2/13/2013

ट्रेजर बॉक्स

श्रेयुडीला त्याची खेळणी आवरताना मी म्हटलं.."काय हा कचरा जमवुन ठेवतोस.. उगाचच ?? "

तर तो म्हणे.."थांब टाकून देऊ नकोस! आई ....इंपॉर्टंट आहे गं ते. दॅट्स ऑल माय ट्रेजर ! "

मग सहजच नकळत मला माझा ट्रेजर बॉक्स आठवला..

वरच्या माडीत मी सुद्धा असंच काय काय गोळा करायची ना ? कसल्याश्या झाडाच्या शेंगा..वाघाच्या नख्या म्हणून... बुरकुल बुरकुलं करुन ठेवलेला सावरीचा मउशार चंदेरी कापूस... रंगीबेरंगी काचा.... वर्तमान पत्रातील आवडत्या चित्रांची कात्रणं ... तुटके असले तरी कधी काळी आवडते पेन्स.... गोट्या..... रंगिबेरंगी आणि विविध आकारांचे दगड... उन्हाळ्याच्या सुट्टीत केदारेश्वरी नदीच्या वाळवंटात जाउन तासंतास गोळा केलेले... तेच तेच एकाच प्रकारचे भारंभर शंख शिंपले... एका प्लॅस्टिकच्या पिशवीत जमवलेले पोस्टाचे स्टँप्स... आणि जिवापाड जपलेल्या.. खूप खूप जमा केलेल्या स्टिकर्स् चं कलेक्शन केलेल्या दोन वह्या....तेव्हाच्या वयात सो कॉल्ड सुविचार वगैरे लिहिलेली एल आय चा सोनेरी लोगो असलेली एक डायरी.... त्या डायरीतली दोन मोरपिसं आणि खूप सांभाळून ठेवल्यावर जाळी बनेल म्हणून जपलेले एक पिंपळपान....... आठवणींचे पिंपळपान... हृदयाच्या आकाराचं नाजुकसं... नक्षिदार...

कधीकधी मन अगदी पीसा सारखं खूप खूप हलकं होतं  आणी आयुष्याच्या हिंदोळ्यावर अलगद तरंगायला लागतं... मनाच्या आडवळणावर आठवणींचा ट्रॅफिक जॅम होतो आणि मग स्मृतींना धुमारे फुटायला लागतात आणि मन पुन्हा पुन्हा नॉस्टॅल्जिक होउन त्या ब्लॅक अ‍ॅन्ड व्हाईट फ्लॅशबॅक मध्येच अडकुन रहातं...

मला आणि माझ्या मनालाही बाहेर यायचंच नसतं मग ह्या फ्लॅशबॅक मधून... म्हणूनच मग मीही पुन्हा ट्रेजर जमा करते.. सगळ्या आठवणींना एका संदूकीत गोळा करून आणि बंद करून ठेउन देते मग मनाच्याच एका कोनाड्यात !

No comments:

Post a Comment