1/18/2014

मरमेड केक

लेकीचा बर्थ डे होता. एका आठवड्यात चार पाच वेगवेगळे ऑप्शन्स सांगून झाले कधी आई मला बटर्फ्लाय चा केक तर कधी मिनी माउस चा... शेवटी गाडी आली मला मरमेड चा केक हवा आहे. आणि अनायसे समोर एक नवी कोरी मरमेड बार्बी मिळाली.  मग मी ह्या वेळी घरी केक करायचे ठरवले.

साधारण डोक्यात आयडीयाची  कल्पना मांडली. साहीत्याची जमवाजमव केली. वेगवेगळ्या आकाराचे बेसीक केक बेक करून घेतले. मरमेड आयलंड आणी पाणी असे काहीसे करायचे होते.

म्हणून चॉकलेट आणि वॅनिला आयसिंग सोबत निळे आयसिंग. मरमेड सोबत मोती चांगले दिसतील म्हणून पर्ल कॅन्डी आणि केक वर किंवा इतर पाण्यात टाकायला फिश  च्या आकाराच्या छोट्या स्प्रिंकलर कॅन्डी. पाणी कसे दाखवायचे ? मग जेली ची आयडीया सुचली..  एका भांड्यात जेली सेट करून घेतली.

केक ला बेस म्हणून एक मोठ्ठा चौरस आकाराचा  ट्रे घेऊन त्याला अल्युमिनियम  फॉइल लावली. मग दोन्ही मोठे केक मधोमध कापून त्याला व्हिप क्रीम लाऊन एकावर एक ठेवले. खालच्या गोल केक ला निळे आयसिंग केले वरच्या केक चा ला मरमेड ला बसवण्यासाठी त्रिकोणी खाच करून जागा करून घेतली. त्याचा रॉक दिसेल असा चोकलेटी आयसिंग करून आकार निट  केला.

 
मग हिरव्या  रंगाच्या आयसिंग ने पाण वनस्पती वेली  वगैरे काढले. निळ्या केक वर थोड्या थोड्या अंतरावर मोती लावले. ट्रे  मध्ये रिकाम्या जागेत फिश च्या आकाराची स्प्रिम्कल्र्स टाकून त्यावर जेली सेट केली. आणि तरीही थोडी जागा उरली मग त्यात उरलेल्या केक चा चुरा करून समुद्राची वाळू असल्याचा भास निर्माण केला. नंतर ऐनवेळी सुचले की  अरे आपल्याकडे शंखाच्या चॉकलेट मोल्ड आहेत मग ते चॉकलेट  बनवून त्या वाळूवर ठेवले. फायनली सगळे आयसिंग करून झाल्यावर पाण्यात पाय सोडलेली मरमेड त्यावर बसवली  हे सगळं प्रकरण केक कापे पर्यंत फ्रीज मध्ये ठेवले.

हि बघा छान  दिसतेय ना ?



पार्टी आधी दोन तास आयसिंग करायला सुरु केले होते. केक करताना खूप धाकधूक होती . वेळेत नाही झाला तर….  चांगला नाही दिसला तर…  खूप गोड होईल का ? निट  दिसेल का ? ३०-३५ जणांच्या पार्टीला पुरेल का ?वगैरे वगैरे… पण केक एकदम मस्त झाला होता त्याचा अगदी फन्ना उडवला बच्चे कंपनी एकदम खुश ! लेक ज्याला त्याला दाखवून सांगत होती …  माझ्या मम्माने बनवला आहे केक. भरून पावले !