11/06/2013

चेहरे

मायबोली दिवाळी अंकात एका कवितेसाठी काढलेले हे माझे पेंटिंग. माध्याम अक्रेलिक ऑन कॅनवास. 
(मोठे चित्र पहाण्यासाठी चित्रावर टिचकी मारा) 




10/30/2013

पारंपरिक आकाश कंदिल होममेड आणि हँडमेड :)


 नमस्कार मंडळी !

झाली का दिवाळीची तयारी ?
दिवाळी म्हणजे फ़राळ. . .  तो फ़राळाचा दरवळ, दिवाळी म्हणजे तोरणे रांगोळ्या फुलांच्या सजावटी . . . .  दिवाळी म्हणजे दिव्यांचा लखलखाट, माळा…. पणत्या आणि मुख्य म्हणजे आपला घरादाराची शान वाढवणारा आकाशकंदिल.

मी शक्यतो पारंपरिक पद्धतीचा रंगित कागदाचा बनवलेला आकाशकंदिल प्रेफर करते. आणि तो मला स्वत:ला बनवायला आवडतो. मागच्या वर्षी इथे शेअर करायला उशीर केला म्हणून काही फ्रेंड्स नाराज होते. म्हणून आज दिवाळीच्या आधीच तुमच्याशी हे फोटो शेअर करतेय.

कृती अगदी सोप्पी विनासायास आणि कुठेही सहज मिळणाऱ्या साहित्यात हा आकाश कंदिल बनवता येण्यासारखा आहे. ना कटकट तेही झटपट. आपला आकाशकंदिल चायना मेड पेक्षा होममेड आणि  हँडमेड असेल तर आनंद द्विगुणित नक्कीच होईल हो ना ?

चला तर बघुया कसा बनवलाय आकाश कंदिल.

(फ़ोटोवर टिचकी मारल्यास मोठे फोटो दिसतील )


साहित्य काय काय आहे ? रंगित कागद, कात्री, गम आणि स्टेपलर. झालंच तर न वापरात्या सीडीज आणि एक सोनेरी लेस बास इतकच.

फोटोत  दाखवल्या प्रमाणे कोणत्याही ब्राईट कलरचा एक मोठा थोडासा जाड पेपर.  मी ९ इंच बाय १६ इंच आकाराचा पेपर कापून त्याला  गोल स्टेपल करून सिलेंडर बनवला. हा मुख्य पेपर जर जाड असेल तर त्यावर हवी ती नक्षी कोरून कापून घ्या म्हणजे प्रकाश बाहेर पडल्यावर सुंदर दिसेल.

आपल्या आवडीप्रमाणे रंगितपेपर्स ६ बाय ६ चे चौकोन कापून घेतले. नागमोड्या कात्रीने पेपरच्या किनारींना नक्षी तयार केली. आणि त्रिकोणात दुमडून पिन लाऊन टाकली. मग हे असे बनवलेले त्रिकोण त्या गोलाकार सिलेंडर वर इंद्रधनुशी मिळतेजुळते जवळ जवळ ठेऊन चिकटवून घेतले. तुम्ही तुमच्या आवडती रंगसंगती घ्या.




नंतर सिलेंडर च्या वरच्या आणि खालच्या किनारीला लेस लावली आणी दुसरा एक रंगीत पेपर कापून खाली झिरमिळ्या चिकटवल्या. आकाशकंदिल वर लावण्या पुर्वी त्यात लाईट बल्ब लाऊन सिलेंड्रिकल शेप च्या वरच्या बाजूला झाकणासारखी सीडी लावल्यास सीडी च्या चकचकीत पणा मुळे जास्त प्रकाश परावर्तीत होईल.


झाला इंद्रधनुशी आकाश कंदिल तय्यार. आहे की नाही खरच सोप्पा ?

शुभ दिपावली !

ही दिवाळी तुम्हा सर्वांना आनंदाची, सुखसमृद्धीची उत्तम आरोग्याची आणि भरभराटीची जावो !

संपदा

6/13/2013

कथाकली

बरेच दिवसात कथाकली पेंटिंग करायचे मनात होते. ११ बाय १४ इंचाच्या कॅन्व्हास वर एक्रेलिक पेंट्स वापरून हे पेंटिंग केले आहे.

 
(मोठे चित्र पहाण्यासाठी चित्रावर टिचकी मारा.)

ह्या चित्रात नायक नायिके सोबत मागे खलनायक आहे. त्यांच्या विशिष्ठ वेषभूषेबद्दल आणि कथाकली बद्दल थोडेसे लिहितेय...

कथाकली ही दक्षिण भारतातील केरळ मधील पारंपरिक, प्राचिन अशी नृत्य शैली आहे. कथकली किंवा संस्कृत मध्ये कथाकली म्हणजे एखादी कथा नृत्य नाट्याच्या रुपातून प्रेक्षकां समोर सादर केली जाते. ह्यातील पात्रांच्या वेशभूषा आणि रंगभूषे मुळे विषेश आकर्षणिय असते. कलाकारांचा तो चित्ताकर्षक मेकप, त्यांनी परिधान केलेले भव्यदिव्य असे मुकुट, आणि अतिशय घेरदार असलेला त्यांचा पेहराव. सोबतीला तितक्याच ताकदीचे श्रवणिय असे संगित. महाभारत, रामायण ह्या सारख्या प्राचिन कथा ह्या कथाकलीच्या माध्यमातून दक्षिणेकडे मुख्यत्वे, त्रावणकोर, कोचिन, कोस्टल केरळा च्या भागातुन सादर केल्या जातात.

त्यातिल मुख्य पात्रांची वेषभुषा आणि मेकप म्हणजे पाछा वेषम सात्विक (हिरो/नायक), कथी वेषम(व्हिलन/खलनायक) आणि मिनुक्कु वेषम(हिरॉइन/ नायिका) आणि ह्या शिवाय कथाविस्तारा प्रमाणे इतरही पात्रांच्या इतर वेशभुषा असतात.

पैकी हिरो, नायक किंवा मुख्य पुरुष पात्राची वेषभुशा म्हणजे हिरव्या रंगाची ज्यात राजसी आणि सात्विकता दाखवलेली असते. आणि त्याला पाछा वेषम असे म्हणतात. कथाकली मध्ये राम, कृष्ण वगैरे कथा नायक नेहमी असे पाछा वेषात असतात.

दुसरा कथी वेषम म्हणजे उन्मत्त, उद्धट, दुष्ट, दुराभिमानी असा खलनायक. काळ्या रंगावर तलवारीच्या पात्यासारख्या लाल-काळ्या रंगाच्या मिशा आणि नाकावर विदुषकासारखा एक पांढरा नॉब रंगवतात. कथाकली मध्ये रावण असा दर्शवतात.

तिसरी म्हणजे मिनुक्कु ज्याचा शब्दशः अर्थ होतो तेजोमय. कथेतिल नायिकेचे साध्वी सात्विकता, तेजोमय, मृदु रूप दर्शवण्यासाठी ब्राईट रेडीयंट म्हणजेच मिनुक्कु वेषम हयात मुख्यत्वे पिवळ्या रंगाच्या शेडस वापरून रंगभुषा करतात.

ह्याशिवाय थडी, करी वगैरे वेगवेगळ्या प्रकारच्या वेशभुषा असतात. तसेच कथा विस्तारानुसार जशी पात्र वाढत जातात तसे त्यांचे रंगरूप दाखवले जाते. जसे की जटायू, हंस, कर्कोटक वगैरे पात्रांची वेषभुषा ही वरिल पाच पैकी कोणत्याही विषेश ठराविक एका वेशभुषेनुसार नसते.

5/19/2013

रवा इडली

सौथैंडियन इडली ही आता आपल्या रोजच्या नाश्त्याचा भाग जरी नसली तरी संडे स्पेशल नक्कीच आहे. ज्या लोकांना मधुमेहामुळे किंवा इतर कुठल्या पथ्यामुळे तांदूळ कमी खायचे असतात अश्या लोकांना ही रवा इडली एक मस्त ऑप्शन आहे. गव्हाचा रवा वापरल्याने ह्या इडल्या अतिशय हेल्दी तसेच सोबत भरपूर भाज्या घातलेले सांबार बनवले की मस्त आणि पोटभरीचा नाश्ता होतो.  
 
 

लागणारे जिन्नस: 
 
रवा २ वाट्या (उपम्यासाठी वापरतो तो गव्हाचा मध्यम जाडसर रवा)
उडीद डाळ १ वाटी
तेल १ छोटा चमचा
मिठ चविप्रमाणे
खायचा सोडा ऐच्छीक ( गरज वाटलीच तर)
 
क्रमवार पाककृती: 
 
  • २ वाट्या रवा (उपम्यासाठी वापरतो तो जाडसर रवा) बंद डब्यात ठेऊन कुकरमध्ये कोरडाच वाफवून घ्यायचा. ( मी वरणभाताच कुकर लावतानाच रव्याचा डबा पण ठेवते)
  • १ वाटी उडद्डाळ साधारण चार तास भिजवून वाटून घ्यायची. पाणी फार वापरायचे नाही.
  • रवा थोडा थंड झाल्यावर पाण्याने धूउन घेउन वाटलेल्या डाळीत मिक्स करायचा. असा रवा वाफवून नंतर धूउन घेतल्याने हलका होतो.
  • चविपुरते मिठ घालून बॅटर रात्रभर (किंवा सहा सात तास) ठेउन द्यायचे. मस्त पिठ फुगते.
  • इडल्या करण्याआधी एक चमचा तेल आणि एक चमचा पाणी मिक्स करून ते त्या बॅटर मध्ये घालून इडल्या बनवायच्या. मस्त स्पॉन्जी जाळिदार इडल्या होतात.
वाढणी/प्रमाण: 
 
मध्यम आकाराच्या वाटीच्या प्रमाणात २२-२४ इडल्या होतात.
 
अधिक टिपा: 
 
इडलीचे पिठ चांगले फुगून येण्यासाठी ...
उडिद डाळ वाटताना जास्त पाणी वापरायचे नाही.पण डाळ भिजवलेले पाणी फेकुन न देता रवा मिक्स करून बॅटर तयार करताना वापरायचे. म्हणजे पिठ छान येते ( फुगते/ आंबते).

पिठ पळीवाढे असावे. म्हणजे सहा सात तासानी चांगले फुगते.

वाटीभर भात( उरलाच असेल आणि संपवायचा असेल तर) वाटून ह्या पिठात मिक्स केला तरी चालतो.

काहीवेळा थंडीमुळे पिठ आले नाही किंवा इडल्या लवकर बनवायच्या असतिल तर चिमुट्भर सोडा चमचाभर पाणी आणि चमचाभर तेल मिक्स करून पिठात घालायचे.

4/15/2013

एका तळ्यात होती बदके पिले सुरेख……

माझ्या घराजवळच्या लायब्ररी मागे एक सुंदर तळं आहे. सूर्यास्ता पुर्वी संध्याकाळी तिथे रेंगाळत तळ्यातल्या बदकांचे खेळ बघत टाईमपास करायचा मला हल्ली छंदच  लागलाय. ह्या एकाच तळ्यातल्या बदकांचे आणि त्यांच्या सुरेख पिल्लांचे वेगवेगळ्या वेळी घेतलेले हे फोटोज… फोटोवर टिचकी मारली की मोठे फोटो दिसतील :)


 हेच ते सुंदर तळं… खरच आहे की नाही छान ?





 हम दो … और हमारे….  बाराह !!!



पिल्लांची आई भोवती लगबग

आई मी काय खाऊ गं  ? ए आई ही बघ आमचे फोटो काढतेय… आई चल आपण तिकडे जाऊ या…
ए मला पण आई जवळ जायचय… अरे बाबा कुठेय ?




पुन्हा एकदा सहपरिवार

तो सर्वात मागे दिसतोय ना तो वेडा बदक्या का कुणास ठाउक ह्या परिवाराला त्रास देत होता.
ह्या पिल्लांच्या बाबा बदकाला फड्फड उडून क्वॅक क्वॅक करून टोचायचा.. की लगेच बदकी आणि एखादं धिटूकलं बाळंही उलट प्रतिकारात्मक प्रहार केल्यासारखे त्याच्या अंगावर धावायचे. मग पुन्हा आपले लगबगीने सहपरीवार दुसर्‍या किनार्‍याकडे.. इकडे तिकडे...कारंजाभोवती.... फिरत होते... टूबूडुबू.. क्वॅक क्वॅक... तासभर तेच नाटक चालले होते.




संधिप्रकाशात अजून जे सोने  ?



अंधारून आलं … चला बाळांनो पटकन घरी परतायला हवं !



 

4/08/2013

हाय हाय मिर्ची... उफ्फ उफ्फ मिर्ची ! अर्थात चिली पॉपर्स

भरल्या मिरच्या आपण नेहमीच करतो. कधी नुसतेच भाजलेले बेसन आणि मसाला मिक्स करून, कधी खोबरे तर कधी बटाट्याचे सारण भरून. ह्या चिली पॉपर्स तश्याच काही सारण भरून बनवल्या आहेत.
अलीकडेच नीरजाने ह्याची रेसिपी पोस्ट केली होती त्यात मी माझे थोडे व्हेरिअशन केलेय. 

साहित्य बघुया काय काय हवे आहे ?

साहित्य : 
लाल पिवळ्या यालापिनो किंवा कोणत्याही कमी तिखट मिर्च्या १०-१२
१ छोटा टोमेटो, एक छोटा कांदा अगदी बारिक चिरून
अर्धी वाटी तूरीचे दाणे ओले हिरवे
एक छोटा बटाटा उकडून मॅश केलेला
अर्धी वाटी पोहे, १ टेबल्स्पून धणे, आणि १ टेबल्स्पून फ्लेक्स सिड्स
आलं लसून पेस्ट १ चमचा कोथिंबिर
चवी प्रमाणे मिठ साखर आणि आमचूर पावडर लाल मिर्ची पावडर
आपल्या आवडीप्रमाणे चीझ किंवा चिझ स्लाईसेस.

क्रमवार कृती :
प्रथम यालापिनो किंवा कोणत्याही जाडसर मिरच्या स्वच्छ धुवून पुसून घाव्या.
मिरच्यांना मध्ये चीर देऊन आतल्या बिया काढून घ्याव्या.
एका बोल मध्ये पाणी घेऊन त्यात एक टीस्पून मिठ टाकून त्यात चीर दिलेल्या मिरच्या थोडा वेळ बुडवून ठेवाव्यात.
मग सारण बनवण्या साठी एका छोट्या वोक मध्ये चमचा भर ऑलिव ऑईल टाकून त्यावर धणे फ्लेक्स सिड्स आणि पोहे भाजून घ्यावे. मग कांदा जरासा गुलाबी रंगावर परतून त्यात चमचाभर आलं लसून पेस्ट घालावी आणि बारीक चिरलेला टोमाटो घालावा मग तुरीचे दाणे टाकून सगळे परतून घावे. एक चमचा लाल तिखट घालावे. मी रेशिमपत्ती वापरलेय. मस्त लाल रंग येतो आणी झणझणीत पणा सुद्धा. मग चवी प्रमाणे मिठ, चिमुठभर साखर आणि आमचूर पावडर मिसळावी. आमचूर पावडर ऐवजी लिंबु रस सुद्धा चालेल. हे मिश्रण थंड करून जरासे भरड वाटून त्यात  मॅश केलेला बटाटा मिक्स करावा. हे झाले सारण तयार.

मग मिरच्या पाण्यातून काढून निथळून घ्याव्यात. मग प्रत्येक मिरचीमध्ये आधी चीझ च्या पातळ लांब कापलेल्या स्लाईस लावून त्यावर हे सारण भरावे.







ओव्हन ३५० ला प्रिहिट करून घ्यावा. अल्युमिनिअम फ़ोइल वर ऑलिव ऑईल स्प्रे करून त्यावर मिरच्या ठेउन २० मिनिटे भाजाव्यात. ओव्हन नसेल तर तव्यावर बाजू शकता.



मिरच्या आणि ओव्हन च्या प्रकारावर भाजण्याचा वेळ अवलंबून आहे. हवा तस्सा खमंगपणा आला की दही आणि पुदिन्याच्या च्या चटणी सोबत किंवा नसेलच जर चटणी तर सॉस सोबत खाऊ शकता. मस्त स्टार्टर होते हे.


मी यालापिनो वापरल्या होत्या म्हणून भाजायला जरा जास्त वेळ लागला. एकुण जे काय बनले ते एकदम तोंपासू होते..
चिंचेच्या आंबट गोड चटणी सोबत चट्टामट्टा करुन टाकलेहाहा





3/18/2013

खार बाई खार... नाजूक नार !



खारुताई....मला आठवतंय मी बघितलेली पहिली खार म्हणजे माझी लहानपणीची मिन्टी मनी बँक. म्हणजे काय तर प्लॅस्टीकची मिन्टी पैसे साठवायची. आपल्या पोस्ट खात्याने दिलेली तिही गाजरी गुलाबी रंगाची. त्यावरून खरी खार कशी असते कशी दिसते ह्याची कल्पना येणार तरी कशी ? आता त्या चिमुकल्या वयात खार कुठे खर्ररी खुर्ररी बघितलेली ? आजीला विचारलं तर आजी म्हणायची मी दाखवेन तुला एकदा कधीतरी. माळावर दिसतात कधी कधी खारुट्या आंब्याचा मोहोर खाताना. तो पर्यंत अश्याच एका छोट्या खारुटीची गोष्ट ऐक.. खारीचा वाटा... मग आजी मला रामाची गोष्ट सांगायची. रामाने वानरांच्या सहाय्याने कसा समुद्रसेतू बांधला.…  प्रत्येक दगडावर श्रीराम' 'श्रीराम' असे लिहिल्याने सगळे दगड कसे पाण्यावर तरंगले... आणि मग ते दगड एकमेकांना घट्ट चिकटवण्याच्या कामात एका धिटूकल्या पिटूकल्या खारीने आपल्या चिमुकल्या मदतीने चिखल भरायचे काम केले. तोच खारीचा महत्वाचा वाटा. आजीच्या ह्या अश्या गोड गोष्टी ऐकत रात्री कधी झोप लागायची ते समजायचंच नाही. पण  मग तरीही खारींबद्दलचे कुतुहल काही संपत नव्ह्ते.

पुढे केव्हातरी मला नदीकाठच्या विष्णूमंदीरी खारूताई दिसलीही. पण चपळच फार निट निरखता पारखता यायाचेच नाही. नंतरही ती खारूताई मला भेटतच राहिली कधी बालगितांमधून तर कधी कुठल्या सुंदर  चित्रांमधून. आताशा तर मुलांच्या व्हिडिओज मध्ये काय सुंदर अ‍ॅनिमेशन असते. एकदम गोंडस खारुताई.  आपल्याकडे भारतात आजवर पाहिलेल्या सगळ्या खारी अगदी पिटूकल्या. उंदराएव्हढ्या छोट्याश्या.  बंगळूरला असताना बरेचदा सकाळी मी चहा घेत घेत बालकनीतून ह्या चिमुरड्या खारींचे खेळ बघत बसायची. आंब्याला मोहोर आला की ह्यांची पळापळ सुरू. कधीकधी उगाच कुठ्ल्या कार च्या खालून सुर्रकन पळायच्या आणि मग तो गाड्यांचा सेक्यूरिटी आलार्म सुईईईईईईईंग्ग्ग्ग्ग्ग्ग्ग्ग्ग्ग्ग्ग्ग्ग् कन वाजायला लागायचा आणि मग घाबरलेल्या त्या सगळ्या खारींचा सामुदाईक टिवटीवाट चालायचा. एकेकदा तर अर्धा अर्धा तास आवाज करून जीव नकोसा करून सोडायच्या. थंडी वाढायच्या आधी लगबग घरटे निट करायची घाई. कुठून कुठून मऊशार बुरकुले, पिसं, पालापाचोळा झाडाच्या डोलीत गोळा करून घर उबदार करायाला लुटुपुटु घाई. तर कधी हिवाळ्याची तरतूद  खाऊ लपवून ठेवायची तयारी. सतत कसलीतरी लगबग नाहीतर भिती. एकदाही फ़ोटोत सापडायच्या नाहीत.

ही तस्शीच एक भित्री भागुबाई. फोटो काढे पर्यंत पळाली सुद्धा.


इथे टेक्सास ला आल्यापासून मला  खारी आणि ससेही खूप दिसतात. रस्त्यावरून जाता येता आणि पार्कमध्ये बेंचवर बसून राहिल्यावरही  मला त्यांचे खेळ निरखत बसायला खूप आवडतं.  खारींना वातावरणात घडणारे चढउतार फार चटकन आणि आधीच समजतात आणि त्यादृष्टीने तसे वातावरण बदलायच्या आधीच ह्या चिमुरड्यांची  तयारी सुरु होते. टेक्सास मध्ये चांगल्या मोठ्या खारी आहेत. त्यांना फॉक्स स्क़्विरल्स म्हणतात. त्यांच्या अंगावर कोल्ह्यांसारखी पिवळसर झाक असते. आणि शेपटीही खूप मोठे गोंडेदार. "पडेल थंडी तेव्हा माझ्या शेपटीची मल्लाच बंडी" हे अगदी खरे वाटावी अश्शी सुंदर झुपकेदार.  इथे खूप ओक वृक्ष आहेत . त्या ओक वृक्षांची फळं  म्हणजेच  एकॉर्न्स खारींना खूप आवडतात.

ही एक खारुटी तिचा एकॉर्न खात बसलिये.

गंमत म्हणजे ह्या लबाड खारी हुशारही तितक्याच आहेत. हिवाळा आला की ह्यांचे विंटर हायबरनेशन जोरात सुरु असते. मिळतील तसे एकॉर्न्स दोन हातात धरून फ़ोडून खातात. कधी पूर्ण तर कधी नुसतेच कुरतडून कुठेतरी नेउन मातीमध्ये पाचोळ्याच्या खाली पुरून लपवून ठेवतात. हा त्यांचा खाऊ खायला पक्के वाटेकरी म्हणजे इथले पक्षी करडी कबुतरे आणि निळे जे (ब्लू जे). जसे जसे वातावरण थंड होत जाते तसे ह्या दिसेनाश्या होतात. पण जात मात्र कुठेच नाहीत. लपून राहातात आपल्या बागेतल्या बिळांमध्ये नाहीतर झाडावरच्या घरट्यांत. जरा हवा उबदार झाली थोडंस्सं उन आलं की आल्या ह्या माती उकरायला आणि लपवलेले एकॉर्न्स खायला. 


काय अद्भूत आहे देव आणि त्याची ही सृष्टीही. ह्या खारीनी पुरलेले पेरलेले आणि बरेचदा पुन्हा उकरून वर न काढलेले असे बरेच एकॉर्न्स पुन्हा खोल मातीत रुजतात, अंकुरतात आणि त्यांचे नव्याने मोठे उंच ओक वृक्ष बनतात.  अशा प्रकारे हे चिमुकले जीव वातावरणाचा समतोल राखण्यासाठी खऱ्या अर्थाने आपला खारीचा वाटा उचलतात.

राम आणि लंकेचा रामसेतू खरा की खोटा ते देव जाणे. पण मी मात्र माझ्या दोन छोट्या चिपमंक्स ना ह्या खर्याखुर्या खारीच्या वाट्याची गोष्ट सांगते आणि खारुताई  दिसली की  मुलांसोबत गाणंही  गाते……

खार बाई खार
नाजूक नार
शेपूट तिचे
किती झुपकेदार….

खार बाई खार
चपळ फार
क्षणात होते
नजरे पार ….


3/05/2013

अचारी मुर्ग / अचारी चिकन

Same recipe in English is here : Achari Chicken ( Moorg Achari)

मज्जा वाटतेय ना नाव वाचून ? पण अचारी म्हणजे कुक नाही.. अगदी मराठीत सांगायचे तर चिकन लोणचे मसाला. मूळचा उत्तर भारतीय प्रकार आहे हा.
नॉर्थकडे कश्याचीही लोणची बनवतात आणि तिही मोहरीच्या तेलात.
पण आपल्याला जर राई के तेल की खुशबु पसंद येत नसेल तर तुम्ही तुमच्या आवडीचे कोणतेही तेल जSSSSरा सढळ हाताने वापरा. स्मित
अचारी मुर्ग / अचारी चिकन

लागणारा वेळ: 
४० मिनिटे

लागणारे जिन्नस:
पाउण किलो चिकन मध्यम आकाराचे तुकडे करून
३ टेबल्स्पून तेल मोहरीचे किंवा कोणतेही जे आवडेल ते खाद्य तेल. (आपल्याला शक्य होईल व आवडेल तसे आणि तितके जास्त तेल)
जिरे, पिवळी मोहरी, कलोन्जी, बडीशेप आणि मेथ्या प्रत्येकी १ टी स्पून.
(हल्ली हे सर्व साहित्य मिसळलेले पंचफोरण ह्या नावाने मिळते.
ते पंचफोरण असेल तर एक मोठा चमचा भरून)
३-४ हिरव्या मिरच्या
२ टेबल्स्पून आलं लसूण पेस्ट
१ टि स्पून हळद, १ टेबल्स्पून लाल तिखट, चवीप्रमाणे मिठ
१/२ कप ताजे घट्ट दही
लिंबाचा रस एक टेबल्स्पून
२ मध्यम आकाराचे कांदे बारिक चिरून
२ मध्यम आकाराचे टोमॅटो
मुठभर कोथिंबिर
क्रमवार पाककृती: 
चिकन चे तुकडे स्वच्छ धुउन त्याला चवीप्रमाणे मिठ, हळद, लाल तिखट आणि आलं लसूण पेस्ट लाउन घ्यावी. मग एक चमचा तेल आणि अर्धा कप घट्ट दही टाकून सगळ्या चिकनच्या तुकड्याना व्यवस्थीत लाउन चिकन झाकून ठेवावे.
मग एका जाड बुडाच्या पॅन मध्ये थोडेसे तेल टाकून त्यावर बारीक कापलेला कांदा गुलाबीसर होई पर्यंत परतुन घावा. मग आच बंद करून कांदा थोडा गार करायला वेगळ्या डिश मध्ये काढावा.
कांदा आणि टोमॅटो मिक्सर मध्ये बारिक वाटून दोन्हीची एकत्र प्युरी करुन घ्यावी.
मग पॅन मध्ये कांदा टोमॅटो ची ही गुलाबीसर केशरी प्युरी टाकुन मध्यम आचेवर परतुन घावी. मिश्रण शिजत आले की रंग बदलू लागतो. आता त्यावर मॅरीनेट केलेले चिकन चे तुकडे टाकून परतून घावे. चिकन ला दही लावल्याने परतत असताना थोडे तेल सुटू लागेल. मग एक कपभर किंवा आपल्याला हवे तसे थोडे अधिक पाणी घालावे. चिकन शिजत आल्यावर दुसरीकडे फोडनीच्या पळीत दोन चमचे तेल टाकून त्यात फोडाणीचे सामान.. पंचफोरण जरासा हिंग आणि उभ्या चिर दिलेल्या अक्ख्या हिरव्या मिरच्या घालून चुरचुरीत फोडणी करावी.
चिकनवर ही फोडणी घालून जरा स्वाद मुरण्यासाठी एक वाफ काढावी. आच बंद करावी
जेव्हढे आंबट आवडत असेल त्याप्रमाणे लिंबाचा रस घालावा. गरमागरम रोटी/ फुलक्यांसोबत खायला आचारी मूर्ग तयार !!
वाढणी/प्रमाण: 
चार खवय्यांसाठी
अधिक टिपा: 
हे चिकन सर्व्ह करायच्या बराच आधी काही तास बनवुन ठेवले तर जास्त चविष्ठ लागते. मोहरी मेथ्या कलोंजी चा स्वाद चांगला मुरतो.
दही घातल्याने ग्रेवीला दाटपणा येतो. पण थोडी तेलकट होतेच.

2/26/2013

मालवणी कोळंबी मसाला


मालवणी कोळंबी मसाला


 लागणारा वेळ: 
३० मिनिटे
लागणारे जिन्नस:
कोलंबी /कोळंबी - २ कप किंवा साधारण २०-२५ नग डोकी आणि काळा दोर काढून स्वच्छ केलेली.
कांदे २-३ मध्यम आकाराचे बारीक चिरून
टोमॅटो २ मध्यम आकाराचे बारिक चिरून
बटाटा १ मध्यम आकाराचा फोडि करून
ओले खोबरे अर्धी वाटी (खउन) किंवा सुके खोबरे पावडर
आले लसूण पेस्ट १ टेबल्स्पून
कोकम/ आमसोलं २/३
लाल तिखट १ टेबल स्पून (आपल्या आवडीप्रमाणे कमी-जास्त)
हळद १/२ टीस्पून
गरम मसाला १ टेबल स्पून
मालवणी मसाला १ टेबल स्पून
मीठ चवीप्रमाणे
तेल

क्रमवार पाककृती: 
  • कोळंबी स्वच्छ धुवुन त्याला हळद, आलं लसूण पेस्ट, लाल तिखट आणि चविप्रमाणे मिठ लावुन बाजूला ठेउन द्यावी.
  • एका पॅन मध्ये दोन चमचे तेल टाकून त्यावर बारिक चिरलेला कांदा घालावा.
  • कांदा गुलाबीसर परतत आला की त्यावर किंचित हळद टाकून मग खोवलेले खोबरे आणि बारिक चिरलेला टोमेटो टाकून परतावे. बटाट्याच्या फोडी घालाव्यात. एक वाफ काढावी.
  • मिश्रण थोडे परतल्यावर मग गरम मसाला आणि मालवणी मसाला घालून मंद आचे वर चांगले तेल सुटे पर्यंत परतावे.
  • त्यावर मिठ मसाला लावलेली कोळंबी घालून एक वाफ काढावी. थोडाफार रस्सा हवा असल्यास कपभर पाणी घालून कोळंबी शिजवुन घ्यावी. फार ढवळू नये कोळंबी मोडण्याची शक्यता असते. पण मसाला खाली लागता कामा नये (जळता) नंतर आवडीप्रमाणे आमसुले टाकावित. बारिक चिरलेली कोथिंबीर घालावी. मालवणी कोलंबी मसाला तय्यार.

 मालवणी कोळंबी मसाला
वाढणी/प्रमाण: 
४ जणांसाठी
अधिक टिपा: 
कोळंबी पटकन शिजते. कोळंबी गोलाकार झाली शिजली समजावे. जास्त शिजवल्यावर वातड होऊ शकते.
बटाटा टाकल्याने ग्रेव्ही मस्त मिळून येते.
कोळंबी घेताना पांढऱ्या रंगाची घ्यावी. लालसर गुलाबी कोळंबी बहुतांशी वातूळ असते.

2/23/2013

पनीर फ्रॅन्की / काठी रोल्स

Same recipe is here Paneer Franky

पनीर फ्रॅन्की / काठी रोल्स

भाजी बनवण्यासाठी साहित्य
मध्यम आकाराचा कांदा आणि एक टोमॅटो
लाल पिवळी हिरवी ढोबळी मिरची
गाजर, बिन्स मध्यम आकारात चिरून
फ्रोझन हिरवे मटार, मक्याचे दाणे प्रत्येकी साधारण वाटीभर
२०० ग्रॅम पनीर क्युब्ज्स कापून
भाज्या परतण्यासाठी तेल
आलं लसूण पेस्ट
मुठभर कोथिंबिर बारिक चिरून
हळद, हिंग, लाल तिखट, धणे जिरे पूड, मीरपूड, आमचूर पावडर, साखर
मोझेरेला चिझ बारिक किसलेले
बटर (ऐच्छीक)
रोल्स करिता
टॉर्टीयाज किंवा पोळ्या तयार वापरु शकता.
(माझ्या लेकाला आवडतात म्हणून मी टॉर्टीयाज घरी बनवते )
टॉर्टीयाज बनवण्यासाठी
२ कप ऑल पर्पज फ्लार (कणीक घेउ शकता)
१ १/२ टी स्पून बेकींग पावडर
१ टी स्पून मीठ
२टी स्पून तेल (व्हेजीटेबल ऑईल/ ऑलिव्ह ऑईल किंवा कुठलेही खाद्य तेल)
३/४ कप कोमट दुध
क्रमवार पाककृती: 
भाजी बनवण्या साठी
फ्राईंग पॅन मधे दोन टेबल्स्पून तेल टाकून तेल तापल्यावर त्यात बारिक चिरलेला कांदा, चिमुट्भर हळद हिंग घालून परतावे.
मग त्यावर रंगीत ढोबळ्यांचे तुकडे टाकावेत. (असे केल्याने कांद्या सोबत ढोबळी मिर्ची चे तुकडे चांगले परतून भाजले जातात. चव छान येते. नाहीतर नुसत्याच शिजल्या जातात. )
कांदा गुलाबीसर झाल्यावर गाजर आणि फरसबी चे तुकडे टाकून त्यावर बारिक चिरलेला टोमॅटो, एक चमचा आलं लसूण पेस्ट टाकावी.
नंतर आवडी प्रमाणे कमी अधीक लाल तिखट, अंदाजाने जणे जिरे मिरी पावडर आणी चविप्रमाणे मीठ घालून मग परतून पॅनवर झाकन ठेउन भाजीला एक वाफ काढावी.
पनीर चे क्युब्ज टाकावेत. एक टि स्पून आमचूर पावडर आणि थोडीशी साखर घालून मिसळून पॅन ची आच बंद करावी. वरून मुठभर चिरलेली कोथिंबीर घालावी.
ही भाजी पटकन होते जास्त शिजवण्याची किंवा परतण्याची गरज नसते. थोडिशी क्रंची छान वाटते.

आता भाजी टॉर्टीया किंवा पोळी/ चपाती मध्ये भरून रोल्स बनवायचे.

टॉर्टीयाज बनवण्यासाठी

एका मोठ्या बोल मध्ये ऑल पर्पज फ्लार / कणीक घेउन त्यात मिठ बेकिंग पावडर, तेल टाकून चांगले मिक्स करा. मग त्यात हळूहळू लागेल तसे दुध टाकुन गोळा मळून घ्या. गोळा खूप कडक वाटत असेल तर आणखी थोडे दुध टाकुन पिठ चांगले मळून घ्या. मळलेले पिठ मउ असायला हवे. दहा मिनिटे झाकून ठेवा आणि मग हव्या त्या आकाराच्या गोल पोळ्या लाटून तव्यावर दोन्ही बाजूने भाजून घ्या. त्यावर छान गोल्डन ब्राउन ठिपके आले की मस्त भाजल्या जातात. टॉर्टीयाज लाटताना शक्यतो पातळसर लाटाव्यात. कारण त्यात घातलेल्या बेकींग पावडर मुळे त्या दुप्पट फुगुन आणखी सॉफ्ट बनतात. ह्या टॉर्टीयाज ला तेल लावायला लागत नाही.


आता रोल्स करण्यासाठी टॉर्टीया ला बटर लाउन तव्यावर ठेवले त्यावर मध्यभागी भाजी घालून वर चिझ टाकले रोल करुन हलकेच गरम केले. रोल उघडू नये म्हणून टूथपिक टोचून देउ शकता. किंवा अ‍ॅल्युमिनियम फॉईल मध्ये रॅप करून देउ शकता. सॅलड/ सेलेरी आणि आवडत्या लाल हिरव्या चटणी सोबत किंवा टोमॅटो सॉस सोबत सर्व्ह करायला तयार स्मित
वाढणी/प्रमाण: 
चार जणांसाठी पुरावेत. वरील प्रमाणात भाजी वापरून आठ रोल्स होतात.
अधिक टिपा: 
  • भाजी ला किंवा पनीर ला झणझणीत पणा हवा असेल तर एक टेबल्स्पून गरम मसाला किंवा ऑल पर्पज किचन किंग मसाला घालावा.
  • नॉनव्हेज आवडत असेल तर पनीर ऐवजी कोलंबी किंवा चिकन चे तुकडे वापरुन बनवता येईल.
  • मुंबईतली ही फ्रॅन्की कोलकात्यात ह्याच प्रकारे व्हेजी किंवा पनीर कबाब टाकून काठी रोल्स बनवतात.

2/13/2013

ट्रेजर बॉक्स

श्रेयुडीला त्याची खेळणी आवरताना मी म्हटलं.."काय हा कचरा जमवुन ठेवतोस.. उगाचच ?? "

तर तो म्हणे.."थांब टाकून देऊ नकोस! आई ....इंपॉर्टंट आहे गं ते. दॅट्स ऑल माय ट्रेजर ! "

मग सहजच नकळत मला माझा ट्रेजर बॉक्स आठवला..

वरच्या माडीत मी सुद्धा असंच काय काय गोळा करायची ना ? कसल्याश्या झाडाच्या शेंगा..वाघाच्या नख्या म्हणून... बुरकुल बुरकुलं करुन ठेवलेला सावरीचा मउशार चंदेरी कापूस... रंगीबेरंगी काचा.... वर्तमान पत्रातील आवडत्या चित्रांची कात्रणं ... तुटके असले तरी कधी काळी आवडते पेन्स.... गोट्या..... रंगिबेरंगी आणि विविध आकारांचे दगड... उन्हाळ्याच्या सुट्टीत केदारेश्वरी नदीच्या वाळवंटात जाउन तासंतास गोळा केलेले... तेच तेच एकाच प्रकारचे भारंभर शंख शिंपले... एका प्लॅस्टिकच्या पिशवीत जमवलेले पोस्टाचे स्टँप्स... आणि जिवापाड जपलेल्या.. खूप खूप जमा केलेल्या स्टिकर्स् चं कलेक्शन केलेल्या दोन वह्या....तेव्हाच्या वयात सो कॉल्ड सुविचार वगैरे लिहिलेली एल आय चा सोनेरी लोगो असलेली एक डायरी.... त्या डायरीतली दोन मोरपिसं आणि खूप सांभाळून ठेवल्यावर जाळी बनेल म्हणून जपलेले एक पिंपळपान....... आठवणींचे पिंपळपान... हृदयाच्या आकाराचं नाजुकसं... नक्षिदार...

कधीकधी मन अगदी पीसा सारखं खूप खूप हलकं होतं  आणी आयुष्याच्या हिंदोळ्यावर अलगद तरंगायला लागतं... मनाच्या आडवळणावर आठवणींचा ट्रॅफिक जॅम होतो आणि मग स्मृतींना धुमारे फुटायला लागतात आणि मन पुन्हा पुन्हा नॉस्टॅल्जिक होउन त्या ब्लॅक अ‍ॅन्ड व्हाईट फ्लॅशबॅक मध्येच अडकुन रहातं...

मला आणि माझ्या मनालाही बाहेर यायचंच नसतं मग ह्या फ्लॅशबॅक मधून... म्हणूनच मग मीही पुन्हा ट्रेजर जमा करते.. सगळ्या आठवणींना एका संदूकीत गोळा करून आणि बंद करून ठेउन देते मग मनाच्याच एका कोनाड्यात !

2/04/2013

क्रोशाचा ऑरेंज स्कार्फ़






ऑरेंज कलर माझ्या लेकाचा अत्यंत आवडता. मी नव्या आणलेल्या यार्न मध्ये तो रंग बघून लेकाची घाई सुरू झाली. आई माझ्या टिचर चा उद्या बड्डे आहे. आपण काहीतरी गिफ़्ट देउया. ऑरेंज कलरचे. अनायसे हया स्कार्फ चे डिजाईन आणि फ़ोटो टाकले होते जयूताई ने. ते फारच आवडले होते. पण मला स्वता:ला स्कार्फस  ची फारशी आवड नसल्याने राहिले होते. आता लेकाचे निमित्य होते म्हणून  मग काय फ़टाफ़ट दोन तीन तासात बनवला हा सुंदर फ़ुलांचा ऑरेंज स्कार्फ़.

ही नाजूक फ़ुलं निट बघण्यासाठी फ़ोटोंवर टिचकी मारल्यास मोठे फोटो दिसतिल.

ह्या स्कार्फ चा मुळ पॅटर्न इथे आहे. 


फारच सोप्पा प्रकार आहे आणि तुम्ही जर भरभर क्रोशे विणत असाल तर मग काय अगदी तासाभरात काम होऊन जातं. हा रंगच इतका ब्राईट की तो कुठल्याही कोम्बिनेशन वर छानच दिसतो. मी अजून जरा गुलाबी बरोबर काळ्या पार्श्वभूमीवर थोडी फ़ोटूगिरी करून घेतली.



आणि मग सुंदरसं पॅकिंग करून लेकासोबत गिफ़्ट पाठवुन दिलं. लेक आणि त्याची टिचर दोघेही खुश. इथली  थंडी आणि स्नो… जसे मोका आणि माहोल एकदम साजेसे …  ह्या गिफ़्ट ला एकदम फीट्ट होते.  लगेच उलट टपाली लेकाद्वारे टिचर बाईंनी पाठवलेलं एक कौतुकभरलं छानसं थांक्स चं कार्ड आलं  माझ्या साठी ! :)

1/28/2013

हॅल्लो किटी आणि अ‍ॅंग्री बर्ड


दिवसेंदिवस...माझं क्रोशे फॅड कमी होण्याऐवजी वाढतच चाल्लय.... आयॅम लव्हींग इट
ह्या जुळ्या बाळांसाठी विणलेल्या क्रोशाच्या टोप्या.
हॅल्लो किटी आणि अँग्री बर्ड.



ही मुग्गीसाठी



आणि ही मुग्ग्यासाठी



पांढर्‍यावरचं काळं... (पेन्सिल बॉक्स)

एक काळं पेन आणि एक पांढरा गोल बॉक्स, आणि एक कंटाळवाणी दुपार... त्यातला अर्धा तास स्मित
मग काम सुरू .. टींन..टींन..टिडींग..टींन..टींन..टिडींग..
niddle_box (800x600).jpg
मग बनला हा सुंदर बॉक्स.
त्याचा टिकाउपणा वाढवायला त्यावर एका रुंद सेलोटेपचे कव्हर चढवले.
झालं माझ्या क्रोशाच्या हुक्स चं नवं घर तय्यार !
black_white.jpg
माझ्याकडे क्रोशाचे हुक्स सध्या वाढत आहेत म्हणून मी तेच ठेवले आहेत.
पण तुम्ही पेन्सिल बॉक्स म्हणून वापरु शकाल. किंवा आजकाल ते चाळीशीचे नाजुक चष्मे मिळतात ते ठेवायलाही छान आहे ना हा बॉक्स ? स्मित

1/13/2013

Blue Hoodie क्रोशे स्वेटर

पुन्हा एकदा माझं क्रोश्याचं फॅड !
पहिल्यांदाच एव्हढा मोठा स्वेटर विणायचा प्रयत्न केलाय.



हा मी विणलेला क्रोश्याचा स्वेटर(हुडी). कुठल्याही पॅटर्नशिवाय अंदजानेच विणलाय परंतू दहा वर्षांच्या मुलाच्या मापाचा आहे.





लेकाच्या हौसेखातर त्यावर नासा चा सोविनियर चिकटवलाय.