10/12/2009

मडिकेरी-कूर्ग

एखादा लाँग विकेंड आला की मस्त कुठेतरी फिरून येउ हा विचार बरेच दिवस मनात होता. मग बंगळूरच्या जवळपास कुठे तरी जाउया म्हणून शोधाशोध करताना मडिकेरी समोर आलं. मडिकेरीला जायचं ठरलं. आहे काय हे मडिकेरी म्हणून इंटरनेटवर शोधले असता समजले की, मडिकेरीला कूर्ग ला भारताचं स्कॉट्लंड समजलं जातं तर कुणी कुणी दक्षिणेतला कश्मिर म्हणतात. अरे वा!, भर मार्च मध्ये गारवा कुणाला आवडणार नाही. कसं जायचं काय पहायचं अशी जुजबी माहिती गोळा करून आम्ही निघालो.

मडिकेरी म्हणजे कूर्ग चे जिल्हा हेडक्वार्टर्स. समुद्रसपाटीपासून ५००० फूट ( साधारण १५२५ मिटर्स) उंचीवर असलेला हा प्रदेश. उतरणीच्या टेकड्यांवर वसलेलं एक छोट्टसं गाव. बुटक्या बैठ्या लाल कौलारु बंगल्यांची शोभा काही निराळीच. इथे रहाणारे कोडवू लोक हिंदू क्षत्रिय व खूप शूर. हे मडिकेरी किंवा मर्केरी १६८१ मध्ये हलेरी चा राजा मुद्दु ह्याने वसवलं. म्हणूनच त्याला मुद्दुराजकेरी आणि नंतर अपभ्रंशित मर्केरी किंवा आत्ताचं प्रचलित नाव मडिकेरी मिळालं असावं.

इथल्या संस्कृती बद्दल समजावून घेताना कळलं की, कोडवू हा शब्द मुळच्या कुडू ह्या शब्दापासून आला आहे. कोडाईमालेनाडू म्हणजे टेकड्यांचा प्रदेश -"dense forest on steep hills". दक्षिण भारतातल्या नयनरम्य निसर्ग सौन्दर्य लाभलेल्या हिलस्टेशन्स पैकी एक असलेले कोडवू म्हणजे कावेरी नदीचे उगमस्थान आहे. कोडवू लोक कावेरीची पूजा करून स्वतः ला तिची लेकरे मानतात. आदरातिथ्य करण्यात कोडवू लोक सर्वश्रुत आहेत. कोडवू रेसिपिज सुद्धा तेवढ्याच छान आहेत.
पूर्वापार चालत आलेल्या इतीहासापासून ते १६ व्या शतकापर्यंतच्या शीलालेखांवरून असे समजते की कूर्ग वर कुण्या एकाच राजघराण्याची सत्ता नव्हती. तर अनेक राजांनी वेगवेगळ्या काळात इथे राज्य केले होते. इथे असणार्‍या शीलालेख आणि ताम्रपटांवर इथे गंगा, कदंब, छोला, कोंगवा, होयसाला आणि नायक ई. वेगवेगळ्या लोकांनी राज्य केल्याच्या नोंदी आहेत. हा झाला मडिकेरीचा इतीहास.

कूर्ग कर्नाटकाच्या पश्चीमी घाटावर सुमारे ४१०२ स्के. मी ईतकं वसलेलं दर्‍या खोर्‍यांचं गाव आहे. बंगळूर ते मडिकेरी अंतर २५२ किलोमिटर आहे. चहा कॉफीच्या बागा मळे पहायच्या तर कूर्गला जावे. मऊ धुक्याने भरलेली दरी पहायला, नगमोड्या वळणावळणाच्या रस्त्यांचा आनंद घ्यायला कूर्गला जावे. खरं तर ऑक्ट्बर ते मे हा इथला मेन सिझन. पण पावसा आधी पावसा नंतर केव्हाही जाण्यात आनंदाची पर्वणीच आहे.

आम्ही सकाळी सहा ला मडिकेरिला जाण्यासाठी बंगळूरहून निघालो. SH-17 वरून श्रीरंगपट्टना, व्हाया मड्डूर बायपास, रंगनथिट्टु, हुंसूर असे करत मग SH-88 मार्गे कुशलनगर वरून मडिकेरीला जावे लागते. साधारण अकरा बारा वाजेपर्यंत कुशलनगर पार करून सुन्तिकोप्पल सोडलं पुढे मडिकेरीकडे जवळच आहे असं समजलं. रस्ता फारच छान होता. जसजशी वळणे वाढत गेली त्याचबरोबर हिरवाईही. रस्त्यात भरपूर बांबूची वनं आहेत. सर्वत्र पसरलेल्या हिरव्यागार बागांमध्ये कसलीशी टप्पोरी फुलं फांदीभर लगडलेली दिसू लागली. त्या फुलांचा वास आसमंतात भरून राहिला होता. गाडी पुढे जाउ लागली तशी ह्या झाडांची शेतीच आहे.. मळे फुललेले दिसले आणि आम्ही खात्री केली हेच ते कॉफीचे मळे. उतरणीच्या रत्यांवर लाल कौलारू घरं दिसू लागली. अमुक तमुक कॉफी इस्टेट.. होम स्टे असे बोर्ड दिसू लागले. इथले लोकल लोक खास घरं ट्युरिस्ट लोकांना होम स्टे देतात. तिथल्या रहाण्याबद्द्ल आणि जेवणाबद्द्ल एक दोन स्नेह्यांकडून बरेच ऐकले होते. आम्ही क्लब महिन्द्रा रिसॉर्ट ला जाणार असल्याने ते शोधत खुद्द मडिकेरीमध्ये पोहोचलो. एका चौका सारख्या ठिकाणी ट्युरिस्ट इन्फॉर्मेशन साठी मोठठा बोर्ड दिसला. काही लोकल साईट सिईंग पॉईंट्स आहेत. सगळे जवळ जवळ होते. रिसॉर्ट् वर जाउन फ्रेश होउन, जेउन निघालो साईट सिईंग ला.

मडिकेरी किल्ला : (Madikeri Fort)आधी मातिच्या असलेल्या ह्या किल्यांची टिपू सुलतानाने सध्या असलेल्या दगडी किल्ल्यात पुनःबांधणी केली. अठराव्या शतकात टिपू सुलतानाने इथे राज्य केले होते. किल्ल्याच्या आत साधे बांधकाम असलेला लिंगायत राज्यकर्त्यांचा राजवाडा आहे. ह्या किल्ल्यावरून पूर्ण मडिकेरी भागाचे उत्तम दर्शन होते.

गदिग्गे : (Raja's Tomb)
ह्या ठिकाणी राजा लिंगराजेन्द्र ह्यांची सन १८२० मध्ये बांधलेली समाधी आहे. तसेच त्या बरोबर राजाचे धर्मगुरु आणि मोट्ठा विरराजेंद्र आणि राज्याच्या दोन सैनिकांच्याही समाधी आहेत इथे. मडिकेरी शहरातल्या महादेव पेठेच्या उत्तरेकडे ही गद्दिगे आहे.

ओंकारेश्वर मंदीर : (Omkareshwara Temple)


कोडवू राजा लिंगराज याने सन. १८२० मध्ये बांधलेले थोडेसे मुघलाई धाटणीचे हे शंकराचे मंदीर आहे. मध्यभागी मोठा मशिदीसारखा घुमट आणि त्या बाजुला चार छोटे मिनार आहेत.

मुख्य मंदिराच्या गाभार्‍याभोवती प्रदक्षिणा करायला मोठ्ठा परिसर आहे. काही खोल्यांची तटबंदी आहे. त्याच्या भंतींवर देवदेवतांची सुंदर चित्रे पहायला मिळतात. मंदिर परिसरात एक अतिप्राचिन विहीर आहे.

मंदिरासमोरच एक छोटासा तलाव आहे.


ह्या मंदिराविषयी एक गोष्ट सांगण्यात येते. लिंगराजेन्द्राने स्वतःच्या राजकिय स्वार्थासाठी एका प्रामाणिक सद्भक्त ब्राह्मणाला मारले. तो ब्राह्मण ब्रह्मराक्षस झाला आणि राजाला छळू लागला. मग राजाने काशीहून एक शिवलिंग आणले व मंदिरात स्थापन केले आणि त्याची ह्या तथाकथीत ब्रह्मराक्षसाच्या त्रासापासून मुक्तता झाली. असेही सांगितले जाते की ह्या मंदिराच्या खिडक्यांचे गज पंचधातूचे आहेत आणि त्यावर लिम असे लिहिलेले आहे.

अ‍ॅबी फॉल्स : (Abbey Falls)

बोली भाषेत अ‍ॅबी म्हणजे धबधबा. मडिकेरीपासून साधारण १-२ किमी आत एका खाजगी कॉफी ईस्टेटीत हा नयनरम्य धबधबा आहे. ह्या भागात पर्यटकांची बरीच गर्दी असते. इथे आल्यावर बाहेर बर्‍याच खाउच्या कणसं नारळपाणी उसाचा रस विकणार्‍या गाड्या दिसल्या. गाडी पार्क करून आत खाली बरंच चालत गेल्यावर हा धबधबा आहे. कावेरीचे पाणी उंच खडकांवरून पडताना फारच सुंदर दिसते. धबधब्याचा चांगला व्ह्यु मिळावा म्हणून एक झुलता पूल बांधलेला आहे.


अ‍ॅबे फॉल्सहुन परत येइ तोपर्यंत संध्याकाळ व्हायला लागली होती. राजाज सिट ला जाउन सनसेट बघायचा होता.

राजाज सिट :(Raja's Seat)
फोर्ट पासून एक किलोमिटर अंतरावर हा पॉईंट आहे. कोडवु राजे इथे बसून सुर्यास्त बघत. एक छोटीशी बाग आहे. आणि बच्चेकंपनीला खेळवायला फिरून आणायला छोटीशी ट्रेन आहे इथे. बागेच्याच पश्चीमेकडे एका उतरत्या टेकडीच्या पाहिर्‍यांवरून मडिकेरी भोवतालच्या निसर्गाचे एकाच ठिकाणाहून दर्शन होते. न मावळणारा सूर्य, हिरवे हिरवे गालिचे पसरलेले चहा कॉफीचे मळे, आणि हिरवाईवर पांघरलेले चंदेरी ढगांच्या दुलईसारखे भासणारे आकाश. मावळतिच्या त्या लालभडक मोठ्या सुर्यबिंबाचे दर्शन घेउन मन अगदी तृप्त झाले.

खुद्द मडिकेरीमध्ये पहाण्यासारखे इतकेच होते. मग दुसर्‍यादिवशी जवळपास फिरून यायचे ठरले.
सकाळी नाष्ता करून भगमंडला नावाचा नदिचा संगम आणि तलकावेरी म्हणजे कावेरीचे उगमस्थान पहाण्यासाठी निघालो.

भगमंडला : (Bhagamandala)

मडिकेरी पासून ३३ किलोमिटर वर हे ठिकाण आहे. ह्या ठिकाणी कावेरी आणि कनिका ह्या दोन नद्यांचा संगम आहे. तिसरी सुज्योती नावाची नदीही ह्या संगमाला जमिनीअंतर्गत मिळते. १७ किंवा १८ ऑक्टोबर ला जेव्हा तुला संक्रमण असते तेव्हा अनेक यात्रेकरू ह्या संगमात स्नान करून पुण्य मिळवतात. ह्या संगमाजवळच भगंडेश्वराचं मंदिर आहे. केरळी पद्धतीने बांधलेल्या ह्या मंदिरात शंकर, सुब्रमण्या, महाविष्णू आणि गणपतीची छोटी छोटी मंदिरं आहेत.

हा भगमंडला नावाचा भाग सन १७८५ ते सन १७९० या काळात टिपू सुलतानाच्या अधिपत्याखाली होता. तेव्हा ह्या भागाला अफिसालाबाद असे म्हणले जायचे. मग १७९० ला राजा विरराजेन्द्राने तो पुन्हा कोडागू म्हणून स्वतंत्र मिळवला.

तलाकावेरी : (Talakaveri) कावेरी नदीचे उगमस्थान
ब्रह्मगिरी पर्वताच्या पुर्वेकडील उतारावर, भगमंडलापासून सुमारे ८ किलोमिटर अंतरावर कावेरी नदिचे उगमस्थान आहे.
ज्या ठिकाणी नदिचा प्रवाह उगम पावतो त्याला गुंदिगे असं म्हणतात. त्याला लागूनच एक छोटसं पाण्याचं कुंड (तलाव) आहे. ह्या कुंडाचे पाणी पुढे जमिनीत अंतर्धान पावतं ते दूरवर साधारण एक दिड किलोमिटर खोल टेकडीवर पुन्हा आढळतं. दर वर्षी तुलासंक्रांतिला ह्या गुंदिगे ठिकाणच्या पाण्याचा प्रवाह अचानक वाढ्तो त्याला तिर्थोद्धवा असं म्हणतात. हे तिर्थ म्हणजे साक्षात पार्वती इथे अवतरते अशी भाविकांची श्रद्धा आहे. अनेक भाविक हे पवित्र तिर्थ भरुन आपल्या घरी घेउन जातात.

ह्या गुंदिके जवळच दोन छोटीशी मंडिरं आहेत. एक गणेशाचं आणि दुसरं शिवाचं. असं सांगण्यात येतं की इथे असलेल्या अश्वत्थ वृक्षाजवळ अगस्त्य ऋषींना त्रिमुर्ती-ब्रह्मा विष्णू महेषाचा साक्षात्कार झाला होता. तसेच ह्या ठिकाणी सप्तमहाऋषींनी मोठे यज्ञ केल्याचंही सांगितलं जातं.

ह्या तलाकावेरीपासूनच वर ब्रह्मगिरीकडे जाण्यासाठी पाहिर्‍या आहेत.
आम्हीही थोड्या पाहिर्‍या चढून उतरून आलो. दमून संध्याकाळी उशिरा रिसॉर्टवर पोहोचलो. क्लब महिन्द्राच्या कॉटेजेस मस्त आहेत. सगळी व्यवस्थाही चोख आहे. जेवणासाठीही बरेच ऑप्शन्स उपलब्ध होते. तरिही आम्ही मडिकेरी मधे अजुन दोन तिन हॉटेल्स खादाडीसाठी शोधून ठेवली होती.

पुन्हा बंगळूर ला परताना परतीच्या वाटेवर कुशलनगर जवळ बरीच ठिकाणे आहेत. पिकनिक स्पॉट्स आहेत. ट्रेकिंग करणार्‍या हौशी लोकांसाठी छोटे छोटे अ‍ॅडव्हेंचर कॅंप्स आहेत.

वीरभूमी :

कर्नाटकातलं एकमेव थीम रेसॉर्ट आणि अ‍ॅडव्हेंचर कॅंप.

निसर्गधाम :

मडिकेरीपासून ३० किमी. आणि कुशलनगरपासून फक्त २ किमी अंतरावर हे रेसॉर्ट आहे. नावाप्रमाणेच निसर्गधाम आहे. इथे हरीणं, हत्ती, मोर आणि इतर बरेच प्राणि बघायला मिळतात. इथे इलेफंट सफारी असते. एक मस्त अविस्मरणीय सफर.

गोल्डन टेंपल : (GoldenTemple- Buddhist Monastery)

कुशलनगर पासून ४ किमी वर बायलाकुप्पे नावाच्या ठिकाणी तिबेटीयन लोकांचा रिफ्युजी कँप आहे. चिन ने तिबेटचा ताबा मिळवल्यावर, बरेचसे रेफ्युजी ह्या कुशलनगरजवळच्या बायलाकुप्पे ला स्थाईक झाले.
१९७२ ला ही बुद्धीस्ट मोनस्ट्री पुनःप्रस्थापीत केली.

बायलाकुप्पेला आल्यावर सर्वत्र पिवळे झेंडे फडकताना दिसतात. स्तूप दिसतात. मग आपण गोल्डन टेंपल जवळ येउन पोहोचतो. गोल्डन टेंपल फारच प्रेक्षणिय आहे. मुख्य गेट पासूनच रांगोळ्यांसारखी रस्त्यावर सुंदर चित्रे रेखाटलेली आहेत.

मुख्य मंदिराच्या दालनात आतमध्ये ४० फुटी मोठ्या पद्मसंभव, बुद्ध आणि अमितयुस यांच्या मूर्ती आहेत.


दुबेर : (Dubare)

कुशलनगर जवळच मडिकेरी सिद्धपूर रोडवर कावेरी नदीतीरावर कूर्ग वनविभागाचा दुबेर एलिफंट ट्रेनिंग कँप आहे. इथे जंगली हत्तींना पकडून त्याना इतर प्रशिक्षीत हत्ती आणि स्थानिक आदिवासी जमातीच्या लोकांकडून प्रशिक्षण दिलं जातं. ह्या प्रशिक्षण शिबिरात जाण्यासाठी कावेरीचा प्रवाह छोट्या बोटीतून पार करावा लागतो.

आणखी पुढे परतीच्या वाटेवर हुंसूर वरून नागरहोल अभयारण्याकडे एक फाटा आहे. पण वेळे अभावी आम्ही तिथे जाउ शकलो नाही. मग नागरहोल आणि बंदिपूर ही अभयारण्ये पुन्हा एखाद्या मोठ्ठ्या विकेंड ला येउन बघायचे ठरवून आम्ही घरी परतलो.

10/06/2009

लंकेची पार्वती

सोने की लंका जलाय गयो रे, एक छोटोसो वानर....
रावण को पानी पिलाय गयो रे, एक छोटो सो वानर...
ढुडुम ढुम टू ढुम ढुम...

मंदिरात ढोलकी.. टाळ.. टाळ्यांच्या गजरात गाणं खूपच रंगलं होतं. ते कानात इतकं बसलं होतं.. आणि त्या सोबतच सोनेकी लंका सोनेकी लंका हे शब्दही एकसारखे मनात येत होते आणि प्रश्णही तेवढेच पडत होते.

रामायणातले लंकादहन आपल्या सगळ्यांनाच माहीत आहे. हनुमानाने सोन्याची लंका जाळली.
लंका सोन्याची खरंच होती का ? होती तर सोन्याची का होती आणि कुणी बनवली होती ?
सीतेला लंकेची पार्वती का म्हणतात ?
लंकेत सोन्याच्या विटा हा वाकप्रचार का रुढ झाला असेल ?

जाउदे ना ही सारी पुराणातली वांगी - वानगी. पण पुराणात ह्या सार्‍याचा उल्लेख आहे म्हणजेच त्यामागे काही ना काही गोष्ट असली पाहिजे. प्रत्येक संदर्भासाठी काही कथा दंत कथा सांगितल्या जातात. त्यापैकीच ही सोन्याच्या लंकेची आणी पार्वतीची कहाणी.

कैलासावर रहाणार्‍या अजर अमर शिवपार्वतीची एक कहाणी आहे. बसल्या बसल्या एके दिवशी देवी पार्वतीच्या मनात आले की देवी लक्ष्मीला भेटायला तिच्याकडे जायचे. शंकर भगवान नको म्हणत असतानाही शेवटी त्यांची आज्ञा घेउन देवी पार्वती लक्ष्मी कडे गेली. खरं तर प्रभू इच्छेविरूद्ध काहिही घडणे कठीणच. पण मन वेडं असतं तेच संकल्प विकल्प घडवून आणतं जेव्हा जिथे हवं तिथे आपल्याला घेउन जातं, त्याच प्रमाणे पार्वतीचं मनही भरकटलं होतं.ती अतीशय आनंदाने देवी लक्ष्मीकडे जायला निघाली. मनात विचार करीत होती की मला अकस्मात आलेलं बघून लक्ष्मी माझं स्वागत करेल खूप आदरातिथ्य करेल. स्वतःच्या आसनावरून उठून धावत येउन मला मिठी मारेल, जबरदस्ती ने माझा हात धरून मला आसनस्थ करेल, धूप दीप नैवेद्याने मग मला सन्मानीत करेल वगैरे.

पण पार्वतीने जो विचार केला होता तसं प्रत्यक्ष झालंच नाही. घरी आलेल्या उमा पार्वतीला लक्ष्मीने साधं पाणीही विचारलं नाही. उलट अभिमानाने स्वतःचा तोरा मिरवत लक्ष्मीने पार्वतीला तिचं सारं राजभवन, धन वैभव, नोकर चाकर दाखवून खूप हिणवलं आणि म्हणाली,"ज्याला सारं जग त्रिपुरारी म्हणून ओळखतं तो तुझा भिकारी नवरा कुठे आहे ? चिता-भस्म, त्रिशूल-फावडी आणि फाटकं मृगजीन घेउन त्यानं कुठे बस्तान बसवलं आहे ?" पार्वतीने हे ऐकताच तिचा क्रोधाग्नी भडकला, ओठ थरथरले, जीभ फडफडली.. ति म्हणाली, "तू माझा सन्मान नाही केलास तरी चालेल पण माझ्या पतीचा विनाकारण अपमान मी सहन करणार नाही. माझ्या पतीला भिकारी म्हणताना तुला लाज वाटत नाही ? खरं तर तुझ्या पतीला द्युता खेरीज कधी काही कामकाज नाहिये. तोच भिकारी राजा बनून शिवाकडे गेला असेल. किंवा वामन बनून बलीकडे गेला असेल. सतत सगळीकडे आपली झोळी पसरून भिक मागत फिरत असतो. दधिची रुषींकडे तर त्याने हाडं भिक्षा म्हणून मागीतली होती. विसरलिस का? शंकर तर जगाचे तारणहार भोले भंडारी आहेत." पार्वती अश्या प्रकारे लक्ष्मीवर चिडली आणि उद्विग्न मनाने ती कैलास पर्वतावर परतली.

पार्वतीला पाहून अंतर्यामी भगवान म्हणाले, "हे देवी आज चेहरा एवढा उदास का ?" त्यावर उमा पार्वतीने लक्ष्मिने केलेल्या उपहासाचं वर्णन करून शिव शंकराला सांगितले. आणि म्हणाली, "आजपासून मी अजिबात अन्न पाणी घेणार नाही, उपाशी राहून भले माझे प्राण मला गमवावे लागले तरी बेहत्तर. तुम्हाला जर माझे प्राण प्रिय असतील तर मी सांगते तसा महाल मला बनवून द्या. महाल बनवल्यावर गृहप्रवेशासाठी लक्ष्मीला आमंत्रीत करून मला माझ्या अपमानाचा बदला घ्यायचा आहे. माझ्या अपमानाचा असा बदला घेइन की सारी दुनिया बघत राहिल." ह्यावर शंकराने पार्वतीला खूप समजावलं. म्हणाले, "मान अपमान, हे सारं आपण मानण्यावर असतं. जाउदे ते कडवट बोलणं विसरून जा. राग विसरून तुझं मन शांत कर. त्यातच खूप सुख आहे." पण देवी पार्वती ऐकायला तयारच नव्ह्ती. हट्टाने ती रडू लागली.

मग भगवान शंकरांनी विश्वकर्माला संदेश पाठवून आमंत्रित केले व सांगितले देवी उमा पार्वती दु:खी कष्टी आहे. तुम्ही तिचे दु:ख दूर करा. तिला जसा हवा तसा महाल बनवून द्या. पार्वती खुष झाली. व विश्वकर्म्याला समजावू लागली. मला समुद्राच्या मध्यभागी एक नगर वसवायचे आहे. ज्याला चार दरवाजे असतिल असा किल्ला बनवायचा आहे, जिथे थंड-गरम पाण्याचे ताल तलाव असतिल, सुंदर बाग-बगिचे, स्वच्छ रस्ते असतिल. माझ्या रंगमहालाच्या छतालाही तुम्ही सोने लावा. सगळे दरवाजे सोन्याचे बनवून मधे मधे हिरे-मोती जडवा. चमचमणार्‍या फरश्यांवर रंगीबेरंगी मिनाकारी करा. सोन्याच्या भिंती, छत आंगणही सोन्याचंच बनवा. मंच, पलंग इतकंच काय महालातली भांडी सुद्धा सोन्याचीच हवी. आज पर्यंत असा महाल कुणीच बनवला नसेल. बघितला नसेल. लक्ष्मी ने असा महाल बघितल्यावर तिने मान खाली घातली पाहिजे.

विश्वकर्म्याने सगळे समजावून घेउन आपले अनुयायी ब्रह्मलोकातून बोलावून घेतले. भवन निर्माण कलेचे सगळे सामान सोबत घेउन ते आले. एक सर्वोत्कृष्ठ वास्तूकलाकार म्हणून आदिकालापासून विश्वकर्मा प्रख्यात होता, चित्रकला, मूर्तीकला, ह्या सारख्या नानाविध कला वापरून भवन, वास्तू निर्माण करण्यात तो एकदम निपूण होता. डोळे मिटून आपल्या मनात जी कल्पना करी ती साक्षात डोळ्यांसमोर पूर्णत्वास आणी. तसाच एक चमत्कार विश्वकर्म्या ने ह्या वेळीही दाखवला. समुद्राच्या मधोमध एक अनोखा महाल- दिव्य भवन उभारून दाखवले.

शंकर पार्वती जेव्हा तिथे आले तेव्हा तो स्वर्णमहाल पाहून पार्वती अती हर्षीत झाली. म्हणाली माझं स्वप्नं साकार झालं. माझ्या कल्पनेपलिकडे सुंदर असा हा स्वर्णमहाल बनला आहे.पार्वती शंकराला म्हणाली, "हे त्रिपुरारी ह्याचा गृहप्रवेश करायला हवा. ह्या महालात मला एक यज्ञ करायचा आहे. सर्व देव देवतांसोबत मला लक्ष्मीला पण इथे बोलवायचं आहे." तिचे आनंदाश्रू पाहून भगवान विचारात पडले. जो जितका खुष होतो तेवढे त्याचे अश्रू वहातात. त्यांना पार्वतीचं मन मोडवलं नाही. ते तिच्या हो ला हो म्हणत गेले. तेहतिस कोटी देवांना निमंत्रण दिलं गेलं. विश्रवा पंडीत पुजेसाठी बोलावण्यात आले. लक्ष्मी विष्णू, ब्रह्मा इंद्र सगळे सगळे देव आले. समुद्राच्या मधे असलेला तो स्वर्णमहल बघून खूप हर्षभरीत झाले.

तेव्हा लक्ष्मीच्या हाताला धरून पार्वती तिला आपला सोन्याच्या विटांनी बनवलेला महाल दाखवू लागली. आणि म्हणाली, "बघ हा चमत्कार त्याच त्रिपुरारीचा ज्याला तू भिक्षू म्हणालीस, हा त्याच भिकार्‍याचा महाल आहे जो बघायला आज सारी दुनिया आलिये. झरोके खिडक्या दरवाजे इतकंच काय जमिनही सोन्याचीच आहे. माझ्या महालाच्या कोपर्‍याइतकीही तुझ्या महालाची आता लायकी नाहिये." शंकर म्हणाले, "पार्वती असा वृथा अभिमान करू नये". इतक्यात मंडप सजवून तयार करण्यात आला. शंकर पार्वतीने यज्ञ केला. विश्रवा ऋषी विधी विधान मंत्र पठण करीत होम आहूती पूजेच्या प्रत्येक क्रिया समजावून देत होते. पुर्णाहूती पडल्यावर सर्व देव देवतांनी फुलांचा वर्षाव केला, नभांगण शिवपार्वतीच्या जयजयकाराने दुमदुमू लागले. देव-देवता, योगी-ब्राह्मण, साधू-भिक्षू सगळ्यांची भोजने झाली. नंतर सगळ्यांना मानसन्मानाने दक्षीणा दिल्यावर सर्वांनी प्रस्थान केले.

शेवटी शिवशंकरांनी विश्रवा ऋषींना आपल्याजवळ बोलावले व म्हणाले, "आपल्या येण्याने आज आम्ही धन्य झालो. तुम्हाला जे हवं ते मागा आज आम्ही तुमच्यावर खूप प्रसन्न आहोत." त्यावर विश्रवा म्हणाले, "भगवान तुम्ही खरंच माझी झोळी भराल ? आत्ता तुम्ही जे म्हणालात ते वचन नक्की पुरे कराल ?" भगवान म्हणाले, "मनात कसलीही शंका आणू नका. माझे वचन पुर्ण होते असा त्रिलोकी डंका आहे. मी खरंच खूप प्रसन्न झालो आहे. आता तुम्ही मागा तुम्हाला काय हवे ते वरदान देईन." ह्यावर शीष झुकवून विश्रवा म्हणाले, "हे भगवन ! तुम्ही तुमचे वचन पूर्ण करा. मला हा सुवर्णसिन्धू हवा आहे. जिथे हे सुंदर भवन उभारले आहे. हाच माझ्या मनात भरला आहे." हे ऐकताक्षणी सर्व उपस्थित आश्चर्याने पाहू लागले. पार्वतीच्या मनावर जसा वज्रपात झाला. तिच्या स्वप्नांची एका क्षणात राखरांगोळी झाली. तिने विश्रवाला शाप दिला,"एक दिवस असा येईल तुझे नामोनिषाण मिटून जाईल कालौघात तुझी ही सुवर्ण नगरी राख राख होउन जाईल. तुझा दिवा विझून घनघोर रात्र होईल." आपल्याजवळ होतं नव्हतं ते सारं वैभव, दाग दागिनेही तिने विश्रवा ऋषींना दान करून टाकले. पार्वती निष्कांचन झाली.

ह्या दंतकथेचा वास्तवाशी कदाचित संदर्भ असू असेल.

हे विश्रवा ऋषी म्हणजे रावणाचे पिता. पुढे कालचक्रात रामयुगात राम वनवासात असताना रावणाने सीताहरण केले. सीतेला पळवून नेत असताना तिने रामाला मार्ग कळावा म्हणून मार्गात आपले एक एक करून सगळे अलंकार उतरवून टाकले. ती जेव्हा लंकेला पोहोचली तेव्हा तिचे स्त्रीधनही तिच्याकडे नव्हते. तीपण पार्वती सारखीच निश्कांचन झाली होती. त्यावरूनच लंकेची पार्वती हा शब्दप्रचार आला आहे. वीर हनुमानाने श्रीरामाला सीतेच्या शोधात मदत करत असताना लंकेला जाउन लंकेचे दहन केले. आणि पुढे झालेल्या युध्दात रावण हत्येसह रावणाचा निर्वंश झाला. लंकेच्या पार्वतीचा शाप खरा ठरला.

वीर हनुमानही भगवान शिवाचाच अवतार. कर्ता करविता तोच भोळा सांब.

डमरूवाले बाबा तेरी लीला है न्यारी, जय भोले जय भंडारी !
शिवशंकर महादेव त्रिलोचन कोई कहे त्रिपूरारी, जय भोले जय भंडारी !

9/20/2009

ये कौन चित्रकार है ?


परवा  लेकाचं कपाट आवरताना एका ड्रोवर मध्ये खूपश्या कागदांचा पसारा मिळाला. रद्दी आवरून टाकुया म्हणत सहजच पेपर चाळत गेले. आणि काय आश्चर्य इतका मोट्ठा खजिनाच हाती लागला. माझ्या साडेतीन वर्षांच्या लेकाची ही चित्रं इथे तुमच्यासोबत शेअर करतेय. ही सगळी चित्रे म्हणजे त्याचा कल्पना विलास आहे. कुठल्याही पुस्तकात वगैरे पाहून काढली नाहियेत. किंवा कुणी शिकवली पण नाहीये.  गोष्टी ऐकून त्याने मनाने काढली आहेत. तिही काही क्षणांत.

कैलास पर्वतावर काढलेले गणेशाचे फॅमीली  पिक्चर आहे म्हणे.

निट बारकाईने बघितल्यावर कळतंय…. डाव्या बाजूला त्रिशूळ उभा केलाय. मागे कैलासावरच्या हिमनगांच्या रांगा :)  मध्यभागी  बालगणेश आपल्या आईबाबांच्या मध्ये बसलाय. आणि कार्तिकेय खेळतोय बाजूला. बाप्पांनी उंदिर समोर पार्क केलाय आणि नंदी आणि कार्तिकेयाचं वाहन मोर उजवीकडे आहेत. सगळे पार्किंग लॉटमध्ये…


हे काय तर म्हणे गणपती बाप्पा आणि शंकरबाप्पा कैलासावर आहेत तिथल्या थंडीच्या वार्याने शंकरांचे केस असे उडताहेत : D

हा बजरंगबली 

हा म्हणे इझी  गणेशा  




विष्णू आणि शेषनाग 





गणपती बाप्पा माखनचोर झालाय ;)



गणपती सरस्वती सोबत.


बाप्पा पडले..मोदक सांडले चंद्र हसला..

हीच ती कथा गणपती उंदरावरून पडला चांदोबा हसला आणि चांदोबाला शाप मिळाला. मला कल्पनाशक्तीची कमाल वाटली इथे लेकाची. तुम्ही तो उंदराच्या बाजूला असलेला नाग पाहिलात का ?





हा गोपालकृष्ण मागे हाड्कुळा पेंद्या खेळतोय. :)



हे शिवाजी महाराज त्यांच्या घोडया सोबत आणि मागे मावळा

4/03/2009

स्वीस रोल




लागणारा वेळ:

२० मिनिटे

लागणारे जिन्नस:

मारी बिस्किटे २०० ग्रॅम
ड्रिंकिंग चॉकलेट १००ग्रॅम
पिठीसाखर ४०० ग्रॅम
डेसिकेटेड खोबरे १०० ग्रॅम
लोणी ३० ग्रॅम

क्रमवार पाककृती:

  1. मारी बिस्किटांचा मिक्सर मध्ये चुरा करुन घ्या व बारीक चाळणीने चाळुन घ्यावा.
  2. बिस्कीटाच्या चुर्‍यात ड्रिंकिंग चॉकलेट, अर्धी पिठीसाखर व लागेल तसे दुध घालून कणकेसारखे मळुन गोळा करुन ठेवा.
  3. पोळपाट व लाटण्याला तुपाचा हात लावुन गोळा पोळीसारखा लाटुन घ्यावा.
  4. लोणी, उरलेली पिठी साखर व डेसिकेटेड खोबरे एकत्र करुन तयार करुन त्या लाटलेल्या पोळीवर सर्वत्र एकसारखे लावावे.
  5. मग पोळीचा रोल करुन फ्रीज़ मधे गार करण्यास ठेवावे.
  6. १ तासाने बाहेर काढुन हव्या त्या मापाच्या जाडसर वड्या कापाव्यात. झटपट स्विस रोल तय्यार.

वाढणी/प्रमाण:

खाउ तसे/ आकारानुसार लहान मोठे बनवू तसे. :)

अधिक टिपा:

लहान मुलांसाठी बनवताना आणखी लहान आकाराचे बनवता येईल.
बच्चा पार्टी असेल किंवा अचानक कुणी येणार असेल तर झटपट करता येण्यासारख्या आहेत.

3/10/2009

लांबनाक्या :८)

 योगायोगाने मला ह्या लांबनाक्या भाज्या दिसल्या. मजेशीर दिसल्या म्हणून सहजच फोटो टाकतेय. 
थोडी गंमत.. ह्या वांग्याला नाक डोळे काढले आहेत.

  

हा एक ढब्बुशेठ टोमाटो लांबनाके 

ही मिर्ची लहान मुलांच्या गोष्टीच्या पुस्तकांत  चंद्र असाच असतो ना ?