खारुताई....मला आठवतंय मी बघितलेली पहिली खार म्हणजे माझी लहानपणीची मिन्टी मनी बँक. म्हणजे काय तर प्लॅस्टीकची मिन्टी पैसे साठवायची. आपल्या पोस्ट खात्याने दिलेली तिही गाजरी गुलाबी रंगाची. त्यावरून खरी खार कशी असते कशी दिसते ह्याची कल्पना येणार तरी कशी ? आता त्या चिमुकल्या वयात खार कुठे खर्ररी खुर्ररी बघितलेली ? आजीला विचारलं तर आजी म्हणायची मी दाखवेन तुला एकदा कधीतरी. माळावर दिसतात कधी कधी खारुट्या आंब्याचा मोहोर खाताना. तो पर्यंत अश्याच एका छोट्या खारुटीची गोष्ट ऐक.. खारीचा वाटा... मग आजी मला रामाची गोष्ट सांगायची. रामाने वानरांच्या सहाय्याने कसा समुद्रसेतू बांधला.… प्रत्येक दगडावर श्रीराम' 'श्रीराम' असे लिहिल्याने सगळे दगड कसे पाण्यावर तरंगले... आणि मग ते दगड एकमेकांना घट्ट चिकटवण्याच्या कामात एका धिटूकल्या पिटूकल्या खारीने आपल्या चिमुकल्या मदतीने चिखल भरायचे काम केले. तोच खारीचा महत्वाचा वाटा. आजीच्या ह्या अश्या गोड गोष्टी ऐकत रात्री कधी झोप लागायची ते समजायचंच नाही. पण मग तरीही खारींबद्दलचे कुतुहल काही संपत नव्ह्ते.
पुढे केव्हातरी मला नदीकाठच्या विष्णूमंदीरी खारूताई दिसलीही. पण चपळच फार निट निरखता पारखता यायाचेच नाही. नंतरही ती खारूताई मला भेटतच राहिली कधी बालगितांमधून तर कधी कुठल्या सुंदर चित्रांमधून. आताशा तर मुलांच्या व्हिडिओज मध्ये काय सुंदर अॅनिमेशन असते. एकदम गोंडस खारुताई. आपल्याकडे भारतात आजवर पाहिलेल्या सगळ्या खारी अगदी पिटूकल्या. उंदराएव्हढ्या छोट्याश्या. बंगळूरला असताना बरेचदा सकाळी मी चहा घेत घेत बालकनीतून ह्या चिमुरड्या खारींचे खेळ बघत बसायची. आंब्याला मोहोर आला की ह्यांची पळापळ सुरू. कधीकधी उगाच कुठ्ल्या कार च्या खालून सुर्रकन पळायच्या आणि मग तो गाड्यांचा सेक्यूरिटी आलार्म सुईईईईईईईंग्ग्ग्ग्ग्ग्ग्ग्ग्ग्ग्ग्ग्ग्ग् कन वाजायला लागायचा आणि मग घाबरलेल्या त्या सगळ्या खारींचा सामुदाईक टिवटीवाट चालायचा. एकेकदा तर अर्धा अर्धा तास आवाज करून जीव नकोसा करून सोडायच्या. थंडी वाढायच्या आधी लगबग घरटे निट करायची घाई. कुठून कुठून मऊशार बुरकुले, पिसं, पालापाचोळा झाडाच्या डोलीत गोळा करून घर उबदार करायाला लुटुपुटु घाई. तर कधी हिवाळ्याची तरतूद खाऊ लपवून ठेवायची तयारी. सतत कसलीतरी लगबग नाहीतर भिती. एकदाही फ़ोटोत सापडायच्या नाहीत.
ही तस्शीच एक भित्री भागुबाई. फोटो काढे पर्यंत पळाली सुद्धा.
इथे टेक्सास ला आल्यापासून मला खारी आणि ससेही खूप दिसतात. रस्त्यावरून जाता येता आणि पार्कमध्ये बेंचवर बसून राहिल्यावरही मला त्यांचे खेळ निरखत बसायला खूप आवडतं. खारींना वातावरणात घडणारे चढउतार फार चटकन आणि आधीच समजतात आणि त्यादृष्टीने तसे वातावरण बदलायच्या आधीच ह्या चिमुरड्यांची तयारी सुरु होते. टेक्सास मध्ये चांगल्या मोठ्या खारी आहेत. त्यांना फॉक्स स्क़्विरल्स म्हणतात. त्यांच्या अंगावर कोल्ह्यांसारखी पिवळसर झाक असते. आणि शेपटीही खूप मोठे गोंडेदार. "पडेल थंडी तेव्हा माझ्या शेपटीची मल्लाच बंडी" हे अगदी खरे वाटावी अश्शी सुंदर झुपकेदार. इथे खूप ओक वृक्ष आहेत . त्या ओक वृक्षांची फळं म्हणजेच एकॉर्न्स खारींना खूप आवडतात.
ही एक खारुटी तिचा एकॉर्न खात बसलिये.
गंमत म्हणजे ह्या लबाड खारी हुशारही तितक्याच आहेत. हिवाळा आला की ह्यांचे विंटर हायबरनेशन जोरात सुरु असते. मिळतील तसे एकॉर्न्स दोन हातात धरून फ़ोडून खातात. कधी पूर्ण तर कधी नुसतेच कुरतडून कुठेतरी नेउन मातीमध्ये पाचोळ्याच्या खाली पुरून लपवून ठेवतात. हा त्यांचा खाऊ खायला पक्के वाटेकरी म्हणजे इथले पक्षी करडी कबुतरे आणि निळे जे (ब्लू जे). जसे जसे वातावरण थंड होत जाते तसे ह्या दिसेनाश्या होतात. पण जात मात्र कुठेच नाहीत. लपून राहातात आपल्या बागेतल्या बिळांमध्ये नाहीतर झाडावरच्या घरट्यांत. जरा हवा उबदार झाली थोडंस्सं उन आलं की आल्या ह्या माती उकरायला आणि लपवलेले एकॉर्न्स खायला.
काय अद्भूत आहे देव आणि त्याची ही सृष्टीही. ह्या खारीनी पुरलेले पेरलेले आणि बरेचदा पुन्हा उकरून वर न काढलेले असे बरेच एकॉर्न्स पुन्हा खोल मातीत रुजतात, अंकुरतात आणि त्यांचे नव्याने मोठे उंच ओक वृक्ष बनतात. अशा प्रकारे हे चिमुकले जीव वातावरणाचा समतोल राखण्यासाठी खऱ्या अर्थाने आपला खारीचा वाटा उचलतात.
राम आणि लंकेचा रामसेतू खरा की खोटा ते देव जाणे. पण मी मात्र माझ्या दोन छोट्या चिपमंक्स ना ह्या खर्याखुर्या खारीच्या वाट्याची गोष्ट सांगते आणि खारुताई दिसली की मुलांसोबत गाणंही गाते……
खार बाई खार
नाजूक नार
शेपूट तिचे
किती झुपकेदार….
खार बाई खार
चपळ फार
क्षणात होते
नजरे पार ….