माईकवरून सकाळी साडेसातची प्रार्थना म्हणायचो. आणि मला बरेचदा शाळेत यायला उशीर व्हायचा. माझ्या घरापासून शाळेपर्यंत् जाताना अजुन एक शाळा होती. आणि नेमकं मी तिथून जात असताना त्या शाळेत राष्ट्रगीत सुरू होत असे. मग अगदी सावधान मध्ये उभं राहणं आपलं आद्य कर्तव्य, आणि त्यातुनही मी एन. सी. सी. कॅडेट, राष्ट्रगीताचा मान राखायलाच हवा ना ?

मला दोन चार वेळा असं शाळेबाहेर राष्ट्रगीतासाठी उभं बघून एकदा त्या शाळेच्या शिक्षकांनी आत बोलावून माझं अगदी कौतूक केलं. पण नंतर तिथून मी माझ्या शाळेत पोहोचेपर्यंत चार पाच मिनिटे लागली आणि शाळेत जाउन अंगठे धरायची शिक्षा मिळाली. मग दुसर्‍या शाळेत झालेले कौतूक काय आणि कसे सांगणार सरांना ? गपचूप शिक्षेला उभा राहिलो.


संपदा : इतरांना संगीत शिकवता का ? शिकवायला आवडेल का ?

नाही. शिकवत नाही. कारण आम्ही कुठे काही शिकलो नाहिये.

आता शिकण्या शिकवण्याचा विषय निघालाच आहे तर आम्हाला काय वाटतं, की हल्ली पालकांना काय वाटतं आपण आपल्या मुलांना गाण्याच्या- तबला-हार्मोनियम च्या क्लास ला घातलं म्हणजे झालं. पण ते सोडूनही संगीत आहेच की. बाकिची इतकी सुंदर सुंदर वाद्ये आहेत. ति काय फक्त बँडवाल्यांचीच का? शक्य असतिल ती सगळी वाद्ये द्या ना मुलांना. खेळू द्या त्यांना.. त्याच्यातूनच त्यांच्या अवती भवती संगीत खर्‍या अर्थाने निर्माण होइल.

सध्या आम्ही शिकवत नाही आहोत. पण आमचा त्या दॄष्टीने प्रयत्न चालू आहे आणि लवकरच त्या संदर्भात काहितरी नविन घेउन आम्ही लोकांसमोर येउ.


संपदा : ह्या क्षेत्रात नव्याने येणार्‍यांना तुम्ही काय मार्गदर्शन कराल ?

खूपदा गायक विशिष्ठ एका गायन शैलीत अडकून रहातात, संगीतकारही कित्येकदा एकाच प्रकारच्या चाली किंवा संगीतात काम करत रहातात. गायकाने किंवा संगीतकाराने गाण्यातल्या सर्व भावना, भाव समजावून गाणं गायलं पाहिजे किंवा संगीत दिलं पाहिजे. गाण्याच्या इमोशन्स प्रमाणे बाज वापरला गेला पाहिजे. तरच तुम्ही हरहुन्नरी बनाल.

संगीत हे इन्स्टॉल्मेन्ट मध्ये शिकता येत नाही, पार्ट टाईम तुम्ही म्युझिक करु शकत नाही. किंवा तुम्ही संगीतात एखादी डीग्री घेउन तुम्हाला संगीत सर्वसाध्य, सहजशक्य होईलच असे नाही.

जो पर्यन्त गाणं किंवा संगीत तुमच्या हृदयातून येत नाही, तुमच्या स्वतःच्या मनाला भिडत नाही, तो पर्यंत ऐकणार्‍याचा अंगावर शहारे आणि डोळ्यात पाणी आणणार्‍या रचना तुम्ही देउच शकणार नाही.

संपदा : फ्युचर प्लान्स ? अजय्-अतुल हे नाव भविष्यात कुठे असावं असं वाटतं ?

अतुल : फ्युचर प्लान्स बद्दल भरपूर गोष्टी आहेत पण त्या बद्दल सध्या काही बोलणार नाही. तुमचं कामच सगळं बोलतं. हजार गोष्टी करण्यापेक्षा मोजक्याच गोष्टी करू की त्या त्या क्षेत्रातल्या माईलस्टोन ठराव्यात. पाचशे चित्रपटांना संगीत देउन लोकांनी त्यातले फक्त पन्नासच लक्षात ठेवावे त्या पेक्षा भले आम्ही पन्नास चित्रपट करू. पण त्यातला प्रत्येक चित्रपट लोकांना संस्मरणीय असेल. प्रवाहापेक्षा वेगळं काहीतरी करून एखाद्या गोष्टीचा 'ट्रेंड' हा आमच्या पासून सुरु व्हावा.

अजय : त्याच्याकडे आमच्यासाठी प्लान आहे. 'गॉड हॅज अ प्लान फॉर अस !' वी आर जस्ट फॉलॉविंग दॅट प्लान. जास्त काही सांगत नाही. पण विश्वविनायक-२ करायचा विचार आहे.


संपदा : मायबोलीकरांना तुम्ही काय सांगाल ?

जगभरात विखुरलेल्या मायबोलीकरांचे योगदान खरंच वाखाणण्याजोगे आहे. इंटरनेट्चा इतका प्रभावी पणे वापर करून ऑनलाईन गणेशोत्सव, दिवाळी ह्यासारखे सण साजरे करुन आपल्या संस्कृतीचे जतन करित आहात. मायभूमीपासून हजारो मैल दूरवर राहूनही आपल्या पुढ्च्या पिढीला समृद्ध करीत आहात. देशाविदेशातल्या देशबांधवांना एकत्र आणण्याचे मायबोलीकरांचे हे काम अव्याहत पणे असेच चालू रहावे हिच सदिच्छा. तसेच आम्हा दोघांतर्फे सर्व मायबोलीकरांना दिवाळीच्या शुभेच्छा !

5 comments:

  1. या संगीतकारांची ओळख करुन दिल्याबद्दल धन्यवाद. मायेच्या हळव्या. अगदी सुंदर गाणं आहे. पुढच्या जन्मी काय होणार वगैरे प्रश्न अनावश्यक वाटतात.

    ReplyDelete
  2. छान झालीये मुलाखत....अजय अतूलची गाणी नेहेमीच आवडतात...मराठी संगितात एक नवा प्रघात या दोघांनी पाडला आहे जो विशेष उल्लेखनीय आहे...

    ReplyDelete
  3. धन्यवाद. . . मराठी संगीताच विश्व या दोघांमुळे समृद्ध झालय!!!!मुलाखत छान आहे!!!

    ReplyDelete
  4. agadi typical prashna hote mulakhatiche...pan tarihi Ajay-Atul baddal barich navin mahiti milali.

    ReplyDelete
  5. नमस्कार !
    मी पहिल्यांदाच तुमच्या Blog वर आलो आज.हा अजय-अतुल वरचा हा लेख वाचून खुष झालो.इतरही लिखाण आवडलं.चारोळीपण सुंदर,स्वप्नील अन् वेगळ्या घाटाच्या वाटल्या.फार छान लिहता तुम्ही. ’चांदणभूल ’ हे नावही एकंदर लिखाणाला समर्पक वाटलं.
    अशाच लिहत्या रहा. शुभेच्छा.
    -गौरव

    ReplyDelete