4/15/2013

एका तळ्यात होती बदके पिले सुरेख……

माझ्या घराजवळच्या लायब्ररी मागे एक सुंदर तळं आहे. सूर्यास्ता पुर्वी संध्याकाळी तिथे रेंगाळत तळ्यातल्या बदकांचे खेळ बघत टाईमपास करायचा मला हल्ली छंदच  लागलाय. ह्या एकाच तळ्यातल्या बदकांचे आणि त्यांच्या सुरेख पिल्लांचे वेगवेगळ्या वेळी घेतलेले हे फोटोज… फोटोवर टिचकी मारली की मोठे फोटो दिसतील :)


 हेच ते सुंदर तळं… खरच आहे की नाही छान ?





 हम दो … और हमारे….  बाराह !!!



पिल्लांची आई भोवती लगबग

आई मी काय खाऊ गं  ? ए आई ही बघ आमचे फोटो काढतेय… आई चल आपण तिकडे जाऊ या…
ए मला पण आई जवळ जायचय… अरे बाबा कुठेय ?




पुन्हा एकदा सहपरिवार

तो सर्वात मागे दिसतोय ना तो वेडा बदक्या का कुणास ठाउक ह्या परिवाराला त्रास देत होता.
ह्या पिल्लांच्या बाबा बदकाला फड्फड उडून क्वॅक क्वॅक करून टोचायचा.. की लगेच बदकी आणि एखादं धिटूकलं बाळंही उलट प्रतिकारात्मक प्रहार केल्यासारखे त्याच्या अंगावर धावायचे. मग पुन्हा आपले लगबगीने सहपरीवार दुसर्‍या किनार्‍याकडे.. इकडे तिकडे...कारंजाभोवती.... फिरत होते... टूबूडुबू.. क्वॅक क्वॅक... तासभर तेच नाटक चालले होते.




संधिप्रकाशात अजून जे सोने  ?



अंधारून आलं … चला बाळांनो पटकन घरी परतायला हवं !



 

4/08/2013

हाय हाय मिर्ची... उफ्फ उफ्फ मिर्ची ! अर्थात चिली पॉपर्स

भरल्या मिरच्या आपण नेहमीच करतो. कधी नुसतेच भाजलेले बेसन आणि मसाला मिक्स करून, कधी खोबरे तर कधी बटाट्याचे सारण भरून. ह्या चिली पॉपर्स तश्याच काही सारण भरून बनवल्या आहेत.
अलीकडेच नीरजाने ह्याची रेसिपी पोस्ट केली होती त्यात मी माझे थोडे व्हेरिअशन केलेय. 

साहित्य बघुया काय काय हवे आहे ?

साहित्य : 
लाल पिवळ्या यालापिनो किंवा कोणत्याही कमी तिखट मिर्च्या १०-१२
१ छोटा टोमेटो, एक छोटा कांदा अगदी बारिक चिरून
अर्धी वाटी तूरीचे दाणे ओले हिरवे
एक छोटा बटाटा उकडून मॅश केलेला
अर्धी वाटी पोहे, १ टेबल्स्पून धणे, आणि १ टेबल्स्पून फ्लेक्स सिड्स
आलं लसून पेस्ट १ चमचा कोथिंबिर
चवी प्रमाणे मिठ साखर आणि आमचूर पावडर लाल मिर्ची पावडर
आपल्या आवडीप्रमाणे चीझ किंवा चिझ स्लाईसेस.

क्रमवार कृती :
प्रथम यालापिनो किंवा कोणत्याही जाडसर मिरच्या स्वच्छ धुवून पुसून घाव्या.
मिरच्यांना मध्ये चीर देऊन आतल्या बिया काढून घ्याव्या.
एका बोल मध्ये पाणी घेऊन त्यात एक टीस्पून मिठ टाकून त्यात चीर दिलेल्या मिरच्या थोडा वेळ बुडवून ठेवाव्यात.
मग सारण बनवण्या साठी एका छोट्या वोक मध्ये चमचा भर ऑलिव ऑईल टाकून त्यावर धणे फ्लेक्स सिड्स आणि पोहे भाजून घ्यावे. मग कांदा जरासा गुलाबी रंगावर परतून त्यात चमचाभर आलं लसून पेस्ट घालावी आणि बारीक चिरलेला टोमाटो घालावा मग तुरीचे दाणे टाकून सगळे परतून घावे. एक चमचा लाल तिखट घालावे. मी रेशिमपत्ती वापरलेय. मस्त लाल रंग येतो आणी झणझणीत पणा सुद्धा. मग चवी प्रमाणे मिठ, चिमुठभर साखर आणि आमचूर पावडर मिसळावी. आमचूर पावडर ऐवजी लिंबु रस सुद्धा चालेल. हे मिश्रण थंड करून जरासे भरड वाटून त्यात  मॅश केलेला बटाटा मिक्स करावा. हे झाले सारण तयार.

मग मिरच्या पाण्यातून काढून निथळून घ्याव्यात. मग प्रत्येक मिरचीमध्ये आधी चीझ च्या पातळ लांब कापलेल्या स्लाईस लावून त्यावर हे सारण भरावे.







ओव्हन ३५० ला प्रिहिट करून घ्यावा. अल्युमिनिअम फ़ोइल वर ऑलिव ऑईल स्प्रे करून त्यावर मिरच्या ठेउन २० मिनिटे भाजाव्यात. ओव्हन नसेल तर तव्यावर बाजू शकता.



मिरच्या आणि ओव्हन च्या प्रकारावर भाजण्याचा वेळ अवलंबून आहे. हवा तस्सा खमंगपणा आला की दही आणि पुदिन्याच्या च्या चटणी सोबत किंवा नसेलच जर चटणी तर सॉस सोबत खाऊ शकता. मस्त स्टार्टर होते हे.


मी यालापिनो वापरल्या होत्या म्हणून भाजायला जरा जास्त वेळ लागला. एकुण जे काय बनले ते एकदम तोंपासू होते..
चिंचेच्या आंबट गोड चटणी सोबत चट्टामट्टा करुन टाकलेहाहा