3/30/2014

लोलक



चम्हालातु चंमतग चंगुसा ?  आर्ट फ़ेस्ट मध्ये भटकता भटकता सहज एक स्टॉल आला समोर. एक मुलगी आपल्या बापा सोबत निरनिराळ्या आकाराचे ट्प्पोरे क्लियर क्रिस्टल्स वापरून विंड चाइम्स आणि  सनकॅचर बनवत होती. तिचे वडील गेली २३ वर्षे हे काम करत आहेत आणि ती आता आता शिकतेय वगैरे वगैरे माहिती सांगू लागली…  पण तेवढ्यात माझं लक्ष गेलं त्या मोठ्या टपोऱ्या  षटकोनी लोलका वर. आणि मग न कळतच मी त्याच्या अंतरीच्या गूढ गर्भी  स्वत:ला शोधायला लागले.….  आणि अडकले त्या इंद्रधनुष्यी नोस्टेल्जियात.

लहान पणी हरवलेला माझा लोलक आठवला. कोणे एके काळी किचेन्स जमा करायचा छंद जडला होता. एक एक करत चांगल्या २७ किचेन्स जमवल्या होत्या. त्यात सर्वात महागाचं होतं ते काचेरी लोलक. मला अजुनही आठवतंय. मिण्टी बॅंके मध्ये  एशियाड च्या शिक्क्यंची रुपयाची नाणी साठवून चांगले तीस रुपयाला घेतली होती ती किचेन. आई साहेबांचा ओरडाही खाल्ला होता. सर्वात आवडतं म्हणून मग सायकलची किल्ली अडकवली त्यात. सुंदर चकचकीत होता तो लोलक. उन्हात एका विशिष्ठ कोनात धरल्यावर काय सुरेख सप्तरंगी कवडसे पडायचे मग त्याचे…. एका ना दोन तर पूर्ण भिंतीभर खूप सारे अगणीत. मग बरेच दिवस मला खेळच जडला होता त्याचा. कधी माझ्या लाडक्या कुत्र्याला जॉनी ला ते कवडसे पकडायला लावायची तर कधी स्वता:च्या डोळ्यासमोर धरून डोळा आरश्यात पहायचा. निरनिराळ्या  रंगाच्या…  आकाराच्या वस्तू त्यातून निरखत बसायचं. गुंजा फार सुंदर दिसायच्या त्या लोलकातून. टपोर्या बटाट्या एव्हढ्या डोळ्यांसारख्या.

एकेदिवशी आईनं एक फॉर्म द्यायला बँकेत पाठवलं. गेले सायकल घेउन. आणि निघताना चावी पडली हातातून तस्सं  किचेन मधून तुटून टूण्णकन तो लोलक गेला काउंटरच्या फ़टीत जाउन असा अडकला … काही केल्या निघेना…. निराश होऊन घरी आले… हरवलाच तो लोलक कायमचा….

वारुळातून मुंग्या एका मागोमाग बाहेर याव्या तस्सच असतं अगदी आठवणींचं… मी हरवलेच होते नोस्टेल्जियात…. त्या वाऱ्यावर हलणाऱ्या सन कॅचर मधल्या लोलकाचे फोटो काढले आणि मुलांना तो क्रिस्टल आणि त्याची सप्तरंगी मजा दाखवली….


शांता बाईंच्या  कवितेतली मुलगी लहानपणीची मीच होते जणुकाही…

तुला माहिती आहे ?
गवत नसतं नुसतं हिरवं
आणि आभाळ नसतं  नुसतं निळं
आणि माणसं असतात इंद्रधनुष्याची  बनलेली

 


 

 

3/12/2014

बनाना मफिन्स

बनाना मफिन्स


साहित्य :
१ स्टिक अन्सोल्टेड बटर
१ कप ब्राउन शुगर किंवा बाऊन शुगर नसेल तर आपली साधी रोजची साखर सुद्धा  चालेल.
१अंडं
३ मध्यम आकाराची पण खूप पिकलेली केळी मॅश करून.
३ टेबलस्पून दही (प्लेन योगर्ट)
१ टीस्पून प्युअर वॅनिला इसेन्स
१ १/२ कप कणीक किंवा मैदा किंवा ऑल पर्पज फ्लार ह्या पैकी काहीही एक चालेल.
१ टीस्पून बेकिंग सोडा
१ टीस्पून वेलची किंवा दालचिनी पूड (आपल्या आवडीनुसार)
१/४ टीस्पून मिठ

थोडेसे मनुके आणि ड्राय्फ़्रुट्स चे काप (पेकंस बदाम अक्रोड पिस्ते यापैकी काहीही )

कृती

ओवन ३५० डिग्री Farenhit वर प्रीहिट करून ठेवा.

कणीक/ मैदा किंवा ऑल पर्पज फ्लार जे वापरणार असाल ते बेकींग सोडा मिक्स करून चाळून घ्या.

एका काचेच्या बोल मध्ये बटर आणि  साखर मिक्स करून अगदी क्रीम सारखे हलके होई पर्यंत फेटून घ्यायचे.

मग त्यात एक अंडे घालून फ़ेटायचे. नंतर त्यात मॅश केलेली केळी, दही आणी वॅनिला इसेन्स असे सगळे क्रमवार घालून मिश्रण चांगले ढवळायचे.

नंतर  हळूहळू कणीक/ मैदा किंवा ऑल पर्पज फ्लार मिक्स करून घ्या व अलगद हाताने मिश्रण ढवळा. आता त्यात मनुके, ड्रायफ्रूट  चे काप वगैरे टाका.

केक किंवा मफिन्स ट्रे मध्ये पेपर कपस घालून त्यात मिश्रण घालून मग ओवन मध्ये ३५ मिनीटे बेक करा. सुइ किंवा टूथपिक टोचून बघा जर काडीला काही लागले नसेल तर केक चांगला बेक झाला आहे. थोडावेळ थांबून मग सगळे मफिन्स वायर रॅक वर गार होण्यासाठी ठेवा. 

वर दिलेल्या साहित्यात १२ ते १६ मफिन्स किंवा साधारण ४० एक मिनी मफिन्स बनतात.
हे बनाना मफिन्स छोट्या  मुलांना शाळेत डब्यात द्यायला एकदम मस्त आहेत. भरपूर आणि पोटभर तेही पौष्टिक. मोठ्यांनाही एक कप चहा किंवा कॉफी सोबत ब्रेकफ़ास्ट ऑन द गो म्हणून मस्तच !