1/28/2011

कोस्टल कर्नाटका (मँगलोर्-उडुपी)

वर्षा अखेरीला कोस्टल कर्नाटकाची सफर केली. बँगलोर-मँगलोर-उडुपी-मुरुडेश्वर करून पुढे गोकर्ण ला न जाता जोग फॉल्स मार्गे शिमोग्याहून पुन्हा बँगलोर गाठले. गोकर्ण उगाच राहुन गेल्याची चुट्पुट मनात आहेच पण ही ट्रिप खूप एन्जॉय केली. इतक्या दूरचा प्रवास कारने करायचा ह्या विचाराने सुरूवातीला थोडे टेंन्शन होते. पण एकेक ठिकाण बघत बघत एक एक हॉल्ट घेत फिरताना खूप मज्जा आली.

बँगलोर वरून NH4 वरून नेलमंगला जवळून मग नंतर NH48 रस्त्याने कुनिगल, येडियुर, हस्सन, मनी मार्गे मँगलोर गाठायचं होतं. मँगलोरच्या आधी साकलेश्वर पासून धर्मस्थळकडे व पुढे जाताना खड्ड्यांत किंचितसा रस्ता चांगला आहे. :फिदी: उगाच कशाला कुणाला नावे ठेवा? रस्ता घाटाचा त्यात भरमसाठ खड्डे, धुळच धुळ :) १०० किमी अंतर आम्ही फक्त साडेपाच तासात कापले. तुम्हाला सांगते एकदाही रस्त्याला, सरकार ला कुणालाच नावं ठेवली नाहित की पतीदेवांनी रस्त्याला शिव्याही हासडल्या नाहीत. फक्त पंतप्रधानांनी इकडे एकदा दौरा करायला पाहिजे अशी तिव्र इच्छा पतिदेवांनी व्यक्त केली. (ख.खो.दे.जा. मी आपली एस्सल वल्ड्च्या कुठल्याश्या राईड मधे बसल्यासारखी जीव मुठीत घेउन बसले होते.) जोक्स अपार्ट हा एक अनुभव सोडला तर कर्नाटकातले रस्ते खर्र खर्र चांगलेच चांगले आहेत बरं का. :) ह्या रस्त्यामुळे झालेल्या ह्या दमणूकीला वैतागुन आम्ही धर्मस्थळला जाणार्‍या फाट्याला काट देउन काहिही बघायचे नाही, अन मिनिटभरही थांबायचे नाही असे ठरवून सरळ मँगलोर गाठले. बँगलोर -मँगलोर हे ३५० किमी. अंतर कापण्यात दमछाक झाली आणि दिवसही संपला. मग हंपनकट्टे नामक भागात रहाण्यासाठी एक सुंदरसं हॉटेल शोधलं आणि दुसर्‍या दिवशी बिचवर जायचं ठरवलं.

मँगलोर

सकाळी सकाळी आधी मंगलादेवीच्या दर्शनाला गेलो. ह्या देवीच्या नावावरूनच ह्या शहराचं नाव मॅंगलोर पडलंय. राजा कुंदनवर्मा याने हे मंदिर नवव्या शतकात बांधले होते. बाहेरच वडाचा मोठ्ठा आणि उंच पाहिर्‍या बांधलेला पार आहे आणि तिथे नागदेवता आहेत. बर्‍यापैकी प्रशस्त आवार आणि मध्यभागी मंदिर आहे. चांदिच्या मखरात देवी उठून दिसत होती. प्रदक्षिणा मार्गात गणपतीला नमस्कार करून पुढे निघाले. दाक्षिणात्य मंदिरात असणार्‍या विहीरी आणि त्याच्याजवळ असणारी पुजेची मोठमोठी लख्ख घासून ठेवलेली तांब्या पितळेची उपकरणे बघायला मला नेहमी आवडते. जवळच्या ओट्यावर कुणितरी पुजारी चंदन उगाळत होते तर कुणी कुंकवाच्या राशीतले कुंकू प्रसाद म्हणून वाटत होते. मग आणखी कुणि तो अष्टगंध कापूर वेलची आणी धूपाचा मिश्र सुगंध असणारा प्रसाद. :) खूप प्रसन्न आणि शांत वाटलं. मंजुनाथ, मंगलादेवी आणि शरवु गणेश ही मंगलोरी लोकांची तिन प्रमूख दैवतं.

मंदिरातून बाहेर पडून झक्कास पैकी नाश्ता केला. वेगळ्या प्रकारची इडली. हातभर लांब रोल केळीच्या पानात गुंडाळलेली इडली, वडा सांबार :). मग बिच-बिच इंग्लिश मध्ये विचारत..... झालंच तर आमचं कडमडं कानडी बोलत..... बिच एल्लीदे ? यावद बिच होग बेकु ? रस्ता शोधत शोधत मॅंगलोर फिरताना इथे ३ बिच आहेत सोमेश्वर उल्लाल, पेरांबुर आणि सुरथ्कल असे समजले.

पेरांबुर बिचला गेलो. सकाळी अकरा आडेअकरा झाले होते. थोडीशी गर्दीही होती. हा बिच सेफ होता पाण्यात बरेच लोक डुंबत होते. आई मी पण जातो .. जाउ का ? हो म्हणे पर्यंत माझं पिल्लू पाण्यात कधी पळून गेलं समजलंच नाही. मागच्या वर्षी कुणकेश्वरला तर हा अजिबात पाण्यात येत नव्ह्ता आणि आज अफाट मस्तीत सुटला होता. त्याला सांभाळत मजा बघत. वेळ सर्रकन गेला. तेवढ्यात कुणितरी हे स्टारफिश... म्हणून ओरडलं. मी घेतला मग तो. :) आकाशातला तारा न मिळो..पण आता ओंजळीत मिळाल्यासारखा आनंद झाला.

ओंजळीतला तारा


थोडे फोटूगिरी केली. माशांच्या खमंग वासाने भूक खूप चाळवली. तिथेच किनार्‍यावर तिन चार फासिफु (फास्ट सि फूड) दिसले. खास मंगलोरी मसाल्यात तळलेले बिचवरच ताजे फ्राय केलेले सुरमई, पापलेट आणि बांगडे यथेच्छ खाल्ले. परमेश्वराचा प्रथमावतार.... धन्य झालो. जेवण झाले. :)

अश्शी मोठ्ठी सुरमई मिळाली तर तुमचंही असंच होईल :) हो कि नै ?


मॅंगलोर-उडुपी जवळ जवळ आहे. आणि जाताना वाटेत खुप बिच लागतात... रस्ता खुप सुंदर आहे अशी ऐकिव माहीती होती. मग काय पूर्ण सफर समुद्रकिनार्‍याचीच आहे. मग अजून इथे थांबण्यापेक्षा क्यु ना आगे कुच कि जाये? म्हणून NH17 पकडून सुरथकाल बिच न थांबता मागे टाकत पुढे कुप बिच(Kaup beach) जवळ आलो. इथुन उडुपी १४ किमी आहे. बिचवर पोहोचताच समोर नजर गेली आणि पिल्लू ओरडलाच "ओ वॉव सि देअर... लाईटहाउस !. "

मोठ्ठ्या खडकावर उभारलेले लाईटहाउस



उडुपीला पोहोचण्या आधी साधारण १४ किमी हा बीच आहे. लांबच लांब सोनेरी वाळूचा पट्टा.. स्वच्छ समुद्र किनारा ... किनार्‍यावरची नारळाची अन पोफळीची झाडे, समुद्रात घुसणारे मोठ्मोठे खडक आणि सर्वात सुंदर म्हणजे इथे उभारलेला हा १३० फुटी दिपस्तंभ. हा बिच म्हणजे फोटोग्राफर्स ना पर्वणीच आहे. उडूपीच्या बिच चे नाव kaup beach, पण खरे कापू असा उच्चार करतात कापू म्हणजे इथल्या तुळू भाषेत छोटेसे खेडे.


पाचमजली दुरंगी लाईटहाउस आणि तिथपर्यंत जायला जिन्याच्या पायर्‍या




ह्या किनार्‍यावरच्या मोठ्या खडकांमुळे जहाजांना धोका आहे हे सांगण्यासाठीच कदाचित हा दिपस्तंभ ब्रिटीशांनी १९०१ साली बांधला असावा. ह्याची उंची १३० फुट ( साधारण २७.१२ मिटर्स) अवढी असून २६ किमी पर्यंत दूरवरच्या समुद्रातिल खलाश्यांना ह्याचा लाईट दिसतो.

इथे ह्या लाईटहाउस मध्ये आपल्याला प्रवेश आहे. सनसेट व्ह्यायला आलाच होता ..अशि संधी म्हणजे दुग्ध शर्करा योग ... पुन्हा केव्हा मिळाणार ? मग दाराजवळ तिकिट घेतले. आणि आम्हीही लाईटहाउस मध्ये गेलो. सेक्युरिटी गेट्मन मराठीच.. काका म्हणाले बाळाला घट्ट धरा.

गोल गोल अरुंद जिन्याच्या पायर्‍या चढताना थोडं धडधडत होतं. पाच मजले वर गेल्यावर शेवटी एक प्लॅटफॉर्म होता तिथेच तो लाईट हाउस चा मोठ्ठा लाईट गोल गोल फिरत होता. अजुन आठ पाहिर्‍या चढुन मग बाहेर गॅलरीत जायला दरवाजा होता. बाहेर अगदी अरूंद गॅलरी १-दिड फुटाची जेमतेम एक माणूस उभा राहिल अशी. सर्वत्र एक नजर फिरवली सगळा नजारा डोळ्यात आणि मनात साठवून घेतला. पण मग फोटो न काढता कसं चालेल. नवशिकी असले तरीही मग जवळच्याच मोबाईल कॅमेर्‍याने मीही थोडी फोटूगिरी केली.

खाली बिचवरून सूर्याचे थोडे फोटो काढले होतेच.

खाली बिचवरून सनसेट पूर्वी


अजुन एक


पाण्यात घुसणारे कासव :)


लाईट हाउसच्या खिडकीमधून बिच


वर गॅलरीतून सूर्य


हा अजून एक

दोन दिवे


त्या गोलाकार गॅलरीतून हळूच एक प्रदक्षिणा मारली. एका बाजूला समुद्र आणि सूर्यास्त दिसत होता तर मागच्या बाजूला हा सुंदर बॅकवॉटर्स आणि ही हिरवाईचा देखावा.

समुद्रकिनरा आणि बॅक वॉटर्स


सनसेट होत होता तशी जोडप्यांची फोटो काढुन घ्यायची लगबग वाढली. मग आम्ही तिथुन काढता पाय घेतला. आता थोडा अंधार व्ह्यायला लागल्यामुळे तो फिरणारा लाईट छान वाटत होता. लेकाने बाबांसोबत थोडं इंजिनियरींग केलं. कुठली दोरी कुठली वायर कसा लाईट फिरतो वगैरे. :) मग हळूहळू पुन्हा तो अरूंद गोलाकार जिना उतरून हाली आलो. संध्याकाळ छान गेल्याचं मनोमन समाधान घेउन बिच वरून बाहेर पडता पडता.. वडापाव, भेळ अशी खादाडी केली. आणि पुढे उडुपीकडे निघालो.

उडुपी

उडुपी हे नाव ह्या छोट्या शहराला मिळालं ते उदुपती ह्या नावावरून भाळी चंद्र धारण करणारा जटाधारी शंकर म्हणजे उदुपती. किंवा अजुन एक अर्थ सांगितला जातो तो म्हणजे सगळिकडे भात शेती असणारा प्रदेश म्हणजे उदुपती. दोन गोष्टींसाठी उडुपी प्रसिद्ध आहे. एक म्हणजे इथली मणिपाल युनिव्हर्सिटी आणि दुसरे उडुपीकृष्ण मंदिर. ह्यालाच कॄष्णमठ असेही म्हणतात.

उडुपीकृष्ण मंदीर
कर्नाटकातल्या अनेक प्रसिद्ध धर्मशळांपैकी एक म्हणजे उडुपीचे हे कृष्णमंदिर. अनंतेश्वर, चंद्रमौलीश्वर कृष्ण मंदीर आणि अष्ठमठी हे सगळे एकाच आवारात आहेत. तेराव्या शतकात माधवाचार्य नावाच्या एका संस्कृत तत्त्ववेत्त्याला स्वप्नात दृष्टांत झाला होता. तेव्हा सापडलेली ही कृष्ण मुर्ती म्हणजे खरं तर द्वारकेतल्या रुख्मीणिने पूजलेल्या बालकृष्णाची. आताचे हे मंदिर सुमारे आठशे वर्षांपूर्वीचे आहे.

त्यामागची दंतकथा अशी सांगितली जाते की...कित्येक वर्षांपूर्वी वादळात एक जहाज हेलकावे खात होते. वादळ, घोंघावणारा वारा, उसळलेल्या समुद्राच्या लाटांवर मात करून जहाज किनार्‍याला लागले तो किनारा होता उडुपी मालपे बिच. आणि जेव्हा जहाज किनार्‍याला लागले तेव्हा त्याच किनार्‍यावर माधवाचार्य समाधीत लीन होते आणि वार्‍यावर उडणार्‍या त्यांच्या उत्तरीयामुळे जहाजाला दिशा मिळाली. व माधवाचार्यांच्या योग शक्तीच्या जोरापुढे वादळ जोर धरु शकले नाही. म्हणून माधवाचार्यांना नमस्कार करत त्या जहाजाच्या खलाश्यांनी, व्यापार्‍यांनी जहाजात आणलेली सगळी संपत्ती त्यांना अर्पण केली. परंतू माधवाचार्यांनी त्यातले काही एक न घेता स्वतःला स्वप्नांत झालेल्या दृष्टांतानुसार फक्त ही कृष्णमूर्ती घेतली.

पुढे कालोघात ह्या मंदिराचे व्यवस्थापन सुरळित रित्या पार पडावे म्हणून त्यांनी आठ उप मठांची निर्मीती केली तेच हे अष्ठ्मठी. ह्या मंदिराचे पौरोहित्य करण्याचा मान प्रत्येक मठाला दोन वर्षे मिळतो. दर दोन वर्षांनी जानेवारी महिन्यात पर्याय नामक विधीवत उत्सव साजरा करून मठाचे व्यवस्थापन बदलले जाते.

आम्ही ह्या मंदिराजवळ पोहोचलो तेव्हा रात्रीचे आठ वाजून गेले होते. दर्शन मिळेल की नाही ? मंदिराच्या वेळा ई. काहीच माहित नव्ह्ते. गर्दीही भरपूर दिसत होती. पण तिथे पोहोचल्यावर समजले. मंदीर दिवसरात्र सुरुच असते. आणि आम्ही रांगेत उभे असतानाच एका मोठ्या रथाची मिरवणूक मुख्य दारा पाशी आली. तो ब्रह्मरथ. ह्या रथातून गोपालकॄष्णाला वाजत गाजत घेउन आले. मग आम्हालाही त्यांच्या सोबतच त्यांच्या मागोमाग मंदिरात प्रवेश मिळाला. गोपालकृष्णाला पालखीतून मिरवत वाजत गाजत गाणि म्हणत तिन प्रदक्षिणा करवून आणतात मग पाळाण्यात जोजावून जो जो रे जो रे जो ... लाली लाली.. कृष्णा लाली अशी गाणि म्हणून झोपवतात. :) मंदिरातला हा दिवसाचा शेवटचा सोहोळा. लकीली मला ह्यापूर्वीही हे असं कृष्णाची अंगाई बंगळूरच्या इस्कॉन टेंपल मध्येसुद्धा बघायला मिळाले होते.
पण तरीही हे मला मिस करायचे नव्ह्ते. म्हणून इथे अजिबात फोटूगिरी केली नाही.

हे फोटो तुमच्या माहितीसाठी....

कृष्ण मठ (फोटो अंतरजालावरून साभार)



ब्रह्मरथ (फोटो अंतरजालावरून साभार)



कृष्ण (फोटो अंतरजालावरून साभार)



गाणी संपली. पाळण्यातल्या कृष्णाला नंतर गाभार्‍यात उचरून घेउन गेले. प्रमुख दरवाजा बंद झाला. तरीही बाहेरून कुठुनश्या खिडकीतून लोक आवाज देउन सांगत होते अरे बाजुला व्ह्या आम्हीही इथुन दर्शन घेत आहोत. नंतर गर्दी जरा ओसरली.. मग एका गुरुजींनी आम्हाला अधिक माहिती दिली. ही खिडकी म्हणजे डायरेक्ट बाहेरून आत इथे गाभार्‍यात दर्शन घेता येते ती ही कनकदासाची खिडकी. त्यांनी मंदिरातल्या इतर लहान लहान गाभार्‍यातल्या देवताही दाखवल्या. त्यात एक दोन फुटी अंजनेयाची हिरेजडित मुर्ती होती. बारिकश्या झरोक्यातून गाभार्‍यातल्या अंधारात फक्त दिव्याच्या तेजात ति रत्नजडीत मूर्ती अतिशय सुंदर दिसत होती. त्या गुरुजींनीच खुप माहिती दिली. मग खूप आग्रहाने आम्हाला आता तुम्ही प्रसादाचे जेवण करूनच जा म्हणत घेउन गेले. मठाधिपतींचे दर्शन सुद्धा झाले. रस्सम भाथ प्रसाद घेउन तृप्त झालो. :) बाहेर आलो तर आवारात कथकली मध्ये कुठल्याश्या पारंपारीक नाटकाचा प्रयोग चालला होता.


पुन्हा बाहेर येउन मणिपाल ला येउन हॉटेल शोधले. उद्या मुरुडेश्वर गाठायचे होते.

नाश्ता करावा तर उडप्याकडे ! खराखरा उडपी नाश्ता केला आणि पुढच्या प्रवासाला निघालो. NH17 पकडून मालपे, कुंदापूर, बैंदुरु, भटकल,मारवन्ठे मार्गे मुरुडेश्वर कडे निघालो. हा NH17 रस्ता अतिव सुंदर आहे. एका बाजूला विशाल समुद्र आणि एका बाजूला सौपर्णीका नदी आणि मधून हा सुंदर डांबरी रस्ता.

रस्त्याच्या एका बाजूला समुद्र आहे आणि एका बाजूला खाडी



अश्या समुद्राच्या बाजुने जाणार्‍या रस्त्यावरून जातानाचा आनंद अवर्णनिय.वाटलं हा रस्ता संपूच नये. कित्येक किलोमिटर सोबत करणारा हा समुद्र मध्येच झाडा झुडपांत गायब होउन जायचा... कधी खाडी तर कधी कधी सुबक एकसारख्या बांधलेल्या दगडी पूलांवरून गाडी गेली कि पुन्हा समुद्र किनार्‍याचा रस्ता लागत होता.



खाडी आणि होडी


पुन्हा एकदा होडी




क्रमशः

1/02/2011

वेचीत वाळूत शंख शिंपले......

कसं असतं ना आपण मोठ्ठे होताना आपलं बालपण हरवतं ... आणि मग थोड्याच काळात आपल्या मुलांच्या रुपात गवसतं ..आपल्यासमोर पुन्हा उभं रहातं ...आता लेकाला बघून असं वाटतं, आपणही आपल्या लहानपणी असा समुद्र ..पाणि .. शंख ..शिंपले ..किनारयावरची वाळू बघून असंच हरकून जायचो.तासंतास खेळायचो. न थकता, न दमता.

मुरुडेश्वरच्या विस्तीर्ण समुद्रकिनार्यावर श्रेयान सुद्धा तसाच मस्त एंजॉय करत होता.पण छोट्या पिल्लाला घेउन पाण्यात मस्ती करणं मला शक्य नव्हतं.मग शंख शिंपले शोध, स्टारफिश बघ, वेगळ्या अनोख्या वाटणार्या गोष्टीँचे फोटो काढ , असं करून जेव्हा कंटाळा आला तेव्हा मग टाईमपास म्हणून समोर दिसणार्या शंकराचं चित्र काढुया म्हणत हा एका वाळूतल्या चित्राचा प्रयत्न केलाय. bara जमलंय असं वाटलं म्हणून तुम्हा सगल्या मित्र maitriNIAn sobat शेअर करतेy