2/20/2014

का चिंता करिसी ? (ग्वाटेमालन वरी डॉल्स)



परवा मुलांच्या शाळेत मल्टी कल्चरल डे  झाला त्यात एक नवाच देश समजला. ग्वाटेमाला. म्हणजे मला ह्या आधी तरी कधी अश्या कुठल्या देशाचे नाव ऐकिवात नव्ह्ते. मेक्सिको आणि सेन्ट्रल अमेरिकेच्या मधे असलेला अगदी छोटुस्सा देश. देश जरी अगदी छोटासा पण फार फार इण्टरेस्टींग माहिती मिळाली ह्या देशाबद्दल. इथली स्पॅनिश संस्कृती, लोक, त्यांचे पेहराव वगैरे सगळेच खूप रंगबिरंगी दिसायला सुंदर. सगळी मोहक कलाकुसर बघुन कुणालाही ह्याबद्दल अजून माहीती घ्याविशी वाटेल. माहिती सांगणार्‍या स्वयंसेविकेने खूप छान ओळख करुन दिली आपल्या देशाची. ह्या देशाची खासियत असलेल्या कुकीज आणि सरबत सुद्धा दिलं.

माहिती ऐकत असतानाच समोर ठेवलेल्या सुंदर लाकडी डब्या आणि अगदी इंचभर पण नसतील इतक्या छोट्याश्या बाहुल्यांवर नजर गेली.

"धिस इस फॉर यु मॅम" असे म्हणत तिने दोन बॉक्स माझ्या हातात दिले. म्हणाली "यु हॅव टू लव्ली किड्स, डॉल्स विल प्रोटेक्ट देम फ्रॉम फियर !"

माझ्या चेहर्‍यावरच्या आश्चर्याचे भाव बघून ती म्हणाली "आवर स्पेश्यल ग्वाटेमालन वरी डॉल्स "


ह्याच त्या ग्वाटेमालन वरी डॉल्स चिंता नाहीश्या करणाऱ्या बाहुल्या.

ह्या बाहुल्या साधारणतः १ इंच (२.५४ से.मी) इतक्या आकाराच्या असतात. एका सुंदर डबित किंवा छोट्याश्या बटव्यात ५ किंवा ६ बाहुल्यांचा एक सेट ठेवलेला असतो. लहानश्या काड्यांच्या तुकड्यांना रंगिबेरंगी कापडाच्या चिन्ध्या किंवा तर्‍हे तर्‍हेचे दोरे गुंडाळून वापरून बनवतात. नाजूकश्या असल्या तरी फार महाग नसतात. सर्व सामान्यांना घेता आणि वापरता याव्या म्हणून अगदी मामुली दरात विकत मिळतात.

ह्या बाहुल्यांची कहाणी फारच रंजक वाटली मला. ह्या पिटुकल्या बाहुल्या म्हणे रात्री झोपताना लहान मुलांच्या उशाला ठेवायच्या म्हणजे मुलांना कशाची भिती वाटत नाही कोणतीच वाईट स्वप्ने पडत नाहीत, मुले चिंतामुक्त होउन शांत आरामशीर झोपी जातात.

मायन संस्कृती पासून ह्या वरी डॉल्स वापरात आहेत म्हणे. ग्वाटेमालन लोकांची अशी समजूत आहे की रोज रात्री मुले झोपण्या पूर्वी आपली भिती, चिंता किंवा ज्या काय तक्रारी असतील त्या ह्या डबितल्या एकेका बाहुलीला एक चिंता सांगतात. आणि बाहुल्या उशीखाली ठेउन झोपी जातात. ग्वाटेमालन पालक मुलांना समजवण्यासाठी मग रात्रीतून एक एक बाहुली उशीखालून काढुन टाकतात. मुले चिंतामुक्त होण्यासाठी ! सगळ्या चिंता बाहुल्यांना देउन मुले बिनघोर झोपी जातात. सकाळी उठल्यावर सर्व चिंता भिती बिती सबकुछ गायब.

रियल लाईफ मध्ये अश्या वरी डॉल्स असत्या तर किती बरं झालं असतं नै ? कल्पनेतच सुख असतं !! आपल्याला काय ?

हकुना मटाटा…. डोण्ट वरी बी हैप्पी :)