2/26/2013

मालवणी कोळंबी मसाला


मालवणी कोळंबी मसाला


 लागणारा वेळ: 
३० मिनिटे
लागणारे जिन्नस:
कोलंबी /कोळंबी - २ कप किंवा साधारण २०-२५ नग डोकी आणि काळा दोर काढून स्वच्छ केलेली.
कांदे २-३ मध्यम आकाराचे बारीक चिरून
टोमॅटो २ मध्यम आकाराचे बारिक चिरून
बटाटा १ मध्यम आकाराचा फोडि करून
ओले खोबरे अर्धी वाटी (खउन) किंवा सुके खोबरे पावडर
आले लसूण पेस्ट १ टेबल्स्पून
कोकम/ आमसोलं २/३
लाल तिखट १ टेबल स्पून (आपल्या आवडीप्रमाणे कमी-जास्त)
हळद १/२ टीस्पून
गरम मसाला १ टेबल स्पून
मालवणी मसाला १ टेबल स्पून
मीठ चवीप्रमाणे
तेल

क्रमवार पाककृती: 
  • कोळंबी स्वच्छ धुवुन त्याला हळद, आलं लसूण पेस्ट, लाल तिखट आणि चविप्रमाणे मिठ लावुन बाजूला ठेउन द्यावी.
  • एका पॅन मध्ये दोन चमचे तेल टाकून त्यावर बारिक चिरलेला कांदा घालावा.
  • कांदा गुलाबीसर परतत आला की त्यावर किंचित हळद टाकून मग खोवलेले खोबरे आणि बारिक चिरलेला टोमेटो टाकून परतावे. बटाट्याच्या फोडी घालाव्यात. एक वाफ काढावी.
  • मिश्रण थोडे परतल्यावर मग गरम मसाला आणि मालवणी मसाला घालून मंद आचे वर चांगले तेल सुटे पर्यंत परतावे.
  • त्यावर मिठ मसाला लावलेली कोळंबी घालून एक वाफ काढावी. थोडाफार रस्सा हवा असल्यास कपभर पाणी घालून कोळंबी शिजवुन घ्यावी. फार ढवळू नये कोळंबी मोडण्याची शक्यता असते. पण मसाला खाली लागता कामा नये (जळता) नंतर आवडीप्रमाणे आमसुले टाकावित. बारिक चिरलेली कोथिंबीर घालावी. मालवणी कोलंबी मसाला तय्यार.

 मालवणी कोळंबी मसाला
वाढणी/प्रमाण: 
४ जणांसाठी
अधिक टिपा: 
कोळंबी पटकन शिजते. कोळंबी गोलाकार झाली शिजली समजावे. जास्त शिजवल्यावर वातड होऊ शकते.
बटाटा टाकल्याने ग्रेव्ही मस्त मिळून येते.
कोळंबी घेताना पांढऱ्या रंगाची घ्यावी. लालसर गुलाबी कोळंबी बहुतांशी वातूळ असते.

2/23/2013

पनीर फ्रॅन्की / काठी रोल्स

Same recipe is here Paneer Franky

पनीर फ्रॅन्की / काठी रोल्स

भाजी बनवण्यासाठी साहित्य
मध्यम आकाराचा कांदा आणि एक टोमॅटो
लाल पिवळी हिरवी ढोबळी मिरची
गाजर, बिन्स मध्यम आकारात चिरून
फ्रोझन हिरवे मटार, मक्याचे दाणे प्रत्येकी साधारण वाटीभर
२०० ग्रॅम पनीर क्युब्ज्स कापून
भाज्या परतण्यासाठी तेल
आलं लसूण पेस्ट
मुठभर कोथिंबिर बारिक चिरून
हळद, हिंग, लाल तिखट, धणे जिरे पूड, मीरपूड, आमचूर पावडर, साखर
मोझेरेला चिझ बारिक किसलेले
बटर (ऐच्छीक)
रोल्स करिता
टॉर्टीयाज किंवा पोळ्या तयार वापरु शकता.
(माझ्या लेकाला आवडतात म्हणून मी टॉर्टीयाज घरी बनवते )
टॉर्टीयाज बनवण्यासाठी
२ कप ऑल पर्पज फ्लार (कणीक घेउ शकता)
१ १/२ टी स्पून बेकींग पावडर
१ टी स्पून मीठ
२टी स्पून तेल (व्हेजीटेबल ऑईल/ ऑलिव्ह ऑईल किंवा कुठलेही खाद्य तेल)
३/४ कप कोमट दुध
क्रमवार पाककृती: 
भाजी बनवण्या साठी
फ्राईंग पॅन मधे दोन टेबल्स्पून तेल टाकून तेल तापल्यावर त्यात बारिक चिरलेला कांदा, चिमुट्भर हळद हिंग घालून परतावे.
मग त्यावर रंगीत ढोबळ्यांचे तुकडे टाकावेत. (असे केल्याने कांद्या सोबत ढोबळी मिर्ची चे तुकडे चांगले परतून भाजले जातात. चव छान येते. नाहीतर नुसत्याच शिजल्या जातात. )
कांदा गुलाबीसर झाल्यावर गाजर आणि फरसबी चे तुकडे टाकून त्यावर बारिक चिरलेला टोमॅटो, एक चमचा आलं लसूण पेस्ट टाकावी.
नंतर आवडी प्रमाणे कमी अधीक लाल तिखट, अंदाजाने जणे जिरे मिरी पावडर आणी चविप्रमाणे मीठ घालून मग परतून पॅनवर झाकन ठेउन भाजीला एक वाफ काढावी.
पनीर चे क्युब्ज टाकावेत. एक टि स्पून आमचूर पावडर आणि थोडीशी साखर घालून मिसळून पॅन ची आच बंद करावी. वरून मुठभर चिरलेली कोथिंबीर घालावी.
ही भाजी पटकन होते जास्त शिजवण्याची किंवा परतण्याची गरज नसते. थोडिशी क्रंची छान वाटते.

आता भाजी टॉर्टीया किंवा पोळी/ चपाती मध्ये भरून रोल्स बनवायचे.

टॉर्टीयाज बनवण्यासाठी

एका मोठ्या बोल मध्ये ऑल पर्पज फ्लार / कणीक घेउन त्यात मिठ बेकिंग पावडर, तेल टाकून चांगले मिक्स करा. मग त्यात हळूहळू लागेल तसे दुध टाकुन गोळा मळून घ्या. गोळा खूप कडक वाटत असेल तर आणखी थोडे दुध टाकुन पिठ चांगले मळून घ्या. मळलेले पिठ मउ असायला हवे. दहा मिनिटे झाकून ठेवा आणि मग हव्या त्या आकाराच्या गोल पोळ्या लाटून तव्यावर दोन्ही बाजूने भाजून घ्या. त्यावर छान गोल्डन ब्राउन ठिपके आले की मस्त भाजल्या जातात. टॉर्टीयाज लाटताना शक्यतो पातळसर लाटाव्यात. कारण त्यात घातलेल्या बेकींग पावडर मुळे त्या दुप्पट फुगुन आणखी सॉफ्ट बनतात. ह्या टॉर्टीयाज ला तेल लावायला लागत नाही.


आता रोल्स करण्यासाठी टॉर्टीया ला बटर लाउन तव्यावर ठेवले त्यावर मध्यभागी भाजी घालून वर चिझ टाकले रोल करुन हलकेच गरम केले. रोल उघडू नये म्हणून टूथपिक टोचून देउ शकता. किंवा अ‍ॅल्युमिनियम फॉईल मध्ये रॅप करून देउ शकता. सॅलड/ सेलेरी आणि आवडत्या लाल हिरव्या चटणी सोबत किंवा टोमॅटो सॉस सोबत सर्व्ह करायला तयार स्मित
वाढणी/प्रमाण: 
चार जणांसाठी पुरावेत. वरील प्रमाणात भाजी वापरून आठ रोल्स होतात.
अधिक टिपा: 
  • भाजी ला किंवा पनीर ला झणझणीत पणा हवा असेल तर एक टेबल्स्पून गरम मसाला किंवा ऑल पर्पज किचन किंग मसाला घालावा.
  • नॉनव्हेज आवडत असेल तर पनीर ऐवजी कोलंबी किंवा चिकन चे तुकडे वापरुन बनवता येईल.
  • मुंबईतली ही फ्रॅन्की कोलकात्यात ह्याच प्रकारे व्हेजी किंवा पनीर कबाब टाकून काठी रोल्स बनवतात.

2/13/2013

ट्रेजर बॉक्स

श्रेयुडीला त्याची खेळणी आवरताना मी म्हटलं.."काय हा कचरा जमवुन ठेवतोस.. उगाचच ?? "

तर तो म्हणे.."थांब टाकून देऊ नकोस! आई ....इंपॉर्टंट आहे गं ते. दॅट्स ऑल माय ट्रेजर ! "

मग सहजच नकळत मला माझा ट्रेजर बॉक्स आठवला..

वरच्या माडीत मी सुद्धा असंच काय काय गोळा करायची ना ? कसल्याश्या झाडाच्या शेंगा..वाघाच्या नख्या म्हणून... बुरकुल बुरकुलं करुन ठेवलेला सावरीचा मउशार चंदेरी कापूस... रंगीबेरंगी काचा.... वर्तमान पत्रातील आवडत्या चित्रांची कात्रणं ... तुटके असले तरी कधी काळी आवडते पेन्स.... गोट्या..... रंगिबेरंगी आणि विविध आकारांचे दगड... उन्हाळ्याच्या सुट्टीत केदारेश्वरी नदीच्या वाळवंटात जाउन तासंतास गोळा केलेले... तेच तेच एकाच प्रकारचे भारंभर शंख शिंपले... एका प्लॅस्टिकच्या पिशवीत जमवलेले पोस्टाचे स्टँप्स... आणि जिवापाड जपलेल्या.. खूप खूप जमा केलेल्या स्टिकर्स् चं कलेक्शन केलेल्या दोन वह्या....तेव्हाच्या वयात सो कॉल्ड सुविचार वगैरे लिहिलेली एल आय चा सोनेरी लोगो असलेली एक डायरी.... त्या डायरीतली दोन मोरपिसं आणि खूप सांभाळून ठेवल्यावर जाळी बनेल म्हणून जपलेले एक पिंपळपान....... आठवणींचे पिंपळपान... हृदयाच्या आकाराचं नाजुकसं... नक्षिदार...

कधीकधी मन अगदी पीसा सारखं खूप खूप हलकं होतं  आणी आयुष्याच्या हिंदोळ्यावर अलगद तरंगायला लागतं... मनाच्या आडवळणावर आठवणींचा ट्रॅफिक जॅम होतो आणि मग स्मृतींना धुमारे फुटायला लागतात आणि मन पुन्हा पुन्हा नॉस्टॅल्जिक होउन त्या ब्लॅक अ‍ॅन्ड व्हाईट फ्लॅशबॅक मध्येच अडकुन रहातं...

मला आणि माझ्या मनालाही बाहेर यायचंच नसतं मग ह्या फ्लॅशबॅक मधून... म्हणूनच मग मीही पुन्हा ट्रेजर जमा करते.. सगळ्या आठवणींना एका संदूकीत गोळा करून आणि बंद करून ठेउन देते मग मनाच्याच एका कोनाड्यात !

2/04/2013

क्रोशाचा ऑरेंज स्कार्फ़






ऑरेंज कलर माझ्या लेकाचा अत्यंत आवडता. मी नव्या आणलेल्या यार्न मध्ये तो रंग बघून लेकाची घाई सुरू झाली. आई माझ्या टिचर चा उद्या बड्डे आहे. आपण काहीतरी गिफ़्ट देउया. ऑरेंज कलरचे. अनायसे हया स्कार्फ चे डिजाईन आणि फ़ोटो टाकले होते जयूताई ने. ते फारच आवडले होते. पण मला स्वता:ला स्कार्फस  ची फारशी आवड नसल्याने राहिले होते. आता लेकाचे निमित्य होते म्हणून  मग काय फ़टाफ़ट दोन तीन तासात बनवला हा सुंदर फ़ुलांचा ऑरेंज स्कार्फ़.

ही नाजूक फ़ुलं निट बघण्यासाठी फ़ोटोंवर टिचकी मारल्यास मोठे फोटो दिसतिल.

ह्या स्कार्फ चा मुळ पॅटर्न इथे आहे. 


फारच सोप्पा प्रकार आहे आणि तुम्ही जर भरभर क्रोशे विणत असाल तर मग काय अगदी तासाभरात काम होऊन जातं. हा रंगच इतका ब्राईट की तो कुठल्याही कोम्बिनेशन वर छानच दिसतो. मी अजून जरा गुलाबी बरोबर काळ्या पार्श्वभूमीवर थोडी फ़ोटूगिरी करून घेतली.



आणि मग सुंदरसं पॅकिंग करून लेकासोबत गिफ़्ट पाठवुन दिलं. लेक आणि त्याची टिचर दोघेही खुश. इथली  थंडी आणि स्नो… जसे मोका आणि माहोल एकदम साजेसे …  ह्या गिफ़्ट ला एकदम फीट्ट होते.  लगेच उलट टपाली लेकाद्वारे टिचर बाईंनी पाठवलेलं एक कौतुकभरलं छानसं थांक्स चं कार्ड आलं  माझ्या साठी ! :)