2/09/2011

पिरॅमिड व्हॅली - वन ऑफ दी सेव्हन वंडर्स ऑफ बेंगालूरू

सध्या रोज बँगलोर मिरर मध्ये ह्या पिरॅमिड्चे फोटो येत आहेत. त्यावरुन मला हे इथे लिहावंसं वाटलं. काही महिन्यांपूर्वी एका मैत्रिणीकडून पिरॅमिड व्हॅली विषयी ऐकले आणि लगेचच्या विकेंड्ला तिथे जाउन आले. कनकपुरा रोडवरून साधारण ३५ किमी अंतरावर आहे ही पिरॅमिड व्हॅली. रविशंकर आश्रम सोडल्यावर अजून १५ किमी पुढे जावे लागते. ठिकठिकाणी साईन बोर्ड्स लावलेले आहेत. शेवटी डाविकडे वळावे लागते. तिथुन एक किलोमिटरचा जो प्रवास आहे तो एका छोट्याश्या खेड्यातून :) रस्ता थोडा छोटा, वळणावळणाचा, दोन्ही बाजूंनी एकतर शेतं आहेत किंवा गावातली झोपडी वजा बैठी कौलारु घरं. इथे आल्यावर वाटलं की नक्की आपण बरोबर जातोय ना ? पण मग तिथे पोहोचल्यावर खूप छान वाटलं. सगळीकडे आजूबाजूला हिरव्यागार टेकड्या आणि मध्ये हा १०४ फूट उंच पिरॅमिड बांधला आहे.




दूरून बघतानाही खूप छान वाटत होतं.



तळ्याजवळून



पिरॅमिडकडे जाणार्‍या मुख्य वाटेवर असलेला हा ध्यानस्थ बुद्ध



हिरव्या वनराईच्या मध्ये असलेला पिरॅमिड




हा पिरॅमिड म्हणजे जगातील सर्वात मोठ्ठं मेडीटेशन सेंटर आहे. १६० फुट बाय १६० फुट एवढा बेस एरिया असून ह्याची उंची साधारण दहा मजली इमारती एवढी आहे. ह्या मैत्रेय-बुद्धा पिरॅमिड मेडीटेशन सेंटर मध्ये साधारण ५००० लोक सहज मावतिल एवढी जागा आहे. पिरॅमिडच्या बाहेरच्या बाजूला सुंदर म्युरल्स आहेत.
ह्याचे ओरीएन्टेशन दक्षिणोत्तर असून Giza Pyramid च्या प्रिन्सिपल्स प्रमाणे ह्याचे बांधकाम केले आहे. ह्या पिरॅमिड्च्या कामामध्ये हिमालयामधले ६५० क्रिस्टल्स वापरले आहेत असे तिथे माहिती सांगणार्‍या एका काकांनी सांगितले.

पिरॅमिड म्हणजे ऊर्जेचं घर. पिरॅमीड मध्ये त्याच्या भौमितिक रचनेमुळे उर्जा एकत्रित करून साठवली जाते. पण असंही म्हणतात की पिरॅमिड मनावरचा ताण तणाव आणि थकवा घालवू शकतात. ह्या पिरॅमिड मध्ये जर ध्यानधारणा - मेडीटेशन केलं तर ते नेहमीच्या मेडीटेशन पेक्षा तिप्पट प्रभावी ठरतं. तसाच हा मेडीटेशन पिरॅमिड. ह्या ठिकाणी गेल्यावर तिथे असलेल्या लोकांचे अनुभव ऐकून असे समजले कि इथे आत वर किंग्ज्स चेंबर्स ला जाउन ध्यानधारणा केली तर संपूर्ण शरीराचा थकवा निघून जाउन, शरिराचे शिथीलीकरण होउन मनात कसलेही विचार येत नाही. खुप प्रसन्न शांत वाटतं. तर कुणी संगितलं की समाधी अवस्थेत थोड्या वेळाने एका साधकाला स्वतःला हातच नाहियेत असाही भास झाला होता.

आत जाण्यासाठी अतिव उत्सुकता होती. इजिप्तचे पिरॅमिड बघायचा योग कधी येतो ते माहीत नाही. मग इथे काय आहे ते जाणून घ्यायचे होते. आत प्रवेश करण्यापूर्वी अनेक सुचना लिहिलेला कागद आमच्या हाती दिला गेला. आणि सांगितले. की आत आवाज करायचा नाही अगदी पाउलंही वाजवायची नाहीत. तुम्ही मेडीटेशन करणार असाल तरच आणि अर्ध्या तासाहून अधीक काळ करणार असाल तरच तुम्हाला वर किंग्ज्स चेंबर्स वर जायला मिळेल. मी हो म्हण्टलं. मग त्यांनी मेडीटेशन साठी कश्या पोज मध्ये बसायला पाहिजे ते सांगितले. सर्व सुचना समजल्या वर मी आत गेले.

आत प्रवेश केल्यावर उजवीकडे आणि डावीकडे अशी दोन दालने दिसली. एकेक करून दोन्ही बघुन घेतली. दोन्ही दालनांमध्ये ध्यानधारणेच्या वेगवेगळ्या अवस्था दर्शवणार्‍या झोपलेल्या बुद्धाची, समाधीस्थ, ध्यानस्थ बुद्धाची अतिशय सुंदर मोठ्ठी वॉल म्युरल्स आहेत. :)

इथे आत फोटूगिरीला मनाई होती. मग थोड्या पाहिर्‍या चढून गेल्यावर वर भरपूर मोकळी जागा होती. तुरळक ठिकठिकाणी काही लोक समाधी लाउन बसले होते. काही ठिकाणी खुर्च्याही दिसल्या. पण खरा लक्षवेधी होता तो मध्यभागी असलेला गोलाकार (स्पायरल )वर जाणारा जिना. हाच तो किंग्ज चेंबरचा भाग. पिरॅमिडच्या मध्यभागी साधारण १/३ पट उंचीच्या ह्या भागाला किंग्ज चेंबर म्हणतात. ३४ फुटांवर असलेल्या हा भाग पिरॅमिडमधील सर्वात जास्त उर्जा असणारा (मोस्ट एनर्जीटीक) भाग आहे. तिस चाळिस लोक एका वेळी बसू शकतिल इथे.

मी वर गेले तेव्हा आधीच १०-१२ जण ध्यान लाउन बसले होते. मग मीही आधी सुचना दिल्या प्रमाणे (डोळे मिटून पाय पसरून एका पायवर दुसरा पाय चढवून म्हणजे आपण ज्याला अढी घालणे म्हणतो तसे) थोडा वेळ बसले. खूप प्रसन्न ... रिलॅक्स.. शांत वगैरे वगैरे खरंच वाटत होतं !मग कदाचित विस एक मिनिटे झाली असतिल.. काय झाले माहीत नाही...नंतत मला बसणे अशक्य झाले.. नक्की काय होत होते माहित नाही.. मला दरदरून घाम फुटला होता... म्हणून मी उठून खाली आले आणि आश्चर्य म्हणजे खाली पिरॅमिड बाहेर तर मस्त गारवा होता आभाळ भरून आलं होतं.

इथे सनसेट नाही अनुभवता आला :( नेक्स्ट टाईम !!!





इथे अधिक माहिती आहे आणि सुंदर फोटोज सुद्धा

2/04/2011

कोस्टल कर्नाटका - मुरुडेश्वर

मुरुडेश्वराचे हे मंदीर कंडुकागिरी नावाच्या टेकडीवर आहे. ह्या टेकडीच्या तिन्ही बाजूंना अरबीसमुद्र आहे. ह्या मंदिराच्या प्रवेशद्वाराची ही २० मजली गोपुरं अडिचशे फुट उंच असून त्याला राज गोपुरा असे म्हणतात. जगातल्या सर्वात उंच अश्या ह्या गोपुरात वर जाण्यासाठी लिफ्ट आहे. श्री. आर. एन. शेट्टी नामक उद्यजकांनी हे बांधकाम करवून घेतले आहे. तसेच ह्या मुरुडेश्वर मंदिराचा विकास आणि कंडुका हिल वरील मोठ्ठ्या शंकराचेही काम करवून घेतले आहे.

गोपुराच्या प्रमुख द्वाराजवळ खर्‍या हत्तींच्या उंचीचे खरे वाटतील असे दोन मोठ्ठे हत्ती आहेत.



राज गोपुराचा फोटो


अजून एक


मुरुडेश्वराच्या मंदिरात गणपती, कार्तिकेय यांची छोटी मंदिरे आहेत आणि मुख्य म्रिदेश लिंग (मुरुडेश्वर) आहे.

मुरुडेश्वर मंदीर सुर्योदयाच्या वेळी




मंदिराच्या मागिल बाजुस टेकडीवर जगातील सर्वात उंच (१२३ फुट/ ३७ मिटर्स) अशी शिवशंकराची मूर्ती आहे. ही अतिशय देखणी सुबक, प्रमाणबद्ध मूर्ती बनवण्याचे काम दोन वर्षे सुरु होते.

अतीभव्य शिवशंकर





शंकरा समोर उभा असलेला रावण आणि गुराख्याचा मुलगा



टेकडी वरून



अजुन एक




टेकडीवर इतर ठिकाणीही अश्या मूर्ती आहेत.



अर्जूनाचा रथ



नुकतिच मासेमारी करून आलेली छोटी होडी



फ्रेश कॅच चमचमणारे बांगडे :)



खेकड्याचे घर



खूप जवळून




खेकड्याचा फोटो काढायला त्याच्या मागे धावत होते. तर त्या बोटवाल्या काकांच्या मुलाने पटकन खेकडा पकडला.. नको नको म्हणत असताना त्याच्या नांग्याही तोडून टाकल्या. :( म्हणे हा आता काढा फोटो.



आर एन एस रोसॉर्ट जवळ सनसेट



संपूर्ण बिच, मुरुडेश्वर मंदीर, दोड्डा इश्वरा आणि आर एन एस.



ह्या मोठ्ठ्या ईश्वराला बघून मी वाळूत काढलेले शिवशंकराचे चित्र.
दोन्हीचा एकत्र फोटो घेण्याचा प्रयन्त केला पण अतिशय उन असल्याने काय होतंय ते समजतच नव्हतं





2/02/2011

गोकर्ण महाबळेश्वर-मुरूडेश्वर

मुरुडेश्वरची भव्य दिव्य शंकराची मूर्ती



प्रत्येक ऐतिहासिक प्राचीन मंदिराला काहिनाकाही इतीहास असतो त्या मागे काहीतरी कथा दंतकथा असते. मुरूडेश्वरच्या मोठ्या शंकराच्या पुढे रावण एका गुराख्याच्या छोट्या पोराला शंकराची पिंड धरायला सांगताना बघुनच ह्या मुरुडेश्वर विषयी, गोकर्ण विषयी कुतुहल होते. ही मोठ्ठ्या शंकराची मूर्ती कंडुकागिरी नावाच्या डोंगरावर आहे तिथेच त्या मूर्तीखाली जिथे पिवळे खांब दिसत आहेत तिथे असलेल्या कृत्रीम मानवनिर्मीत गुहेत ही कथा चित्ररुपात साकारलीये.

अमरत्व मिळवण्यासाठी अनेक देवांनी आत्मलिंगाची पूजा केली होती. ते आत्मलिंग शंकरांकडे होते. लंकाधीश रावण हा निस्सिम शिवभक्त होता. नेहमी तो कैलासावर जाउन तप:श्चर्या करीत असे. आपल्याला हवे ते मिळावण्यासाठी त्याने कित्येकदा घनघोर तपस्या करुन शिवशंभूंना प्रसन्न करुन घेतले होते. एकदा रावणाने अमरत्व मिळविण्याकरीता शंकरांचे आत्मलिंग मिळाअवे म्हणून खूप खूप कठोर तपःश्चर्या केली. "ओम नमः शिवाय !" चा अहोरात्र जप केला. एका पायावर उभे राहून त्याची तपःश्चर्या सुरु होती.

रावण एका पायावर तपःश्चर्या करताना



लंकाधिश रावण हा महाबली होता. त्याने कैलासालाच उचलून धरले. शिवशंभूंच्या नावाचा जप चालूच होता.

रावण कैलास उचलताना




वर्षोनुवर्षे लोटली. शिवशंभू काही प्रसन्न झाले नाहीत. मग त्या दशाननाने आपले एकेक मस्तक शिवचरणी अर्पण करावयास सुरुवात केली.

रावण मस्तक अर्पण करताना



शिवशंभू भोळे सांब त्याच्या ह्या मायावी आहूतीला भुलले आणि रावणाला प्रसन्न झाले.
म्हणाले, "सांग रावणा काय हवे आहे ? कशासाठी एवढी धनघोर तपःश्चर्या ?"

त्यावर रावणाने त्यांना सांगितले, "हे प्रभु तुम्ही मला तुमचे आत्मलिंग द्या ! मी ते आत्मलिंग माझ्या लंकेत स्थापित करुन मंदिर बांधेन, आणि असा वर द्या की जेव्हा केव्हा महाप्रलय येईल, सर्व जग पाण्यात बुडून जगाचा अंत होईल, तेव्हा हे लिंग माझे आणि माझ्या राज्ज्याचे रक्षण करेल. जिथे ह्याचे वास्तव्य असेल ती धरा जलमय होणार नाही. "

शंकरांनी त्याला आत्मलिंग दिले. म्हणाले, "तथास्तु ! पण सांभाळून जा, हे महाबली आत्मलिंग आहे तु जिथे हे आत्मलिंग ठेवशिल तिथेच हे घट्ट चिकटून राहील. दोन्ही हातांनी निट धर.. लंकेशिवाय कुठेही मध्ये ठेउ नकोस ! जर ठेवलेस तर मी काहीही करू शकणार नाही."

शंकर आत्मलिंग देताना



रावण आत्मलिंग घेउन लंकेला जायला निघाला. आधीच रावणाने आपल्या शक्तिने सर्व देवांना सळो की पळो करून सोडले होते. रावणाने आत्मलिंग मिळवले, हे जेव्हा सर्व देवांना समजले तेव्हा सगळ्या देवांनी त्राही त्राही म्हणत जगत्पित्या ब्रह्मदेवांकडे मदतीसाठी धाव घेतली. ब्रह्मदेवाने सांगितले,"निश्चींत रहा ! विघ्नहर्ता गणेशच तुम्हाला मदत करेल."

रावण पश्चीमी समुद्रावरून लंकेकडे मार्गस्थ होत असताना. मध्यान्हपूर्वच ब्रह्मदेवांनी ब्रह्मास्त्र टाकून सूर्य झाकला. रावणाला वाटले संध्याकाळ झाली. आता संध्येची वेळ झाली. पूजा करायला हवी. आत्मलिंग कुठे ठेवायचे नाही. मग आता काय करु ? ह्या विचारात रावण असताना अचानक गणपती एक गुराख्याचा पोराच्या रुपात तिथे प्रकटले.

गुराख्याच्या रुपातल्या गणेशाला आत्मलिंग धरायला सांगताना



त्या बाल गुराख्याला रावण म्हणाला, "ए मुला, माझी संध्येची वेळ झाली आहे, मी माझी संध्या आटोपून लवकरच येतो, तो पर्यंत तू ही शंकरांची पिंड हातात घट्ट धर. अजिबात खाली ठेउ नकोस. "
गणेशाने ती पिंड हात धरत म्हटले, "ही शंकराची पिंड तर फारच जड आहे, मला जेवढा वेळ शक्य असेल तेवढा वेळ मी हातात धरेन. तुम्हाला मी तीन हाका मारेन तो पर्यंत तुम्ही या, नाहीच शक्य झाले तर मी खाली ठेवेन." रावणाला हे मान्य झाले. तो संध्येसाठी गेला.

पुढे ठरल्या प्रमाणे ब्रह्माने ब्रह्मास्त्र काढून घेतले. तिन्हीसांज झालीच नव्ह्ती. गणेशाने पटापट रावणाला तीन हाका मारल्या, रावण गुराख्याच्या रुपातल्या गणेशापर्यंत पोहोचायच्या आत गणपतींनी आत्मलिंग जमिनिवर ठेउन दिले.

रावण गुराख्याच्या रुपातल्या गणेशाला मारताना



गुराख्याच्या पोराला शंकराची पिंड खाली ठेवताना बघुन रावणाला शिवशंकरांचे बोल आठवले, आता ते आत्मलिंग इथेच चिकटून रहाणार म्हणून त्याचा क्रोधाग्नी भडकला. रावण त्या गुराख्याच्या पोराला मारू लागला. इतक्यात तो मुलगा गायब होउन गणपती तिथे मूर्तीरूपात प्रकट झाले.

रावण आत्मलिंग उचलताना गोकर्ण



रावण भयानक क्रोधीत झाला होता. शंकरांचे आत्मलिंग जरी बलशाली होते तरी रावणही महाबलवान होता. रावणाने ते जमिनिवर चिकटलेले आत्मलिंग उचलण्याचे महत्प्रयास केले. पण ते त्याच्या शक्तीपुढे फोल ठरले. परंतू त्याने केलेल्या ओढाओढीत त्या पिंडीचा.. आत्मलिंगाचा आकार बदलून ते लिंग गाईच्या कानाच्या आकारासारखे दिसू लागले. पुढे त्याला गोकर्ण महाबळेश्वर असे नाव प्राप्त झाले. तेच सध्याचे गोकर्ण महाबळेश्वराचे मंदीर.

असंही सांगीतलं जातं की रावणाने खूप जोर लाउन ते आत्मलिंग ओढायचा प्रयत्न केला त्यात त्याचे काही तुकडे काही अंश त्याच्या हाती आले. ते काही ठिकाणी विखुरले व तिथेही कालांतराने शिवमंदिरे स्थापन झाली. पैकी त्या लिंगाचा शिरोभाग उडूपी जवळच्या सुरथकल भागात पडला तिथे सदाशिव मंदीर बनले. मग रावणाने ते लिंग ज्या पेटीतून आणले ती जिथे टाकली तो भाग.. म्हणजे सज्जेश्वर, त्या पेटीचे झाकण टाकले तिथे आहे .. गुणेश्वर आणखी दहा बारा मैलांवरचा धारेश्वर. आणि सर्वात शेवटी त्याने ज्या वस्त्रातून झाकून ते आत्मलिंग आणले ते वस्त्र ते कापड त्याने कंडुकागिरी टेकडिवर टाकले.. तिथला हा मुरुडेश्वर.