1/13/2009

प्राक्तन . . .

तुझं माझं अस्तित्व

आकाशात शोधताना

प्राक्तनच रूसून बसलं

रेषा रेषा जुळवताना . . .

स्पंदन . . .

नात्यांना नसावीत नावे

असावा फ़क्त अर्थ

मनातल्या स्पंदनाशिवाय

नात्यांचं अस्तित्वच व्यर्थ . . .

रानफूल . . .

वार्‍याच्या त्या स्पर्षानं

रानफूल वेडं उमललं

त्याच्या सोबत डोलताना

फुलायचं कसं विसरलं ?

स्वप्नओंजळ . . .

पहाटे उगवत्या क्षितिजावर

दवांत भिजूनी रात्र सरते

हताश माझ्या स्वप्न ओंजळी

नुसतेच दाट धुके उरते . . .

आंदण . . .

शब्द मी जपून ठेवले
आजच्या आपल्या भेटी साठी
तूच त्यांना दिलंस आंदण
कुणा एका अबोली साठी . . .

निवडुंग . . .

काट्याचं टोचणं
तसं नित्य होतं
निवडुंगाचं फ़ुलणं
मला नवं होतं . . .

ब्रह्मसंबंध . . .

नियतिच्या काळोखात
माझ्या स्वप्नांचा गाव
प्राक्तनाचा उसनाच
ब्रह्मसंबंधाचा आव !

आस . . .

विखूरलेली सारी स्वप्नं
अन उसवलेला माझा श्वास
रितंच सारं आयुष्य
तरीही जगण्याची खुळी आस . . .

1/12/2009

गोठणं

जडावलेल्या पापणीत

आसवांचं गोठणं

तुला शोधत तुझ्यासवे

माझी मी हरवणं . . .

विरस

तुझ्या आठवांची
अंतरी पुसट खूण
क्षितिजाशी रेंगाळणारं
विरस बावरं उन . . .

एक रात्र

एक रात्र मनातली
स्वप्नं दवांत भिजलेली
चांदण्या मुठीत घेउन
आकाश पांघरून निजलेली

एक रात्र अशीच
आकाश पांघरून निजलेली
गात्र-न-गात्र चेतवून
तुझ्या मिठीत विझलेली . . .

मोती

चांद खुणवी नभातून
चांदण्या देह जाळती
जडावल्या पापण्यांतून
निसटून जाई मोती

अंगोपांगी

सूर्यास्ताला एक क्षण

तुझ्या मिठीत मिटला

तरसण्याचा अनुभव देऊन

माझ्या अंगोपांगी भिनला . . .

देहभान

आकंठ श्वास

उन्माद बेभान

तुझेच आभास

हरपतं देहभान . . .

प्रीत पावरी

अर्णवाची जशी
लाट मुकी बावरी
माझ्या ओठी सखया
तुझीच प्रीत पावरी. . .

अनावर

कुंतलात रात गुंतली
तुझ्या अधरांची धुंदी
अनावर पहाटेची
सूर्योदयाला बंदी. . .

मदालस

मदालस स्पर्ष तुझा

बावर्‍या तनूवर

विसावतो रोम- रोम चेतवून

श्वास माझा उसवतो. . .

सुखाचा सोहळा

थरारल्या पापण्यांत
स्वप्नांचा हिंदोळा
काय सांगू सखे
सुखाचा सोहळा . . .

दूर देशी

पुन्हा कसं येइल
नभी चांदणं भरून
कुठे दूर देशी आता
चंद्रच गेला निघून . . .

मोहोरसुगंधी

दिठी-दिठी तुझे भास

स्पर्ष मोहोरसुगंधी

सायवाळल्या ओठांना

आर्त अनोखी धुंदी...

आरस्पानी

स्वप्न डोहाच्या तरंगी
तुझे भास आरस्पानी
चंद्राच्या कुशीत मिटली
एक अबोल चांदणी...

चांदणभूल

सरू नये आज निशा
स्वप्नी येता तुझी चाहूल
मोहरल्या दाही दिशा
की ही नवी चांदणभूल ?

1/09/2009

प्राजक्त मला गवसलेला . . . माझ्या अंगणातला . . .

आकाशीचं चांदण
लेऊनअंगणातला प्राजक्त
सारं देणं धरतीला देऊन
पुन्हा एकदा विरक्त . . .


माझ्या अंगणात बरसलेला
मुक्या प्राजक्ताचा बहर
सार्‍या चांदण्याच दुरावल्या
असा आकाशाचा कहर . . .


सजून येईल निशा

प्राजक्त वेडा फुलेल

चांदण्यांची मधूशिंपण

पुन्हा धरेवर घालेल . . .