3/28/2011

मन मन मनांत बोलते......

माझी अत्यंत आवडती कविता मन मनास उमगत नाही... सहजच गुणगुणत होते आणि नकळतच पिल्लुने विचारलं... ए आई मन मिन्स ? सांग ना? ब्रेन का ?

मी हरवलेच होते.. कवितेत....सुधीर मोघेंची कविता आणि श्रीधर फडकेंचा आवाज्... कानात ऐकू यायला लागला...

मन मनास उमगत नाही
आधार कसा शोधावा !
स्वप्नातिल पदर धुक्याचा
हातास कसा लागावा?

मन थेंबांचे आकाश
लाटांनी सावरलेले
मन नक्षत्रांचे रान
अवकाशी अवघडलेले
मन गरगरते आवर्त
मन रानभूल, मन चकवा

मन काळोखाची गुंफा
मन तेजाचे राऊळ
मन सैतानाचा हात
मन देवाचे पाऊल
दुबळ्या गळक्या झोळीत
हा सूर्य कसा झेलावा ?

चेहरा-मोहरा ह्याचा
कुणि कधी पाहिला नाही
धनि अस्तित्वाचा तरिही
ह्याच्याविण दुसरा नाही
ह्या अनोळखी नात्याचा
कुणि कसा भरवसा द्यावा ?


कुठेतरी काहितरी चकवा लागला होता हेच खरं...काय बरं सांगू मन म्हणजे???

मन कशात लागत नाही आधार कशाच्या घ्यावा ?

मन मनास उमगत नाही

माझीया मना जरा थांबना

मन माझे मोरपिशी स्वप्न जणू

माझिया मना जरा थांब ना.....

मन...
काय अन किती.. कुणी कुणी.. आणी कुठे कुठे आणी कित्तीतरी अफाट...लिहीलं आहे मनावर..

मनाचीये गुंती...मनाच्या गाभार्‍यात...मनाच्या अंतरंगात...माझिया मना...तुझे मन माझे मन...मनी मानसी...मनातल्या मनात...मनातल्या उन्हात..

ह्या मनाच्या निरनिराळ्या तर्‍हा....किती आणि काय सांगू बाळा ?

व्याकूळ मन...
बावरं मन...
वेडं मन...
चंचल मन...
विषण्ण मन...
सुन्न मन...
अस्थिर मन...
उदास मन...

सगळी मनं वेगळी.. सगळे शब्द वेगळे, विषय वेगळे.. कुणाची सुखं..कुणाची दु:ख.. कुणाचं कारुण्य.. आशा-निराशा, आकांक्षा-अपेक्षा, हेवे-दावे काही कथा तर बर्‍याच व्यथा.. सारंच वेगळं.. मन मात्र खरं ... सगळं सामावून घेणारं.. मन हेच खरं...मनाच्याही मनात ठेवणारं.. माझं मन.

भारावलेल्या अवस्थेत मी पिल्लाला काय सांगितलं... समजावलं काहीच आठ्वत नाहिये आता.. पण त्याला विचाराल तर तो आता छातीवर मानेजवळ हात ठेउन सांगतो.. माझ्या इथे आहे मन. :)

No comments:

Post a Comment