Showing posts with label शंकर. Show all posts
Showing posts with label शंकर. Show all posts

10/06/2009

लंकेची पार्वती

सोने की लंका जलाय गयो रे, एक छोटोसो वानर....
रावण को पानी पिलाय गयो रे, एक छोटो सो वानर...
ढुडुम ढुम टू ढुम ढुम...

मंदिरात ढोलकी.. टाळ.. टाळ्यांच्या गजरात गाणं खूपच रंगलं होतं. ते कानात इतकं बसलं होतं.. आणि त्या सोबतच सोनेकी लंका सोनेकी लंका हे शब्दही एकसारखे मनात येत होते आणि प्रश्णही तेवढेच पडत होते.

रामायणातले लंकादहन आपल्या सगळ्यांनाच माहीत आहे. हनुमानाने सोन्याची लंका जाळली.
लंका सोन्याची खरंच होती का ? होती तर सोन्याची का होती आणि कुणी बनवली होती ?
सीतेला लंकेची पार्वती का म्हणतात ?
लंकेत सोन्याच्या विटा हा वाकप्रचार का रुढ झाला असेल ?

जाउदे ना ही सारी पुराणातली वांगी - वानगी. पण पुराणात ह्या सार्‍याचा उल्लेख आहे म्हणजेच त्यामागे काही ना काही गोष्ट असली पाहिजे. प्रत्येक संदर्भासाठी काही कथा दंत कथा सांगितल्या जातात. त्यापैकीच ही सोन्याच्या लंकेची आणी पार्वतीची कहाणी.

कैलासावर रहाणार्‍या अजर अमर शिवपार्वतीची एक कहाणी आहे. बसल्या बसल्या एके दिवशी देवी पार्वतीच्या मनात आले की देवी लक्ष्मीला भेटायला तिच्याकडे जायचे. शंकर भगवान नको म्हणत असतानाही शेवटी त्यांची आज्ञा घेउन देवी पार्वती लक्ष्मी कडे गेली. खरं तर प्रभू इच्छेविरूद्ध काहिही घडणे कठीणच. पण मन वेडं असतं तेच संकल्प विकल्प घडवून आणतं जेव्हा जिथे हवं तिथे आपल्याला घेउन जातं, त्याच प्रमाणे पार्वतीचं मनही भरकटलं होतं.ती अतीशय आनंदाने देवी लक्ष्मीकडे जायला निघाली. मनात विचार करीत होती की मला अकस्मात आलेलं बघून लक्ष्मी माझं स्वागत करेल खूप आदरातिथ्य करेल. स्वतःच्या आसनावरून उठून धावत येउन मला मिठी मारेल, जबरदस्ती ने माझा हात धरून मला आसनस्थ करेल, धूप दीप नैवेद्याने मग मला सन्मानीत करेल वगैरे.

पण पार्वतीने जो विचार केला होता तसं प्रत्यक्ष झालंच नाही. घरी आलेल्या उमा पार्वतीला लक्ष्मीने साधं पाणीही विचारलं नाही. उलट अभिमानाने स्वतःचा तोरा मिरवत लक्ष्मीने पार्वतीला तिचं सारं राजभवन, धन वैभव, नोकर चाकर दाखवून खूप हिणवलं आणि म्हणाली,"ज्याला सारं जग त्रिपुरारी म्हणून ओळखतं तो तुझा भिकारी नवरा कुठे आहे ? चिता-भस्म, त्रिशूल-फावडी आणि फाटकं मृगजीन घेउन त्यानं कुठे बस्तान बसवलं आहे ?" पार्वतीने हे ऐकताच तिचा क्रोधाग्नी भडकला, ओठ थरथरले, जीभ फडफडली.. ति म्हणाली, "तू माझा सन्मान नाही केलास तरी चालेल पण माझ्या पतीचा विनाकारण अपमान मी सहन करणार नाही. माझ्या पतीला भिकारी म्हणताना तुला लाज वाटत नाही ? खरं तर तुझ्या पतीला द्युता खेरीज कधी काही कामकाज नाहिये. तोच भिकारी राजा बनून शिवाकडे गेला असेल. किंवा वामन बनून बलीकडे गेला असेल. सतत सगळीकडे आपली झोळी पसरून भिक मागत फिरत असतो. दधिची रुषींकडे तर त्याने हाडं भिक्षा म्हणून मागीतली होती. विसरलिस का? शंकर तर जगाचे तारणहार भोले भंडारी आहेत." पार्वती अश्या प्रकारे लक्ष्मीवर चिडली आणि उद्विग्न मनाने ती कैलास पर्वतावर परतली.

पार्वतीला पाहून अंतर्यामी भगवान म्हणाले, "हे देवी आज चेहरा एवढा उदास का ?" त्यावर उमा पार्वतीने लक्ष्मिने केलेल्या उपहासाचं वर्णन करून शिव शंकराला सांगितले. आणि म्हणाली, "आजपासून मी अजिबात अन्न पाणी घेणार नाही, उपाशी राहून भले माझे प्राण मला गमवावे लागले तरी बेहत्तर. तुम्हाला जर माझे प्राण प्रिय असतील तर मी सांगते तसा महाल मला बनवून द्या. महाल बनवल्यावर गृहप्रवेशासाठी लक्ष्मीला आमंत्रीत करून मला माझ्या अपमानाचा बदला घ्यायचा आहे. माझ्या अपमानाचा असा बदला घेइन की सारी दुनिया बघत राहिल." ह्यावर शंकराने पार्वतीला खूप समजावलं. म्हणाले, "मान अपमान, हे सारं आपण मानण्यावर असतं. जाउदे ते कडवट बोलणं विसरून जा. राग विसरून तुझं मन शांत कर. त्यातच खूप सुख आहे." पण देवी पार्वती ऐकायला तयारच नव्ह्ती. हट्टाने ती रडू लागली.

मग भगवान शंकरांनी विश्वकर्माला संदेश पाठवून आमंत्रित केले व सांगितले देवी उमा पार्वती दु:खी कष्टी आहे. तुम्ही तिचे दु:ख दूर करा. तिला जसा हवा तसा महाल बनवून द्या. पार्वती खुष झाली. व विश्वकर्म्याला समजावू लागली. मला समुद्राच्या मध्यभागी एक नगर वसवायचे आहे. ज्याला चार दरवाजे असतिल असा किल्ला बनवायचा आहे, जिथे थंड-गरम पाण्याचे ताल तलाव असतिल, सुंदर बाग-बगिचे, स्वच्छ रस्ते असतिल. माझ्या रंगमहालाच्या छतालाही तुम्ही सोने लावा. सगळे दरवाजे सोन्याचे बनवून मधे मधे हिरे-मोती जडवा. चमचमणार्‍या फरश्यांवर रंगीबेरंगी मिनाकारी करा. सोन्याच्या भिंती, छत आंगणही सोन्याचंच बनवा. मंच, पलंग इतकंच काय महालातली भांडी सुद्धा सोन्याचीच हवी. आज पर्यंत असा महाल कुणीच बनवला नसेल. बघितला नसेल. लक्ष्मी ने असा महाल बघितल्यावर तिने मान खाली घातली पाहिजे.

विश्वकर्म्याने सगळे समजावून घेउन आपले अनुयायी ब्रह्मलोकातून बोलावून घेतले. भवन निर्माण कलेचे सगळे सामान सोबत घेउन ते आले. एक सर्वोत्कृष्ठ वास्तूकलाकार म्हणून आदिकालापासून विश्वकर्मा प्रख्यात होता, चित्रकला, मूर्तीकला, ह्या सारख्या नानाविध कला वापरून भवन, वास्तू निर्माण करण्यात तो एकदम निपूण होता. डोळे मिटून आपल्या मनात जी कल्पना करी ती साक्षात डोळ्यांसमोर पूर्णत्वास आणी. तसाच एक चमत्कार विश्वकर्म्या ने ह्या वेळीही दाखवला. समुद्राच्या मधोमध एक अनोखा महाल- दिव्य भवन उभारून दाखवले.

शंकर पार्वती जेव्हा तिथे आले तेव्हा तो स्वर्णमहाल पाहून पार्वती अती हर्षीत झाली. म्हणाली माझं स्वप्नं साकार झालं. माझ्या कल्पनेपलिकडे सुंदर असा हा स्वर्णमहाल बनला आहे.पार्वती शंकराला म्हणाली, "हे त्रिपुरारी ह्याचा गृहप्रवेश करायला हवा. ह्या महालात मला एक यज्ञ करायचा आहे. सर्व देव देवतांसोबत मला लक्ष्मीला पण इथे बोलवायचं आहे." तिचे आनंदाश्रू पाहून भगवान विचारात पडले. जो जितका खुष होतो तेवढे त्याचे अश्रू वहातात. त्यांना पार्वतीचं मन मोडवलं नाही. ते तिच्या हो ला हो म्हणत गेले. तेहतिस कोटी देवांना निमंत्रण दिलं गेलं. विश्रवा पंडीत पुजेसाठी बोलावण्यात आले. लक्ष्मी विष्णू, ब्रह्मा इंद्र सगळे सगळे देव आले. समुद्राच्या मधे असलेला तो स्वर्णमहल बघून खूप हर्षभरीत झाले.

तेव्हा लक्ष्मीच्या हाताला धरून पार्वती तिला आपला सोन्याच्या विटांनी बनवलेला महाल दाखवू लागली. आणि म्हणाली, "बघ हा चमत्कार त्याच त्रिपुरारीचा ज्याला तू भिक्षू म्हणालीस, हा त्याच भिकार्‍याचा महाल आहे जो बघायला आज सारी दुनिया आलिये. झरोके खिडक्या दरवाजे इतकंच काय जमिनही सोन्याचीच आहे. माझ्या महालाच्या कोपर्‍याइतकीही तुझ्या महालाची आता लायकी नाहिये." शंकर म्हणाले, "पार्वती असा वृथा अभिमान करू नये". इतक्यात मंडप सजवून तयार करण्यात आला. शंकर पार्वतीने यज्ञ केला. विश्रवा ऋषी विधी विधान मंत्र पठण करीत होम आहूती पूजेच्या प्रत्येक क्रिया समजावून देत होते. पुर्णाहूती पडल्यावर सर्व देव देवतांनी फुलांचा वर्षाव केला, नभांगण शिवपार्वतीच्या जयजयकाराने दुमदुमू लागले. देव-देवता, योगी-ब्राह्मण, साधू-भिक्षू सगळ्यांची भोजने झाली. नंतर सगळ्यांना मानसन्मानाने दक्षीणा दिल्यावर सर्वांनी प्रस्थान केले.

शेवटी शिवशंकरांनी विश्रवा ऋषींना आपल्याजवळ बोलावले व म्हणाले, "आपल्या येण्याने आज आम्ही धन्य झालो. तुम्हाला जे हवं ते मागा आज आम्ही तुमच्यावर खूप प्रसन्न आहोत." त्यावर विश्रवा म्हणाले, "भगवान तुम्ही खरंच माझी झोळी भराल ? आत्ता तुम्ही जे म्हणालात ते वचन नक्की पुरे कराल ?" भगवान म्हणाले, "मनात कसलीही शंका आणू नका. माझे वचन पुर्ण होते असा त्रिलोकी डंका आहे. मी खरंच खूप प्रसन्न झालो आहे. आता तुम्ही मागा तुम्हाला काय हवे ते वरदान देईन." ह्यावर शीष झुकवून विश्रवा म्हणाले, "हे भगवन ! तुम्ही तुमचे वचन पूर्ण करा. मला हा सुवर्णसिन्धू हवा आहे. जिथे हे सुंदर भवन उभारले आहे. हाच माझ्या मनात भरला आहे." हे ऐकताक्षणी सर्व उपस्थित आश्चर्याने पाहू लागले. पार्वतीच्या मनावर जसा वज्रपात झाला. तिच्या स्वप्नांची एका क्षणात राखरांगोळी झाली. तिने विश्रवाला शाप दिला,"एक दिवस असा येईल तुझे नामोनिषाण मिटून जाईल कालौघात तुझी ही सुवर्ण नगरी राख राख होउन जाईल. तुझा दिवा विझून घनघोर रात्र होईल." आपल्याजवळ होतं नव्हतं ते सारं वैभव, दाग दागिनेही तिने विश्रवा ऋषींना दान करून टाकले. पार्वती निष्कांचन झाली.

ह्या दंतकथेचा वास्तवाशी कदाचित संदर्भ असू असेल.

हे विश्रवा ऋषी म्हणजे रावणाचे पिता. पुढे कालचक्रात रामयुगात राम वनवासात असताना रावणाने सीताहरण केले. सीतेला पळवून नेत असताना तिने रामाला मार्ग कळावा म्हणून मार्गात आपले एक एक करून सगळे अलंकार उतरवून टाकले. ती जेव्हा लंकेला पोहोचली तेव्हा तिचे स्त्रीधनही तिच्याकडे नव्हते. तीपण पार्वती सारखीच निश्कांचन झाली होती. त्यावरूनच लंकेची पार्वती हा शब्दप्रचार आला आहे. वीर हनुमानाने श्रीरामाला सीतेच्या शोधात मदत करत असताना लंकेला जाउन लंकेचे दहन केले. आणि पुढे झालेल्या युध्दात रावण हत्येसह रावणाचा निर्वंश झाला. लंकेच्या पार्वतीचा शाप खरा ठरला.

वीर हनुमानही भगवान शिवाचाच अवतार. कर्ता करविता तोच भोळा सांब.

डमरूवाले बाबा तेरी लीला है न्यारी, जय भोले जय भंडारी !
शिवशंकर महादेव त्रिलोचन कोई कहे त्रिपूरारी, जय भोले जय भंडारी !

2/19/2009

शिवखोड़ी

कित्येक दिवसांपासून एकदा वैष्णोदेवी -कश्मिर करायचं मनात होतं. गेल्या डिसेंबरला योग आला. वैष्णोदेवी कट्रा बरेच जणांना माहित आहेच आणि दर वर्षी वेगळ्या वेगळ्या ऋतुंमध्ये भाविक त्रिकूट पर्वतावर जाऊन वैष्णोदेविचे दर्शन घेतात. परंतू कट्राजवळच एक शिवखोडी नामक श्रद्धास्थान सुद्धा आहे. ह्या शिवखोडी ची महिमा अपरंपार आहे. फार कमी लोकांना ह्याबद्द्ल माहित असेल. पण जो कुणी एकदातरी ह्या शिवखोडीला जाउन दर्शन करून येतो तो फार भाग्यवान म्हणला जातो. ह्या दर्शनाचा आणि शिवखोड़ीचा जो काही एक दोन तासांचा प्रवास आहे तो माझ्या मनःपटलावर अजूनही जसाच्या तसा तरळत आहे. आता तुम्ही म्हणाल हे शिवखोड़ी आहे तरी काय ? शिव नावाचा संदर्भ तसा तुम्ही सुजाण वाचकांनी लावलाही असेल. अगदी बरोबर... शंकर बाप्पा..

अगदी अजाणत्या वयापसून शंकड बप्पा माझा खुप आवडीचा देव. का तर त्याची सगळीच मंदिरं खूप छान असतात. छान म्हणजे वेगळी..मोठ्ठी..शांत.. निर्जन स्थळी..नदी किनारी...समुद्रकिनारी..सगळ्याच शंकराच्या मंदिरात निरव शांतता आणी मन प्रसन्न करणारी काहीतरी जादूई शक्ती असते.मग ते गावातलं सिद्धेश्वर मंदीर असो.. नदीपल्याडचं केदारेश्वर असो.. की समुद्रतीरावरचं कुणकेश्वर असो..पुन्हा पुन्हा तिथे जाण्याचा मोह होतोच नक्की. प्रत्येक मंदिराची कथा निराळी आणि अद्भूत.. त्यांच्या अद्भूत विरागी स्वामी सारखी.

शिवखोड़ी ची कथाही तशीच.अशी कथा आहे की एकदा बाबा औघड़दानी आशुतोष भगवान शिवजी कैलास पर्वतावर समाधीत लीन होते. काही वेळाने जेव्हा शिवजींनी डोळे उघडले तेव्हा त्यांनी भस्मासूराला तप:श्चर्या करताना पाहिलं. त्याच्या कठिण तपस्येवर प्रसन्न होउन भगवान शंकरांनी त्या असूर श्रेष्ठाला आपल्या इच्छेनुसार वरदान मागावयास सांगितले. तेव्हा त्या असुराने शंकराला म्हटले "हे भगवन मी ज्याच्या मस्तकावर माझा हात ठेवीन तो भस्म होईल असा मला वर द्या " भगवन भोळे सांब "तथास्तू !" म्हणाले. परंतू वर मिळाल्यावर भस्मासूर सर्वशक्तीमान झाला. तिन्ही लोकाचा स्वामी बनायची त्याची इच्छा झाली.

पुढे नंतर एकदा कैलास पर्वतावर जाताना एके ठिकाणी शिव पार्वती विश्राम करित होते. तेव्हा त्या ठिकाणी भस्मासूर आला आणी त्यांच्याशी युध्द करू लागला. ज्या ठिकाणी युद्ध झाले ते स्थान म्हणजे 'रंशू' (रण+सू) नावाने विख्यात आहे. रण म्हणजे युद्ध आणि सू म्हणजे स्थान. भगवान शंकरानी आपल्या वरदानाच्या मर्यादा राखण्यासाठी तिथून जाण्याचे ठरवले. त्यांनी आपले त्रिशूळ फेकले आणि त्या पाठोपाठ पार्वतिला घेउन नंदिवर स्वार होउन ते त्रिशुळाच्या मागे मागे निघाले. ते त्रिशूळ एका पहाडात जाउन तिथे एक विशाल गुहा तयार झाली. भोलेनाथ मग देवी पार्वतिला घेउन गुहेत निघून गेले. त्यांनी आपल्या मायावी शक्तीने गुहेचे द्वार बंद करून घेतले. भस्मासूराने आत जाण्यासाठी प्रयत्न केले पण त्याला प्रवेश करता आला नाही मग आत गुहेमध्ये शंकर समाधीस्त झाले. ह्याच स्थानाला शिवखोडी म्हणतात.

शिवखोड़ी म्हणजे शिव गुंफा. इथे निसर्गाने अजब जादू केलिये ति विसरणे शक्य नाही. उधमपूर जिल्ह्यात रंशू गावाजवळ असलेल्या शिवखोड़ीला जाण्यासाठी दोन रस्ते आहेत. एक म्हणजे कट्रावरून साधारण ८० कि.मी किंवा दुसरा थेट जम्मुहून ११० कि.मी. व्हाया अखनूर. आम्ही कट्राला मुक्कामी होतो म्हणून मग वैष्णोदेवीचे दर्शन करून दुसर्‍या दिवशी सकाळी शिवखोड़ी ला गेलो. टू बाय टू च्या बसेस कट्राला सकाळ पासून उभ्या असतात. चलो शिवखोड़ी शिवखोड़ी असं ओरडत ड्राईव्हर आणी त्यांचे हेल्पर्स बस भरून भरून घेउन जातात. आम्ही गेलो तेव्हा रस्त्याचे काम सुरू होते.. आमची टू बाय टू बस त्यात असा दगड धोंड्यांचा रस्ता..पोहोचेपर्यंत हाडं खिळखिळी होणार ह्याची आम्ही मनाशी खुणगाठ पक्की केली. त्यात भरीला ड्राईव्हरने त्याच्या करमणूकीसाठी काहितरी अशक्य कर्कश्य चिरक्या आवाजात गाणी लावली. गाणी हिंदी होती ह्या पलिकडे मला काहीही समजले नाही. वळणा वळणाच्या रस्त्याने बस धावत होती. कट्रामार्गे रस्त्यात बरिचशी प्रेक्षणिय स्थळे आहेत परतिच्या प्रवासात आपण ती करू असे कंडक्टर ने सांगितले।


वाट वळणाची....जीवाला या ओढी


चिनाब नदीवरचा पूल ओलांडून आम्ही सरळ रंशू गाठलं बस थांबली.. आणि इथून पुढे तिन साडेतिन किलोमिटर पायी चालावं लागणार होतं. घोडे आणी पालखीची सोय आहे तिथे. स्थानिक लोकांच्या उपजिविकेचे साधन. छोटा श्रेयान सोबत असल्यामुळे आम्ही घोडे करायचं ठरवलं. जसजसे पुढे जाउ लागलो तसे उन तर दिसेनासे झालेच्..पण थंडीही भरपूर वाढली सुर्य असतानाही.. रस्त्याच्या उजव्या बाजूला उंचच उंच हिरव्यागार डोंगराने सारं उन अडवलं होतं.. डोंगरावरच्या त्या गर्द हिरव्या रंगाच्या छटांमधून तो उनसावलीचा खेळ जितका रम्य वाटतो तितकाच तो मला नेहमीच अगम्यही वाटतो.

त्या अति उंच डोंगरावरून पुढे वर वर जाणारी ठिपक्यांएवढी माणसं शेळ्या मेंढ्या आणी एक दोन घोडे दिसले म्हणून सोबत असलेल्या घोडेवाल्याला मी विचारलं "हे इतके वर कुठे चालले आहेत ? " आपलं डोगरी भाषेतलं गाणं माझ्या प्रश्णामुळे त्याने थांबवल आणि सांगितलं की हे भटके गुर्जर लोक आहेत.. श्रीनगर ला जेव्हा बर्फ पडतं तेव्हा तिकडची घरं सोडून हे लोक काही महिने इकडे ह्या डोंगरमाथ्यावर येउन वस्ती करतात आणी काही महिन्यांनी पुन्हा श्रीनगरला परत जातात. वर त्यांचं अख्खं गाव वसलेलं असतं.. मी ऐकून अवाक झाले. पण पुढे श्रीनगर गुलमर्ग ला १० हजार फुट उंचावर बर्फात अर्ध्यावर बुडालेली त्यांची घरं बघितली तेव्हा खात्री पटली.




वळणाच्या वाटेने पुढे निघालो.. सोबत एक नदीही आहे.. आम्ही गेलो तेव्हा पाणी फारच थोडं होतं झर्‍याईतकं .. पण दुध नुसतं..पांढरं शुभ्र. "इसे दूध गंगा कहते है " घोडेवाल्याने सांगितलं. ह्या साडेतिन किलोमिटर मध्येही काही ठिकाणी चढणीला रस्त्याचं काम सुरू होतं चढणिची वळणं म्हणजे हेयर् पिन टर्न्स.. घोड्यावरून जाताना भयानक भिती वाटत होती. पोटात गोळा येऊन कधी एकदा उतरु असं व्हायचं.

दूध गंगेचा खळाळता प्रवाह

अखेरीस उंच काही पायर्‍या दिसू लागल्या आणी घोडा थांबला. गुफा दिसली. साधारण साठ एक पायर्‍या चढून गेल्यावर गुहेला सुरुवात होते. गुफेचं प्रवेशद्वार पंधरा फुट रुंद आणी विस फुट उंच. पुढे मोठ्ठ असणारं गुहेचं मुख पाहून कल्पनाही येत नाही पुढचा अर्धा तास आपण कुठे आणी कसे जाणार आहोत ते. अनायसे लोकांच्या मुखातुन जय भोले बाबा की ! जय भोले जय भंडारी !.. असे सुरु होते.गुहेच्या डाव्या बाजूला एक बाबा भस्म विभूती लाउन धूनी लाउन बसलेले. त्याना नमस्कार केल्यावर ते भाविकांच्या कपाळाला आशिर्वादात्मक विभूती लावतात.

गुहेचे मुख्य प्रवेशद्वार

मग सुरु होतो तो अरूंद गुहेचा प्रवास. गुहेत बराच अंधार आहे. आता ठिकठिकाणी लाईट लावलेले आहेत. बरेचदा आपल्या डोक्याजवळच येतात. आपल्याकडे एखादा टॉर्च ठेवायला हवा अश्या ठिकाणी. मला प्रथमतः खुप भिती वाटली ह्या अश्या अरूंद गुहेत आपण जातो आहोत.. घुसमटलो तर काय ? लाईट गेले तर काय ? पण अश्या ठिकाणी कुठे जाउन बसले असतिल शंकर ही उत्सुकताही तितकीच होती. बरेचदा प्रबळ ईच्छाशक्तीच आपलं बळ बनते.

साधारणतः १०० मिटर दूर अंतर कधी पुर्ण झोपून तर कधी वाकून तर कधी तिरकं तारकं होउन आणि कधी पाच सात पाहिर्‍या चढून पार करत होतो. मध्येच एक बर्‍या पैकी रुंद ठिकाणी काही लोक छोटी छोटी दगडं रचून काहितरी करत होते. मी कुतुहलानं विचारलं असता असं समजलं की इथे ह्या छोट्याश्या दगडांनी जो घर बनवतो त्याला भोले बाबा खुदका बडा घर देते है सगळे बनवत होते मग आम्हीही बनवलं. मजल दर मजल करत शेवटी मंदिरात.. गुहेत पोहोचलो. निसर्गाचा चमत्कारच तो. समोरच लगेच शिवलींगाचं दर्शन घडतं. भगवान आशुतोष औघड़दानी बाबा शिव. शिव लिंगावर कामधेनू गाईची आकृती आपोआप तयार झालेली दिसते. तिच्या थनातून शिवलिंगावर सतत जलाभिषेक केल्यासारखे पाण्याचे थेंब अहोरात्र पडत असतात.

शिवलिंगाच्या डाव्या बाजूला पिंडिच्या रुपात पार्वतीचे दर्शन होते. कार्तिकेयाच्या मुर्तीच्या दोन फुट उंचावर पंचमुखी गणेश विराजमान आहेत. इथेच एक शंखाचं चिन्ह बनलेलं आहे. पुजारी सांगत होते की इथे ८४ कोटी देवता वास करतात. आता सुधारिकरणात मुख्य गुहेत ज्याला मंदीर म्हणतात त्या साधारण दहा बाय दहा च्या ठिकाणी फरश्या बसवलेल्या आहेत पण गुहेत वर बघितल्यास निसर्गाची किमया अद्भूत वाटते. गुहेच्या खडकांचे तर्‍हे तर्‍हेचे आकार नकाशे बघुन आपल्यासारख्या भाविकांना तिथे शंकर बप्पाचा शेषनाग दिसतो तर कुणाला कार्तिकेयाचा मोर. त्रिशूल शेषनाग आणी संपुर्ण दरबार तर आपल्याला पुजारीच दाखवतात गुहेची माहिती देताना. ह्याच गुहेत महाकाली महासरस्वती आणी पाच पांडवांच्या पिंडी सुद्धा आहेत. उजव्या बाजूला गौरी कुंड, गौरी गणेश, लक्ष्मी नारायण आहेत. ह्याच गुहेतला रस्ता पुढे अमरनाथ ला जातो. पण सध्या तो बंद करून ठेवला आहे असं आम्हाला सांगण्यात आलं.

दर्शन झालं सगळं डोळ्यात आणी मनात साठवून ठेवलं. आता परत कसं जायचं ? पुन्हा त्याच अवघड वाटेने ? तर नाही.. भाविकांच्या सोईसाठी दोन मिनिटात बाहेर येता येईल असा मोठा मार्ग क्रूत्रिम गुहा आता तिथे बनवलेली आहे. तिकडून आम्ही बाहेर आलो. बघतो तर काय एक गुजराथी शेठ आपल्या शेठाणीला ह्याच मार्गाने आत दर्शनाला घेउन जात होता. क्या करे साईज मेटर् करता है नी.. स्मित करीत म्हणाला.

दर्शन करून बाहेर येईपर्यंत दुपारचे चार होउन गेले होते. आज जेवण झालेच नव्हते. पुन्हा घोडयावरून खाली उतरून बाहेर आलो. तर बस फारच दूर उभी आहे असं सहप्रवाशांनी सांगितलं. मग बस कडे चालत जाता जाता वाटेत जी चार दोन दुकानं वजा हॉटेल्स दिसली तिथे चौकशी करत करत एका ठिकाणी मस्त पैकी गरमा गरम पोळी - भाजी (चपाती-सब्जी) आणि चहा घेऊन परतीच्या वाटेवर निघालो. अन्धार वाढत चालला होता आणी डिसेंबर एन्ड ची थंडी.. धुकंही.

सकाळी कंडक्टर ने सांगितल्या प्रमाणे अजुन एक दोन ठिकाणी गाडी थांबणार होती. एक मन वाटत होतं नको आता उतरायला थंडी मी म्हणत होती. पण बरेच जणांनी सांगितलं होतं नौ देवीया नक्की बघून या.कट्रापासून ५ कि. मी. वर आगार जितो नामक एक स्थान आहे. असं म्हणतात की ह्या ठिकाणी जितो बाबांना साक्षात वैष्णोदेवी ने दर्शन दिलं होतं. इथे एक बावडी -विहीर आहे. ज्या कुणा स्त्रियांची मुलं जगत नाहित त्यांनी जर पौर्णिमेला इथे स्नान करून विभूती लावली तर त्या सुखी होतात असं मानतात. म्हणून इथे पौर्णिमेला भाविकांची आणि श्रद्धाळूंची गर्दी असते. ह्या जितो बाबाचं आम्ही बसमधूनच दर्शन केलं. आणि पुढे निघालो.

आगार जितो पासून चार कि. मि. वर नौ देवियां नावाचं एक ठिकाण आहे. ह्या ९ देवी पिंडीच्या रुपात एका गुहेत स्थित आहेत. रस्त्यापासून जरा आत थोड्याश्या पायर्‍या उतरून गेलं की ही गुहा आहे. पायर्‍यांच्या उजव्या बाजूला जुळझुळ पाणी वहात होते. पायर्‍याही ओल्याच होत्या. आणी लाईनमध्ये उभं राहून थंड बर्फासारख्या पाण्यात पाय झोंबत होते. ह्या गुहेत जायला अतिशय अरुंद रस्ता आहे आणि गुहासुद्धा इतकी छोटीशी आहे की एकावेळी जेमतेम दोन तिन जण आत असू शकतिल.. अर्धवट बसू शकतिल.. उभे रहाणे तर शक्यच नाही. म्हणून गुहेबाहेरची रांग पुढे सरकायला इतका वेळ होत होता. ह्या नौ देविया च्या गुहेतही निसर्गनिर्मित तर्‍हेतर्‍हेचे आकार आहेत.. गणपती, झोपलेला मारुती, कबुतर, लक्ष्मिच्या पावलाचा ठसा आहे. आत गुरूजी बसलेले असतात आणी आपल्याला हे सगळ सांगुन म्हणतात "अपनी इच्छासे जो भी चढाना है चढाईये !" भक्तही हे सारं गुहेतलं निसर्ग निर्मित वैभव बघून खुष.

चलो चलो लेट हो गये है कंडक्टर चा आवाज आला. बसकडे निघालो. दुसर्‍या दिवशी पुढे श्रिनगर ला निघायचं होतं. रात्र आणी थंडी वाढत चालली होती आणी दिवासभराचा थकवाही. बसमध्ये केव्हा झोप लागली कळलेही नाही.


गुहेमधिल काही फोटो नेटवर सापडलेले.

गुहेमधिल शिवलिंग

गुहेत जाण्याची अवघड वाट