11/23/2011

काजुकतली


काजुकतली लहान थोर सगळ्यांच्या आवडीची. स्वीट मार्ट्वाले हलवाई आजकाल त्यात खरे काजू वापरतात की नाही कुणास ठाऊक ? पेढे बर्फी बनवताना बरेचदा कृत्रिम दूध वगैरे वापरतात. त्यामुळे लहान मुलांना पोटात लगेच इंफेक्शन होते. आज मी इथे काजुकतलीची रेसीपी शेअर करतेय. अगदी सोप्पी आहे. घरच्याघरी एकदम झटपट तिही हमखास जमेल अशी. काजुकतली बनवायला जमली की त्याचेह थोडे व्हेरिएअशन करून काजू रोल… आणि काजूचे सफ़रचंद फ़ळांच्या फोडी वगैरे इतर बाजारात स्वीट्स   करता येतात. ओके मग आधी आपण काजुकतली कशी बनवायची ते बघुया…

 लागणारा वेळ:

१५ मिनिटे

लागणारे जिन्नस:
पिठी साखर १ वाटी

काजू पावडर २ वाट्या

दुधाची घट्ट साय २ चमचे

पाणी पाव वाटी

तुप १ चमचाभर

क्रमवार पाककृती:

  • कढई किंवा जाड बुडाचे पातेले तापायला ठेवावे.
  • काजूची पुड केली नसेल तर करुन घ्यावी. तयार पुड दोन वाट्या भरायला हवी.
  • कढईमध्ये एक वाटी साखर, दोन चमचे साय व पाव वाटी पाणी घालून साखरेत साय एकत्र होईल असे मिसळावे. गॅस मिडीयम हाय वर ठेउन सतत ढवळत रहावे.
  • साखर वितळेल व बाजुने बुडबुडे यायला सुर्वात होईल मग लगेच त्यात काजु पावडर घालून मिश्रण ढवळावे. मिश्रण गोळा व्हायला लागले की लगेच गॅस बंद करुन कढई खाली उतरवावी.
  • ताटाला किंवा पोळपाटाला तुप लाउन भरभर गोळ्याची पोळी लाटावी. हवा असल्यास चांदीचा वर्ख लावावा. मग लगेच धारदार सुरीने हव्या त्या आकाराच्या वड्या कापाव्या.

शंकरपाळ्याच्या आकारत कापताना कडेचे तुकडे उगाच अर्धवट पडतात.
म्हणून ह्या साध्या सोप्या चौकोनी.


वाढणी/प्रमाण:

खाउ तसे/ आकारानुसार लहान मोठे बनवू तसे. :)

अधिक टिपा:

  • कोणतीही बर्फी किंवा वड्या बनवताना मिश्रणाचा गोळा होत आला की चमचाभर पिठीसाखर भुरभुरवायची आणि पटकन मिक्स करुन मग वड्या थापायच्या/लाटायच्या. असे केल्याने वड्या/ बर्फी चिकट न होता एकदम खुटखुटीट होते.
  • काजू सादळलेले(मउ) असतील तर काजु पावडर निट होत नाही.
  • काजु पावडर बनवताना मिक्सर फर्स्ट स्पीड वर किंवा ईंच वर चालवावा एक एक मिनिटाच्या गॅप ने. दोन ते तिन मिनिटात चांगली सपीट पावडर बनते.

No comments:

Post a Comment