10/28/2011

चवडे

चवडे ... वेगळंच नाव आहे ना मंडळी.. अहो पण हे चवडे म्हणजे आपल्या चिरोटे आणि खाज्यांचे भाउबंद.. भरकन काहीतरी गोड आणि वेगळा पदार्थ बनवायचा असेल तर हे खुसखुशीत चवडे नक्कीच करून बघा.
 
लागणारा वेळ: 
१ तास 
 
लागणारे जिन्नस: 
 
२ वाट्या मैदा,
२ चमचे बारिक रवा,
४ चमचे कडकडीत तेलाचे मोहन
चिमुट्भर मिठ
अर्धी वाटी पिठीसाखर
अर्धी वाटी डाळं(फुटाणा डाळ्/पंढरपुरी डाळं) पिठ करुन.
चवीप्रमाणे आवडी नुसार जायफळ वेलची इत्यादी पूड
तळण्यासाठी तुप किंवा तेल
 
क्रमवार पाककृती: 
 
२ वाट्या मैदा, २ चमचे बारिक रवा, चविपुरते चिमुट्भर मिठ आणि चमचाभर पिठीसाखर व्यवस्थित एकत्र करुन घ्यावे.
चार चमचे तेल कडकडित गरम करुन हे मोहन मैद्यात घालून जरुरीप्रमाणे थंड पाणी घालून घट्टसर पिठ मळावे. करंज्यांसाठी करतो तसा घट्ट गोळा करून तासभर झाकून ठेवावे.
वाटीभर डाळं मिक्सर मध्ये बारिक करून पिठीसाखरे सारखे बारिक पिठ करावे.
मग पिठी साखर आणि हे डाळ्यांचं पिठ एकत्र करून घ्यावे. त्यात चवीप्रमाणे आवडी नुसार जायफळ वेलची इत्यादी पूड मिसळावी.
तळणासाठी तेल किंवा तुप तापत ठेवावे.
मग मैद्याच्या पिठाचे पेढ्या एवढ्या आकाराचे एकसारखे गोळे करुन घ्यावे.
**फुलक्या एवढी किंवा जरा लहान एक पातळ पुरी लाटावी, मिडीयम हाय वर तळून ताटात काढावी, लगेच त्यावर चिमटीने साखर आणि डाळ्यांची पिठी भुरभुरावी, चमचा आणि झार्‍याच्या सहाय्याने पटकन अर्धी घडी करावी, पुन्हा साखर पिठी भुरभुरून पुन्हा पटकन घडी करावी. (आपण पोळी ज्याप्रकारे घडी करतो तश्या ह्या दोन घड्या कराव्यात).**
पुन्हा दुसरी पुरी... सगळी प्रोसेस पुन्हा .. असं करत सगळे चवडे बनवावेत.

हे बघा हे असे दिसतील चवडे.. 


 
वाढणी/प्रमाण: 
 
खाउ तसे/ आकारानुसार लहान मोठे बनवू तसे. :)
 
अधिक टिपा: 
 
** हे काम अत्यंत पटापट करायचे आहे.
पुरी ताटात काढली की गॅसची आच कमी करणे.
पुरीवर एका हाताने साखर + पिठी भुरभुरावी.
लगेच मग हात भाजू नये म्हणून एका हातात चमचा आणि दुसर्‍या हातात झारा घेउन पटकन फोल्ड करावी. (जरासा उशिर झाला तर पुरी मोडते.)
एकटीने करायला भरपूर मारामारी होईल.. मदतनिस असेल तर साखर पेरणी किंवा तळणी एकेकाने करता येईल.
थोडीशी तळणा नंतरची कृती किचकट आणि नाजूक असली तरी करंज्यां पेक्षा अगदी सोप्पी आहे.
ह्या चवड्यांची चव त्या साखर + डाळ्यां मुळे अप्रतिम येते.

10/25/2011

शुभ दीपावली

आपणा सर्वांना ही दिवाळी
आनंदाची, सुख-समृद्धीची, उज्ज्वल यशाची, भरभराटीची उत्तम आरोग्याची जावो ! 



हा सर्वांसाठी फराळ स्मित


10/20/2011

ध्यास . . .


मन झालंय हलकं पीस
गळ्यातच दाटला श्वास
क्षणो क्षणी श्वासा संगे
तिला आता त्याचा ध्यास !! 

7/01/2011

माती आणि गणपती

गणपती बाप्पा माझा अतिशय आवडता. गणपतीची चित्रं काढायला, गणपती बनवायलाही खूप आवडतात. सिरॅमिक पावडर किंवा चॉक पावडर वापरून ह्या आधी मी बरेचदा गणपती बनवले. पण ते कश्यावर ना कश्यावर चिकटवावे लागायचे. मग त्याला पर्याय म्हणून एम सिल वापरून पाहिले. पण टेराकोटा किंवा मातिच्या वस्तू किंवा मूर्ती बनवून त्या भाजून बघायच्या हि उत्सुकता खूप वर्षांपासून होती. पण योग येत नव्ह्ता. माती कुठून मिळवायची ? कसं काय करायचं ? किती दिवस लागतात मातिच्या मूर्ती सुकायला? भाजायच्या कश्या ? कुठे ? एक ना अनेक प्रश्न होते मनात. शेवटी एक्दाचा योग आला. आणि मला माती मिळाली.

मातिच्या बर्‍याच वस्तू बनवता येतात. बाप्पा आवडिचे म्हणून मग सुरवात त्यानेच केली. काही छोटे छोटे गणपती आणि काही वेग वेगळ्या वस्तू बनवल्या. दोन तिन इंच उंचिच्या ह्या गणपतींना पक्कं सुकायला चार दिवस लागतात. बर्‍याच लहान सहान वस्तू बनवल्या सुकवल्या आणि कित्येक महिने जिवापाड सांभाळल्या. पण आता त्या भाजायच्या कश्या आणि कुठे? त्यात काही महिने गेले. त्यावर एकदा आमचे अहो म्हणाले मी भाजून देतो उद्या होळी पेटवणार आहेत तशीच आपण गवताची भट्टी करू.

पण मग शेवटी गंगेत घोडं न्हालं. एका ड्रॉईंग शिकवणार्‍या सरांच्या ओळखीत छोटीशी भट्टी होती. त्यांनी मला माझ्या ह्या वस्तू भाजून आणून दिल्या.

अतिशचय आनंदाने हावरटासारख्या एका दिवसात रंगवून टाकल्या. बरेच दिवस कसलेच काही पेंटींग न केल्यामुळे खुपसे रंग सुकले होते. मग जे होते त्यातच काम भागवून टाकले. :) अजून चांगले करता आले असते. किंवा नसते केले तरी छानच दिसत होते.

आराम गणेश


रंगवण्याआधिचे


नंतरचे


गणेश वाद्यवृंद


रंगवून





पिंपळपान




हत्ती उंट घोडा :)


घोडोबा :)


मास्क


आणि थोडे गणपती

आशीर्वाद देणारा


आणखी दोन


अजून दोन








Same post in English is here : 'Clay'kaari My Terracotta work

4/15/2011

प्रश्नासुर



मुलं बोलायला लागली एक दिड वर्षाची झाली.. की त्यांची बड्बड..सुरू होते. आपल्या अवती भोवती पाहिलेल्या.. ऐकलेल्या गोष्टींबद्दल त्यांना कुतुहल वाटायला लागतं. आणि मग आपोआपच त्यांचे प्रश्न सुरु होतात. आपण आपल्या परीने... ह्या छोट्या दोन पाच वर्षाच्या बाळांना उत्तरे देतोही. काही वेळा त्यांना ती पटतात तर काही वेळा.. आपल्या उत्तरांमधून नवे प्रश्ण निर्माण होतात. मुलांना खरंही सांगितलं पाहिजे..आणि त्याना पट्लंही पाहिजे.. मग असे करताना अनेकदा गमती होतात्...तर काही वेळा मुलं आपल्याला प्रश्न विचारून भंडावून सोडतात. अश्याच काही गमती जमती माझ्या चिमुरड्या प्रश्नासुराच्या.

पिल्लू : आई गणपती बाप्पा शर्ट का घालत नाहीत ?
मी : ते अंगावर शेला घेतात म्हणून. स्मित

पिल्लू : मग आई बाप्पा चप्पल का नाही घालत ?
मी : बाप्पा सिंहासनावर बसलेले असतात ना म्हणून.
पिल्लू : अगं मग आपण नाही का मंदिराबाहेर ओळीत चप्पल काढुन ठेवतो तशी बाप्पांनी पण चप्पल बाहेर काढून बसायचं ना ......

पिल्लू : ए आई बॉईज च्या पोटात का बेबी नसतं ? फक्त गल्स का बेबी आणतात ?
मी:- कारण बेबी ग्रो होण्यासाठी गल्सच्या पोटात एक बॅग असते. तशी बॉइज नसते म्हणून.  अ ओ, आता काय करायचं
पिल्लू : मग कांगारूला असते तशीच ना मग ती आपल्याला का दिसत नाही... अरेरे
देवारे......

आता काय बोलणार ?

एकदा मला विचारलं .. सगळ्या आज्यांना आजोबा आहेत मग माँ आज्जीचे आजोबा कुठेयत ?
मी सांगितलं ते देवाघरी गेले आहेत.
कुठे असतं देवाघर ?
उंच आकाशात...

काही महिने होउन गेले. मध्ये दोन तीन दा आम्ही प्लेन ने कुठे कुठे जाउन आलो होतो.

तर हा पठ्ठ्या मला एकदा म्हणतो तु खोटं सांगतेस.. देवाघर नसतच...मी बघितलं आकाशात मला कुठेच देवाघर दिसलं नाही. अ ओ, आता काय करायचं वय वर्षे तिन होतं फक्त.

आई मन म्हणजे काय ग ?

स्पोर्ट्स कोण बनवतं ?

जगात माणसं का असतात ?

असे एक ना अनेक प्रश्न ...

तुमच्याकडेही असतिल ना असे छोटेसे प्रश्नासुर ? आणि त्यांचे खूपसे प्रश्न ? काय अन कशी उत्तरे द्यायची....