10/10/2012

सखो कचोरी

मायबोली गणेशोत्सवाच्या निमित्ताने पाककृती स्पर्धा आयोजित केल्या होत्या. स्पर्धेचं नाव होतं मिसळम पाकम गट्टम गट्टम… आहे की नाही गमतीशीर ? स्पर्धेचे नियमही वेगळे आणि मजेशीर होते. मजेशीर म्हणण्यापेक्षा जरा हटके. नियमावली मध्ये सांगितलेले जिन्नस वापरून मिसळम करून पाकम करायचे होते. आणि तोच बाप्पा ला नैवेद्य :) मी बनवलेली नवीनच पाककृती इथे तुमच्या सर्वांसोबत शेअर करतेय. आणि हो मला माझ्या ह्या पाककृती साठी स्पर्धेत पहिला क्रमांक मिळालाय बरंका !
तर सादर आहे मिसळम पाकम गट्टम गट्टम… सफरचंद खोबरे कचोरी म्हणून सखो कचोरी

लागणारा वेळ:  १ तास
लागणारे जिन्नस: 


सफरचंद १
उकडलेले बटाटे मध्यम आकाराचे २-३
तांदळाचे पिठ १ वाटी
खोबरे १ वाटी
खजुर ८-१०
मिर्च्या ४-५
लाल मिर्ची पावडर १ चमचा
जिरे १ टेबल्स्पून
कढिपत्ता ६-७ पाने
मुठभर कोथिंबीर बारीक चिरुन
मीठ आणि साखर चवीप्रमाणे
तळण्यासाठी तेल
क्रमवार पाककृती: 

प्रकाशचित्र डाविकडून उजवीकडे क्रमवार

१. सफर चंद किसून घेतले.
२. एका पॅन मध्ये चमचाभर तेल तापवुन त्यात जिरे बारिक चिरलेल्या मिर्च्या आणि कढिपत्ता टाकुन चुरचुरीत फोडणी केली. त्यात अर्ध्या सफरचंदाचा किस टाकुन जरा सोनेरी रंग येई पर्यंत परतुन घेतले. मग त्यात खवलेले खोबरे घालुन त्यावर चविप्रमाणे मीठ साखर घालुन परतले. मुठभर बारिक चिरलेली कोथिंबीर टाकुन गॅस बंद केला. हे कचोरीचे सारण गार होई पर्यंत पुढे पारी बनवण्याची तयारी केली.
३. उकडलेले बटाटे किसुन त्यात वाटीभरुन तांदळाचे पिठ चमचाभर तेलाचे मोहन, चवीप्रमाणे मीठ आणि लागल्यास थोडेसे पाणी लाउन घट्ट गोळा मळून घेतला.
४. एका बोल मध्ये खजुर घेउन त्यात अर्धी वाटी पाणी टाकून १ मिनिटे हाय वर मायक्रोवेव्ह केले. मग त्यात उरलेल्या अर्ध्या सफरचंदाचा किस, थोडे भाजलेले जिरे आणि चवीप्रमाणे लाल तिखट व मिठ घालून चटणी मिक्सरवर वाटून घेतली. चटणीला एक उकळी काढली.
५. चटणी थंड होई पर्यंत. तेल तापायला ठेउन, पारीसाठी बनवलेल्या गोळ्यातले थोडे पिठ घेउन त्याची हाताने वाटी करुन त्यात एक मोठ्ठा चमचा सारण भरुन गोळे बंद केले. सोनेरी रंगावर सर्व कचोर्‍या तळून काढल्या.
वाढणी/प्रमाण: 
खाल तेवढ्या.. :) वर दिलेल्या साहित्याच्या प्रमाणात ११ मोठ्या कचोर्‍या होतात.
अधिक टिपा: 
ह्या कचोर्‍या तिखट आंबट गोड मस्त चवीच्या होतात.
सफरचंदाची मस्त चव येते.
सारणामध्ये थोडेसे मनुके आणि काजु तुकडे टाकता येतील.
बटाटे उकडण्यापूर्वी त्यावर सुरीने मध्यभागी चिर देउन उकडले (वर फोटो पहा) तर सोलताना एका झटक्यात साल निघुन येते. स्मित
तांदळाचे पिठ आणि बटाटा वापरल्याने पारी मस्त खुट्खुटीत होते. (क्रिस्पी + सॉफ्ट पण कडक नव्हे )

आणी हे माझं बक्षिस :)


सोबत


आपली स्वतःची सावली देखील
आपल्या सोबत चालत नसते
कुणा एका सूर्याच्या इशार्‍यानुसार
आगे मागे धावत असते . . .













9/26/2012

तोंपासु - तोंडाला पाणी सुटले की नाही ?


मायबोली गणेशोत्सवाची तोंपासु स्पर्धा...... मग बाप्पाला नैवेद्य हवा ना ? :)
मोदक, पिस्ता बर्फी, चॉकलेट बर्फी, मोतीचूराचे लाडू देखील केले..
बाप्पा म्हणे कंटाळलो काहीतरी वेगळे दे मी अमेरिकन आहे..

म्हणून मग कपकेक, डोनट्स आणि स्विस् रोल नैवेद्याला केले :)

तरीही स्वारी नाखुशच..म्हणे खूप खूप गोड झाले !

मग दिले मस्त तिखट तिखट मिर्च्यांसोबत दोन जंबो वडापाव.. बाप्पा म्हणाला, "वॉव ! सो य्म्म्म्म्म्मी.. बाकी सब भूल जाव !"

आमच्या डाएट फ्रेक बप्पा साठी किती छोटुकले पदार्थ आहेत पहा.
मोदक, पिस्ता बर्फी आणि चॉकलेट बर्फी :)


डोनट्स, कपकेक आणि स्विस् रोल :)

जंबो वडापाव :)


बाप्पाच्या नैवेद्या साठी वापरलेले साहित्य :
लहान मुलांची खेळण्याची माती (प्ले डो) मातीला आकार देण्यासाठी सुरी आणि एक सुई
कृती :
सगळे पदार्थ हाताने बनवले आहेत.
माती चांगली मळून मउ करुन हवे ते आकार बनवले.
गरज पडल्यास सुरी ने कापले. मोदकांना आणि केक ला सुई ने आकार दिलाय. कश्याचाच मोल्ड नाहीये.
पाव, मिर्च्या, वडा आणि वडापावची हिरवी चटणी बनवण्यासाठी आणि योग्य ते टेक्श्चर येण्यासाठी दोन रंगाची माती एकत्र केली आहे.

9/24/2012

सूर्याची पिल्ले

विकांताला एअर बलून शो नंतर झालेल्या फायरवर्क्स मध्ये मी केलेली मोबाईल फोटूगिरी :डोमा: १.जल्लोष रोषणाईचा २. राजा अन प्रजा ! ३.डबलबार !! ४. सूर्याचे सप्तरंगी घोडे ५. ६.स्टार जेली फिश ? ७. जेली फिश ८. उगाच फुलूनी आले फुल.... ९. आणि तो मला हसला... म्हणाला, "वेडीच्चे ! किती फोटो काढशिल ? "

7/22/2012

ही वाट दूर जाते, स्वप्नामधील गावा...........




फ्लिंट हून डॅलस ला येताना गाडीतून दिसलेला क्षितिजा पर्यंत लांबच लांब दिसणारा मोकळा रस्ता आणि नेमकी सुर्यास्ताची वेळ. न रहावून शांताबाईंचं हे गाणं आठवलंच ..

जेथे मिळे धरेला आभाळ वाकलेले
अस्ताचलास जेथे रविबिंब टेकलेले
जेथे खुळ्या ढगांनी रंगीन साज ल्यावा
माझ्या मनातला का तेथे असेल रावा ?

ही वाट दूर जाते, स्वप्नामधील गावा...........